फॅमिली मॅन मध्ये दाखवलेली संघटना जर लिट्टेशी साधर्म्य दाखवत असेल तर वाद होणारच कारण

तामिळनाडू सरकारने २४ मे रोजी केंद्राला पत्र पाठवलंय.

या पत्रात मनोज बाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन 2’ या मालिकेच्या अमेझॉन प्राईम रिलीजवर बंदी घालण्याची मागणी केली. हे पत्र तामिळनाडूचे माहिती तंत्रज्ञान मंत्री टी. मनो थांगराज यांनी पाठवलं असून ते पत्रात म्हणतात की,

“या मालिकेमुळे केवळ तामिळ एलमच्याच भावना दुखावल्या नसून तामिळनाडूतील लोकांवरही याचा नकारात्मक परिणाम होईल. मी हे सांगू इच्छितो की वरील मालिकेमुळे केवळ तामिळ एलम लोकांच्याच भावनाच दुखावल्या गेलेल्या नाहीत तर मोठ्या प्रमाणात तामिळनाडूच्या लोकांच्या भावनाही दुखावल्या गेल्या आहेत आणि जर ही मालिका प्रसारित करण्यास परवानगी दिली गेली तर राज्यात शांतता राखणे कठीण होईल.

श्रीलंकेतील एलम तामिळ लोकांच्या ऐतिहासिक संघर्षाची बदनामी करण्यासाठी आणि तो इतिहास विकृतपणे लोकांच्या समोर आणण्याचा उद्देश दिसत असून या मालिकेमध्ये ‘निंदनीय, अनुचित आणि दुर्भावनायुक्त कन्टेन्ट असल्याचा दावा ही त्यांनी केला.”

#familyMan२_against_Tamils

या मालिकेचा ट्रेलर १९ मे रोजी युट्यूबवर रिलीज झाला. लगेचच हा ट्रेलर युट्युबवर टॉप ट्रेंडिंग मध्ये दिसला. ट्विटरवरही हा ट्रेंड झाला पण #familyMan२_against_Tamils अशा हॅशटॅगने.

पण या फॅमिली मॅन मध्ये असं काय दाखवलंय ज्यामुळे तामिळ लोकांची मन दुखावली? हे एलम तामिळ नक्की कोण आहेत? या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी थेट जावं लागतय ब्रिटिशांची वसाहत असलेल्या श्रीलंकेत..

फॅमिली मॅनच्या ट्रेलरच्या हिशोबाने सिरीजमध्ये जे व्हिलन दाखविण्यात आले आहेत ते तामिळ भाषिक आहेत. आणि जेव्हा जेव्हा तामिळ आर्म्ड ग्रुपची गोष्ट येते तेव्हा साहजिकच लोकांच्या डोळ्यासमोर एकच नाव येते.

ते म्हणजे,

LTTE… The Liberation Tigers of Tamil Elam..

श्रीलंकेत तामिळी विरूद्ध सिंहली या गृहयुद्धाला बऱ्याच वर्षांचा इतिहास आहे. फार पूर्वी म्हणजे ब्रिटिश येण्याआधी श्रीलंकेत छोटी छोटी राज्य होती. १६ व्या शतकात सिलोन या बेटावर पोर्तुगीज आले. त्यांनी कॅंडी हे राज्य सोडून संपूर्ण श्रीलंका आपल्या ताब्यात घेतली. कॅंडी या राज्याला पोर्तुगीजांपासून आक्रमणाची भीती वाटू लागली.

यामुळे त्यांनी डचांची मदत घेतली. पण यात मध्येच इंग्रजांनी एंट्री मारली आणि संपूर्ण श्रीलंकाच ताब्यात घेतला. या काळात श्रीलंकेत ३० लाख सिंहली तर ३ लाख तामिळ लोक राहत होते.

सिंहली हे तेथील मूळ रहिवासी होते जे बौद्ध धर्माचे अनुयायी होते. तामिळी हे हिंदू धर्मीय होते.

