भारत-पाकिस्तान बॉर्डरवर कुंपण असूनही सैनिक रस्ता कसा भटकतो ?

३० नोव्हेंबर रोजी भारतीय आर्मीमधील बीएसएफचे जवान नेहमीप्रमाणे भारत पाकिस्तान सीमेवर गस्त घालत होते. उत्तर भारतात वाढलेल्या थंडीमुळे पंजाबच्या अबोहर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर धुके पसरले होते. या धुक्यामुळे काहीच नीट दिसत नव्हतं.म्हणून एक जवान चुकून भारत, पाकिस्तानची इंटरनॅशनल बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात चालला गेला.

जेव्हा हा जवान बॉर्डरवर गस्त घालत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना लक्षात आली. त्यांनी लागलीच भारतीय जवानाला स्वतःच्या ताब्यात घेतलं. ही गोष्ट भारतीय आर्मीला कळली तेव्हा दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतल्या. त्यात भारतीय जवान चुकून सीमेच्या पलीकडे गेला असं स्पष्ट झालं.

या बैठकीनंतर पाकिस्तानच्या आर्मीने भारतीय जवानाला परत भारतात पाठवलं. 

हा घटनाक्रम वाचल्यानंतर एक प्रश्न पडतो की, भारत पाकिस्तान बॉर्डरवर भल्यामोठ्या काटेरी तारांचं उंचच उंच कुंपण केलेलं सिनेमांमध्ये दाखवण्यात येतं. मग असं कुंपण असतांना भारतीय जवान इतक्या सहजासहजी इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करून पलीकडे कसा काय गेला?

यासोबतच आणखी एक प्रश्न पडला असेल की, सिनेमात दाखवण्यात येतं ते खोटं असतं का मग? तर नाही सीनेमात दाखवण्यात आलेलं काटेरी कुंपण सुद्धा खरं आहे आणि भारतीय जवानाला बॉर्डरची रेषा न दिसल्यामुळे तो पाकिस्तानात गेला ही गोष्ट सुद्धा खरी आहे.

यापुढे कोणतेही प्रश्न न घेता ही गोष्ट सोप्यात समजून घेऊया. 

भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान गुजरात, राजस्थान आणि पंजाब या राज्यांच्या सीमेवर इंटरनॅशनल बॉर्डर आहे. तर जम्मू काश्मीरमधील काही भाग पाकिस्तानने बळकावला असल्यामुळे तिथे एलओसी म्हणजेच दोन्ही देशांची नियंत्रण रेषा आहे.

दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या इंटरनॅशनल बॉर्डरला झिरो लाईन असे म्हणतात. भारत पाकिस्तानमध्ये असलेली झिरो लाईन सुद्धा अगदी साधी आहे. त्याच्यावर फक्त पांढरी रेषा ओढून ठराविक अंतरावर भारत आणि पाकिस्तान असे लिहिलेले दगड उभे करण्यात आले आहेत. त्यापलीकडे या झिरो लाईनवर आणखी काहीच नाही.

कारण आंतरराष्ट्रीय नियमानुसार या झिरो लाईनवर कोणत्याही प्रकारचं बांधकाम किंवा कुंपण केलं जात नाही.

जर आंतरराष्ट्रीय सीमेवर एखाद्या देशाला कुंपण करायचं असेल तर ते कुंपण त्याच  देशाच्या जमिनीवर करण्यात येतं. कुंपण बांधण्याचा नियम सुद्धा हा ज्या त्या देशाचा स्वतःचा निर्णय असतो. त्यामुळे कुंपण करणारा देश झिरो लाईनपासून ठराविक जागा सोडून स्वतःच्या जागेवरच कुंपण करत असतो. त्यानंतर कुंपणाच्या पलीकडे सोडलेल्या जागेवर सैनिकांच्या मार्फत गस्त घातली जाते. 

आपला शेजारी देश पाकिस्तान हा दहशतवादासाठी आणि भारताविरुद्ध कुरापती करण्यासाठी जगभरात कुख्यात आहे. पाकिस्तानकडून होणारे हल्ले, सीमेपलीकडून पाठवले जाणारे दहशतवादी आणि सीमेवर होणारी ड्रग्ज आणि अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी भारताने स्वतःच कुंपण घातलं आहे. मात्र पाकिस्तानने अजूनही स्वतःच्या बाजूने पक्क कुंपण केलेलं नाही.

१९९२ मध्ये भारताने पाकिस्तानच्या सीमेवर झिरो लाईनपासून १०० मीटर अंतर सोडून तारेचं कुंपण केलं होतं. परंतु २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजप सरकारने भारत पाकिस्तान बॉर्डरवरील तारेचं कुंपण आणखी मजबूत केलं. नवीन नियमानुसार झिरो लाईनपासून ३०० ते ५०० मीटर जागा सोडण्यात आली आणि स्टीलच्या तारा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन कुंपण घालण्यात आलंय.

