या पाच लोकांना नडून विराट कोहली आज शंभरावी टेस्ट खेळतोय…
जेल लावून उभे केलेले केस, अंगावर भरपूर टॅटू, समोरच्या टीममधल्या खेळाडूनं डिवचलंच, तर त्याला थेट नडायची डेअरिंग या गोष्टींमुळं कोहली सुरुवातीला जबरदस्त बदनाम झाला होता, ‘कसला माजुरडा आहे हा’ ही कोहलीला बघितल्यानंतरची कित्येकांची पहिली रिऍक्शन असायची. पुढं जाऊन तो भारताचा टेस्ट कॅप्टन बनला आणि सोबतच भारतीय संघाचं नशीबही बदललं.
भारताच्या टेस्ट संघात जिंकण्याची उर्मी होती, पण परदेशात मात्र आपला वांदा व्हायचा. कोहलीनं हीच गोष्ट बदलून टाकली. भारतीय संघ परदेशातही जिंकू लागला, तेही थोड्या फरकानं किंवा नशिबानं नाही, तर थाटात. कोहलीनं आधी टी२०, वनडे आणि मग टेस्टचंही कर्णधारपद सोडलं. तो पर्यंत चाहत्यांना हा मवाली कोहली आणि त्याची नडायची वृत्ती आवडायला लागली होती.
फलंदाज कोहलीबद्दल तर लय काय काय लिहिता येईल, त्याची कव्हर ड्राईव्ह, सेंच्युरीजची माळ, धावांची भूक, खेळण्यातली जिगर आणि फिटनेस म्हणजे कहर… पण याच विराट कोहलीच्या करिअरमध्ये पाच जण असे आहेत, ज्यांच्या टोमण्यांचा, रागाचा, राजकारणाचा आणि बाऊन्सरचा विराट कोहलीला ‘द विराट कोहली’ बनवण्यात मोठा वाटा आहे.
बूस्टर देणारा बाऊन्सर-
२०१४ ची गोष्ट. कोहली पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करत होता. तो क्रीझवर आला आणि मिशेल जॉन्सनचा पहिलाच बॉल त्याच्या हेल्मेटवर आदळला. साधारण १५० किलोमीटरच्या स्पीडनं आलेला बॉल हेल्मेटवर खाणं म्हणजे काय सोपी गोष्ट नसणार. पण कोहली उठला, हेल्मेट नीट केलं आणि ऑस्ट्रेलियन बॉलिंगवर तुटून पडला. त्या मॅचमध्ये दोन्ही डावांत शतक मारण्याचा पराक्रम त्यानं केला. जॉन्सन फक्त एकदाच नाही, तर त्यानंतरही अनेकवेळा कोहलीला नडला, पण त्यादिवशी ॲडलेडच्या ग्राउंडवर कोहलीनं जे केलं ते अचाट होतं. कॅप्टन म्हणून पहिलीच कसोटी, ऑस्ट्रेलियात खेळायचं प्रेशर आणि समोरासमोर दिल्या जाणाऱ्या शिव्या… या सगळ्यांना कोहलीनं आपल्या बॅटच्या भाषेत उत्तर दिलं. मिशेल जॉन्सननं त्या मॅचमध्ये त्याची विकेट घेतली, पण कोहलीनं त्याला मारलेली प्रत्येक फोर… एक नवी गोष्ट सांगत होती…
क्रिकेट वर्ल्ड में न्या भाई आयेला है…
लेझीमचा सराव आणि जेम्स अँडरसन-
इंग्लंडमध्ये मुथय्या मुरलीधरन आणि शोएब अख्तरला एकाचवेळी खेळणं कदाचित सोपं जाईल, पण बॉल स्विंग करु शकणारा बॉलर इंग्लंडमध्ये धोका असतो. सध्याच्या काळात स्विंग करु शकणारा सगळ्यात बाप बॉलर कोण? तर जेम्स अँडरसन. १६९ टेस्ट मॅचेस खेळणारा, फलंदाजांना लेझीम खेळायला लावणारा अँडरसन बॉलिंगला आला की आऊटसाईड एज किंवा ऑफ स्टम्पचं दांडकं यांची भेट कधी होईल सांगता येत नाय. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात अँडरसननं कोहलीचा प्रॉपर बाजार उठवला होता. लोकांना वाटलेलं कोहली आयुष्यात कधी स्विंग बॉलिंगसमोर उभा राहू शकत नाही. कारण अँडरसननं त्याला कच्चा खाल्ला होता. पण कोहलीनं तंत्र घोटवलं, प्रचंड सराव केला २०१८ च्या दौऱ्यात एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. अँडरसनच काय इतर कुठल्याच इंग्लिश बॉलरला त्यानं सुट्टी दिली नाही. प्रचंड अपयश पचवूनही… धिंगाणा घालणारं कमबॅक करता येऊ शकतं हे त्याच्या त्या इनिंगनं सिद्ध केलं.
