एक क्रिकेटचा किंग बनला, पण अंडर-१९ वर्ल्डकप जिंकणारा दुसरा कोहली कुठे गायब झालाय…
नुकताच अंडर-१९ वर्ल्डकप पार पडला. आधी एकही मॅच न हरता, फायनलमध्ये इंग्लंडची जिरवून थाटात वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताच्या पोरांनी सगळ्या क्रिकेट जगतात हवा केली. त्यातले अनेक चेहरे आगामी आयपीएल ऑक्शनमध्ये आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. देशांतर्गत स्पर्धा, आयपीएलमध्ये या पोरांची कामगिरी भारी झाली, तर भारतीय संघाचे दरवाजेही त्यांच्यासाठी लवकरच खुले होतील.
फक्त भारतच नाही, तर जगातल्या अनेक संघांचे सुपरस्टार्स अंडर-१९ वर्ल्डकपमधूनच पुढे येतात. यातलंच एक मोठं नाव म्हणजे विराट कोहली. सगळ्या क्रिकेट विश्वात किंग कोहली म्हणून फेमस असलेल्या विराटनं २००८ मध्ये झालेल्या अंडर-१९ वर्ल्डकपमध्येच आपल्या जबरी बॅटींगची, रागाची आणि नेतृत्वाची झलक दाखवली होती.
भारतानं त्याच्या नेतृत्वात साऊथ आफ्रिकेला हरवून वर्ल्डकप जिंकला तेव्हा संघात आणखी एक कोहली होता… त्याचं नाव तरूवर कोहली.
विराट वर्ल्डकपनंतर काही वर्षांतच भारतासाठी खेळला, भारताचा कॅप्टन बनला, क्रिकेटविश्वाचा राजा बनला. त्याच टीममध्ये असलेले रविंद्र जडेजा, मनीष पांडे, सिद्धार्थ कौल, सौरभ तिवारी हे कार्यकर्ते भारतीय संघ किंवा आयपीएल पण मग तरूवर कोहलीचं काय झालं?
तरूवर कोहली जालंधरचा. अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये त्याची निवड झाली तेव्हा मिडल ऑर्डर फलंदाज आणि संघाला गरज पडली तर मिडीयम पेस बॉलिंग अशी त्याची भूमिका होती. पण वर्ल्डकपमध्ये त्याच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली, ओपनिंग करायची. अचानक आलेल्या या चॅलेंजला तो जबरदस्त पद्धतीनं सामोरा गेला. त्याचे पहिल्या चार मॅचेसमधले स्कोअर होते ४०, ५४, ५०, ६३. सलग तीन फिफ्टीज झळकावत त्यानं चमकदार कामगिरी तर केलीच, पण सोबतच तो संघाचा आधार बनला.
२ मार्चला झालेल्या फायनलमध्ये भारतानं आफ्रिकेला १२ रन्सनं हरवलं आणि वर्ल्डकप उंचावला. त्यादिवसानंतर कित्येकांचं आयुष्य बदलून गेलं, संधीची अनेक दारं उघडी झाली. त्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या तरूवरची कामगिरी बघून त्याला हेरलं राजस्थान रॉयल्सनं.
शेन वॉर्नच्या नेतृत्वात आयपीएलच्या पहिल्याच सिझनचं विजेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्समध्ये तरूवरचा समावेश होता. मात्र त्याला आपल्या गुणवत्तेला न्याय देता आला नाही. पुढच्या सिझनमध्ये म्हणजेच २००९ मध्ये त्याला किंग इलेव्हन पंजाबनं आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र त्याही वर्षी तरूवरची बॅट फारशी बोलली नाही. २००९ मध्येच तो कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आपला अखेरचा आयपीएल सामना खेळला.
त्यानंतर त्याचं नाव लाईमलाईटमधून गायब झालं. तो डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत राहिला. अचानक २०१३ मध्ये तरूवरचं नाव हेडलाईन्समध्ये आलं आणि त्यामागचं कारणही तसंच होतं. रणजी ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये त्यानं झारखंडविरुद्ध नॉटआऊट ३०० रन्स मारले. त्याच्या शानदार ट्रिपल सेंच्युरीची साहजिकच मोठी बातमी झाली.
नशीब कसं असतं बघा… त्याच सिझनमध्ये केदार जाधव, रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा या तिघांनीही ट्रिपल सेंच्युरी मारली होती. तिघंही पुढे जाऊन भारताकडून खेळले, तरूवरला मात्र संधी मिळाली नाही.
पुढं खराब फॉर्मनं त्याची पाठ सोडली नाही. २०१८ मध्ये त्यानं मिझोरामकडून खेळण्याचा निर्णय घेतला. २०१९-२० मध्ये तरूवरनं रणजी ट्रॉफी स्पर्धा अक्षरश: गाजवली. त्यानं अरुणाचल प्रदेशला तडाखा देत नॉटआऊट ३०७ रन्स चोपले. त्या सिझनमध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल ९९८ रन्स आले. हजारी मनसबदारी अगदी थोडक्यात हुकली. सोबतच १३ विकेट्स घेत त्यानं आपली बॉलिंगमधली उपयुक्तताही सिद्ध केली. सईद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्यानं ७ मॅचेसमध्ये ३२५ रन्स मारले. सध्याही मिझोरामकडून खेळत त्यानं आपलं आयपीएल आणि टीम इंडियाकडून खेळायचं स्वप्न जिवंत ठेवलंय.
एका मुलाखतीत त्याला विराटचं यश आणि त्याचं यश यात फरक का आहे, याचं कारण विचारण्यात आलं होतं. त्यानं अगदी सोप्या शब्दांत सांगितलं होतं, ‘२००८ मध्ये जेव्हा आम्ही वर्ल्डकप जिंकलो, तेव्हा आम्ही दोघंही सेम लेव्हलवरच होतो. पण पुढे जाण्यासाठी विराटमध्ये माझ्यापेक्षा जास्त भूक होती आणि त्याचंच फळ आज त्याला मिळतंय. ज्या पद्धतीनं त्यानं स्वताला ट्रान्सफॉर्म केलं त्याचा नाद नाहीच.’
तरूवरचं नाव फारसं चर्चेत नसलं, तरी एक गोष्ट आहे… वयाच्या ३३ व्या वर्षी त्यानं प्रयत्न करणं सोडलेलं नाही आणि भारताची जर्सी घालण्याचं स्वप्न बघणंही…
हे ही वाच भिडू:
- कोहलीला एकमेव आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा भिडू, टीम इंडियामध्ये पक्कं स्थान मिळवू शकला नाही
- सर जडेजाच्या आयुष्यात दोन महेंद्रसिंह महत्वाचे आहेत, एक धोनी आणि दुसरे चौहान
- भारताच्या पोरांनी आधी कोविड आणि आता ऑस्ट्रेलियाचा पण बल्ल्या केलाय…