इंग्रज श्रीलंकेत येताना आपल्या सोबत १ लाख मजुरांना घेऊन आले. सुरवातीच्या टप्प्यात श्रीलंकेत कॉफीची लागवड केली जात असे. याकामासाठीच हे मजूर आणण्यात आले होते. पण थोड्याच कालावधीत कॉफीवर रोग पडला आणि श्रीलंकेतील सर्व कॉफी नष्ट झाली. या कॉफीच्या पिकाची जागा चहाने घेतली. चहाचा व्यापार इतका वाढला की, इंग्रजांना या कामात अधिक लोकांची गरज भासू लागली. आणि यातूनच तामिळ लोकांची संख्या वाढू लागली. त्याचबरोबर सरकारी कामासाठी इंग्रजांना कारकूनांची गरज भासू लागली.

या सरकारी कारकूनांसाठी तामिळ लोकांची निवड केली जायची. याला दोन कारण होती. एक म्हणजे मद्रास ही इंग्रजांची फार जुनी वसाहत होती आणि तिथल्या मद्रासी म्हणजेच तामिळ लोकांच्या कामाचा इंग्रजांना अनुभव होता. दुसरे म्हणजे तामिळ लोक उच्चशिक्षित होते.

याचा परिणाम असा झाला की, इंग्रज तिथल्या मूळ रहिवाशांना म्हणजेच सिंहलींना बॅकवर्ड आणि तामिळींना ऍडव्हान्स समजू लागले. सोबतच इंग्रजांनी तिथे ख्रिश्चन धर्माच्या वाढीसाठी पाठिंबा दिला. याउलट जे सिंहली बौद्ध धर्माचे अनुयायी होते त्यांना सप्रेस करण्याचे धोरण आखले. म्हणजे इंग्रजांच्या काळातच तामिळी आणि सिंहली वादाने जोर धरला. पण तो राग इंग्रजांच्या कारकिर्दीत तरी बाहेर पडला नाही.

पुढे श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्यानंतर तेथे लागू करण्‍यात आलेल्‍या नागरिकत्‍वाच्‍या कायद्यापासून या वादाने पेट घेतला. १९५६ साली सरकारने देशातील बहुसंख्यकांच्या सिंहलीला राष्‍ट्रभाषेचा दर्जा दिला. भाषक संघर्षाची बीजे पेरली जाऊन श्रीलंकेत १९५८ च्‍या सुमारास पहिल्‍यांदा तामिळविरोधी दंगल घडली. त्यात शेकडो लोक ठार झाले.

अनेक तमिळींना घरे सोडून दुसरीकडे आश्रय घ्‍यावा लागला. सरकारनेही तेथील तमिळींची मुस्‍कटदाबी करताना बहुसंख्य सिंहली समुदायाला देशाच्‍या पूर्व प्रांतात स्‍थायिक केले. ही जागा परंपरागतरित्या तामिळींची मातृभूमी समजली जात होती. येथून संघर्ष अधिकच तीव्र झाला.

सत्तरच्‍या दशकात भारतातून श्रीलंकेत जाणार्‍या तमिळ पुस्तकांवर, वृत्तपत्रांवर आणि तामिळनाडूतील राजकीय पक्षांच्‍या श्रीलंकेतील संघटनांवरही बंदी घालण्यात आली. तामिळ विद्यार्थ्‍यांना भारतात येऊन शिक्षण घेण्‍यावरही निर्बंध घालण्यात आले. १९७२ च्‍या सुमारास तत्‍कालीन सीलोनचे नाव बदलून श्रीलंका ठेवण्‍याचा आणि बौद्ध हा राष्‍ट्रीय धर्म जाहीर करण्‍याचा निर्णय घेण्यात आला. त्‍यामुळे तमिळींच्या नाराजीत भर पडली.