“He does not Belong Here” – संजय मांजरेकर
२०११-१२ चा भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा. संघात आलेलं हे नवं पण आगाऊ पोरगं कसोटीमध्ये कसं खेळतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पहिल्या टेस्टमध्ये ११ आणि ०, तर दुसऱ्या टेस्टमध्ये २३ आणि ९ असे स्कोअर कोहलीच्या नावापुढं होते. तेव्हा माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकरनं एक ट्विट केलं होतं, ‘I would still drop VVS & get rohit in for next test.Makes long term sense. give virat 1 more test..just to be sure he does not belong here.’ भाऊ सरळसरळ म्हणत होता, की कोहली टेस्ट क्रिकेटसाठी बनलेला नाही. मात्र तिसऱ्या टेस्टमध्ये कोहलीला संधी मिळाली आणि त्यानं दोन्ही इनिंग्समध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. मांजरेकरनं थेट कोहलीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं, मात्र कोहलीनं आपल्या बॅटमधून त्याला उत्तर दिलं. पुढं आपल्याला कमी समजणाऱ्या प्रत्येकालाच त्यानं बॅटमधून नडायला सुरुवात केली… सुरुवात मांजरेकरपासून झाली.
जम्बो कोच आणि जम्बो राडा-
भारताचा माजी कसोटी कर्णधार अनिल कुंबळे हा पहिल्यापासूनच स्कॉलर विद्यार्थी. कुंबळे भारतीय संघाचा कोच झाला, तेव्हा भारतीय खेळाडूंना आता शिस्तीची सवय लागणार, हे शक्यतो कुणाशी भांडणार नाहीत, कोहली पण गुणी खेळाडू होईल असा अनेकांचा अंदाज होता. मात्र हे सगळं फेल ठरलं. कोहली आणि कुंबळेचं काय पटलं नाही. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर दोघांमधल्या वादानं कळस गाठला. अखेर कुंबळेनं हेड कोच पदाचा राजीनामा दिला. तेव्हा विराट आता संघाची माती करणार असं लोकं बोलायला लागले. पण कोहलीनं पुन्हा एकदा मुसंडी मारली, त्याच्या बॅटमधून धावांचा ओघ तर वाढलाच पण आपल्या स्टाईलनं संघ बांधत आणि आपल्याच स्टाईलनं नेतृत्व करत त्यानं भारतीय टेस्ट क्रिकेटचा नाव अध्याय लिहिला. कुंबळे आणि त्याच्या वादाबद्दल त्यानं जाहीरपणे बोलणं टाळलं आणि टीकाकारांना उत्तर द्यायला संघाचे विजय पुरेसे होते.
दादागिरी कुणाची…?
सौराव गांगुली आणि विराट कोहली ही जोडी पण जमली नाही. गांगुली बीसीसीआय अध्यक्ष झाल्यावर काहीकाळ सगळं वातावरण शांत होतं, मात्र त्यानंतर गोष्टी बिघडत गेल्या. कोहलीला ४५ मिनिटं आधी सांगत वनडे कँप्टन्सीवरुन काढून टाकण्यात आलं. कोहली जे बोलला, त्याच्या अगदी विरुद्ध गांगुली बोलला. पण यावेळी कोहली शांत बसला नाही, त्यानं आपल्यासोबत जे झालं ते उघडपणे सांगितलं. कदाचित त्यामुळंच त्याच्या शंभराव्या टेस्टसाठी आधी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली नाही, अशीही चर्चा होती. पण प्रेक्षकांना परवानगी मिळाली. कोहलीनं थेट दादाला नडुन एक गोष्ट दाखवून दिली, की खेळणारा प्लेअर स्वतःच्या हक्कांसाठी बोलूही शकतो आणि मैदानावर उतरल्यावर आपली गुणवत्ता सिद्ध करत किंगही बनू शकतो.
आयुष्य आणि क्रिकेट रोलरकोस्टर राईडसारखं असतं, या पाच लोकांमुळं आलेले प्रसंग कोहलीची नैय्या डुबवणारे होते… पण कोहली तरला आणि प्रवाहाविरुद्ध झुंजत शंभराव्या टेस्टसाठी मैदानातही उतरला…
हे ही वाच भिडू:
- क्रिकेट खेळणारे खूप असतात, खेळाला वळण लावणारा भिडू म्हणजे विराट कोहली…
- विराट कोहलीच्या आधीही ऑस्ट्रेलियाला नडणारा एक बादशहा होऊन गेलाय…
- एक क्रिकेटचा किंग बनला, पण अंडर-१९ वर्ल्डकप जिंकणारा दुसरा कोहली कुठे गायब झालाय…