यानुसार भारत पाकिस्तानदरम्यान असलेल्या २,१०१ किलोमीटर लांब इंटरनॅशनल बॉर्डरवर तारेचं पक्कं कुंपण आहे.

काश्मीरमधील एनजे ९८४२ पॉईंटपासून गुजरातच्या आखातापर्यंत भारत पाकिस्तानमध्ये एकूण २,१०१ किलोमीटर लांबीची इंटरनॅशनल बॉर्डर आहे. यात सर्वाधिक लांब १,१७० किलोमीटर बॉर्डर राजस्थानला लागून आहे तर पंजाबच्या सीमेवर ५०४ आणि गुजरातच्या सीमेवर ४२५ किलोमीटर सीमा आहे. यावर बॉर्डरवर २०१६ पासून तारेचं नवीन कुंपण करण्याला सुरुवात झाली. त्यानंतर २०२१ पर्यंत बहुतांश कुंपण पूर्ण झालं आहे असं सांगितलं जातं.

या कुंपणामुळे झिरो लाईनपासून कुंपणापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जमिनी कुंपणाच्या पलीकडे गेल्या आहेत. परंतु सरकारने बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीची नुकसानभरपाई दिली आहेच, सोबतच शेतकऱ्यांना शेतीयोग्य जमिनीवर शेती करण्यासाठी सशर्त परवानगी देखील दिली आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कुंपणाच्या पलीकडे गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना आर्मीकडून टोकन दिलं जातं आणि त्या टोकनच्या माध्यमातून सकाळी ९ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ७ तास शेतकरी शेतात काम करतात.

मात्र शेतकऱ्यांच्या आडून काही देशविरोधी लोक या नियमाचा फायदा घेऊन अंमली पदार्थाची तस्करी करतात.

पाकिस्तानच्या बाजूने कोणतंही कुंपण नसल्यामुळे अंमली पदार्थाची तस्करी करणारे तस्कर धुक्याचा फायदा घेऊन सीमेवर अंमली पदार्थ आणून ठेवतात. त्यानंतर भारतातील तस्करांची टोळी या वस्तू भारतात आणतात. तसेच दहशतवादी संघटना सुद्धा स्वतःचे कटकारस्थान खात असतात. हे थांबवण्यासाठी भारतीय जवान दिवस रात्र कोणत्याही परिस्थितीत सीमेवर गस्त घालत असतात. त्यातूनच ३० नोव्हेंबर रोजी भारतीय जवान चुकून या झिरो लाईनला ओलांडून पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेला होता. 

पण भारताच्या इंटरनॅशनल बॉर्डरचा मुद्दा एवढ्यापुरता मर्यादित नाही.

भारताच्या एकूण ७ देशांबरोबर भूसीमा आहेत. पाकव्याप्त काश्मीरमुळे अफगाणिस्तानची सीमा पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ६ देशांच्या भूसीमा भारताला लागून आहेत. त्यात वेगवगेळ्या देशांच्या सीमांवरून वेगवेगळे वादविवाद आहेत. जसं भारत पाकिस्तानच्या सीमेवर  दहशतवाद, पाकिस्तानकडून केले जाणारे हल्ले आणि अंमली पदार्थाची तस्करी या प्रमुख समस्या आहेत. 

तर भारत, बांग्लादेश सीमेवर बांगलादेशी नागरिकांचं भारतात होणारं बेकायदेशीर स्थलांतरण ही महत्वाची समस्या आहे. म्यानमार, भारत सीमेवर अंमली पदार्थांची तस्करी आणि वेगवगेळ्या वस्तूंचा अवैध व्यापार ही मोठी समस्या आहे. या तुलनेत नेपाळ आणि भूटान सीमेवर तणाव फार कमी आहे. या दोन्ही देशांच्या बॉर्डर जवळपास मुक्तच आहेत.  

भारत, म्यानमार सीमेवर वेगवेगळ्या आदिवासी जमाती दोन्ही देशांमध्ये राहतात त्यामुळे या सीमेवर कोणत्याही प्रकारचं कुंपण करण्यात आलेल नाही. तर भारत आणि बांग्लादेशमध्ये शत्रुत्वाचे संबंध नाहीत, उलट भारत आणि बांग्लादेशामधील लोकं रोटी बेटी व्यवहार करतात. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सासुरवाडी बांग्लादेशात आहे. त्यामुळे या सीमेवर सुद्धा फारसं कुंपण करण्यात आलेलं नाही. फक्त बीएसएफ जवान गस्त घालत असतात.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.