सरकारमध्‍ये असलेले सिंहलींचे वर्चस्‍व आणि तमिळींना मिळणारी दुय्यम वागणूक यामुळे १९७३ च्‍या सुमारास स्‍वतंत्र तामिळ राष्‍ट्राची मागणी समोर आली. त्‍यावेळच्‍या तामिळ राष्ट्रवादी पार्टीने इतर तामिळ पक्षांना सोबत घेऊन तामिळ युनायटेड लिबरेशन फ्रंटची उभारणी केली. त्‍यानंतर ही मागणी जोर धरू लागली आणि त्यासाठी संघर्ष वाढू लागला.

बहुसंख्‍य सिंहलींकडून अल्‍पसंख्‍य तमिळींवर होणारा अन्‍याय आणि त्यातून निर्माण झालेल्‍या दीर्घ संघर्षातूनच वेलुपिल्‍लई प्रभाकरनच्‍या लिट्टेचा जन्‍म झाला.

श्रीलंकेतील तमिळींच्या अस्मितेला फुंकर घालत त्याने तामिळ राष्‍ट्राचे स्‍वप्‍न दाखविले त्यासाठी सातत्यपूर्ण संघर्षही केला. प्रभाकरनने १९७२ मध्‍ये स्‍वतंत्र तमिळ राष्‍ट्रासाठी ‘तमिळ न्यू टायगर’ची स्‍थापना केली.सिंहलींविरोधात सशस्‍त्र लढा हे त्यांचे उद्दिष्ट्य होते. १९७५ मध्‍ये या संघटनेचे नाव बदलून ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’ (लिट्टे) असे करण्‍यात आले. नंतरच्‍या काळात काही साथीदारांना सैन्‍याने ठार केल्‍याच्‍या निषेधार्थ या गटाने सिंहलींवर हल्‍ले सुरू केले

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी, श्रीलंकेचे राष्ट्रपती प्रेमदासा, श्रीलंकेचे परराष्‍ट्र मंत्री लक्ष्मण कादिरगमार यांच्या हत्येचे पातक लिट्टेच्याच नावावर आहे.

या सगळ्या दहशतवादी घटनांमुळे श्रीलंकेत शांतता नांदावी यासाठी श्रीलंकेच्या सरकारने अनेकदा लिट्टे सोबत शांतता करारही केला. मात्र त्याचा कोणताच फायदा झाला नाही. यानंतर आलेल्या श्रीलंकेच्या महिंदा राजपक्षेनी, लिट्टेसोबतचा युध्‍दविराम रद्द करून त्याविरोधात ठोस कारवाईला सुरवात केली. जगाची पर्वा न करता त्यांनी ही कारवाई चालूच ठेवली. सुमारे ३० महिने चाललेल्‍या या संघर्षाचा शेवट अखेर प्रभाकरनच्या मृत्यूने झाला.

श्रीलंकन सरकारने लिट्टेविरुध्‍दचे युध्‍द संपल्‍याची घोषणा करून तमिळींना पूर्ण संरक्षण देण्‍याची घोषणा केली आहे. मात्र, असे अजूनही झाले नाही. मुळात ज्या कारणांनी लिट्टेची उभारणी झाली, ती मूळ समस्‍या अजूनही तशीच आहे. आणि भारतीय तामिळींना एलम तामिळ लोकांविषयी आपुलकीची बंधुभावाची भावना आहे.

लिट्टे ही संघटना आज ही भारतीय तामिळी स्वांतत्र्यासाठी लढणारी संघटनाच वाटते.

या फॅमिली मॅन मध्ये यात दक्षिणेची सुपरस्टार समन्था अक्कीनेनी ही खलनायकाच्या भूमिकेत आहे. तर मनोज बाजपेयी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. सहाजिकच फॅमिली मॅन मध्ये दाखवलेली संघटना जर लिट्टेशी साधर्म्य दाखवत असेल तर तामिळींमध्ये उद्रेक हा होणारच.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.