…आणि अशाप्रकारे भारताच्या रुपयाला आपलं स्वतःचं चिन्ह मिळालं

आजच्या जगात अन्न, वस्त्र निवाऱ्या या मूलभूत गरजांसोबत पैसा हा लागतोच भिडू. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठंही जायचं म्हंटल कि, खिश्यात पैसा असणाऱ्याला महत्व दिलं जातं, अशी आजकालची एक धारणाचं आहे. तसं पाहायचं झालं तर प्रत्येक देशाचे आपापले चलन आहेत. आपण कुठल्याही देशात गेलो कि, तिथं गेल्या गेल्या आपल्याला आपल्या चलनाच्या बदल्यात त्यांचं चलन घेणं भाग पडतं.

हा आता जगभरात बऱ्याच ठिकाणी डॉलर हेचं चलन वापरात आहे. पण आपल्या भारतात रुपया हे आपल्या स्वतःचं चलन वापरात आहे. महत्वाचं म्हणजे या रुपयाच्या सुरु होण्याचा किस्साही तसाचं आहे.

‘रुपया’ हा शब्द संस्कृत शब्द ‘रुपयकम’ या शब्दापासून तयार झाला, म्हणजेचं चांदीचे नाणे. १५४०-४५ मध्ये शेरशाह सूरीने हा मूळ रुपया शब्द जारी केल्याचे बोलले जाते.  आज, भारतीय रिझर्व्ह बँक RBI कायदा १९४३ अंतर्गत चलन जारी करते.

तर देशाला स्वतंत्र मिळण्याच्या आधीच्या काळात अधिकृत स्तरावर भारतीय चलनात मूल्य निर्देशित करताना आकड्यातील रकमेपूर्वी ‘आयएनआर’ अर्थात ‘इंडियन नॅशनल रूपी’ असं नमूद केलं जात असे. मात्र, नव्वदच्या दशकानंतर जागतिक स्तरावर आर्थिक क्षेत्रात भारताचं महत्त्व वाढलं.  या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘आयएनआर’ ऐवजी नवीन चिन्हाद्वारे भारतीय  चलन निर्देशित करण्याचा निर्णय घेतला.

भारतीय चलन आगळ्या स्वरूपात चिन्हांकित करावं हा विचार पुढे येण्यामागे अनेक कारणं होती. एकतर, पाकिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया, नेपाळ या देशांतही रुपया हेच चलन असल्याने या देशांच्या तुलनेत आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती साधणाऱ्या भारताच्या रुपयाचं वेगळेपण अधोरेखित व्हावं, असं एक मत होतं. दुसरं म्हणजे  अमेरिका, ग्रेट ब्रिटन, रशिया, जपान आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांनी त्यांच्या चलनांची चिन्हं रूढ केलेली होती.

यासारख्या संगणकयुगात त्यांचा स्वीकार होऊन त्या चिन्हांना की- बोर्डवर स्थान प्राप्त झालेलं होतं आणि युनिकोड स्टँडर्डमध्ये त्यांचा सर्रास वापर सुरू झालेला होता. या सर्व पार्श्वभूमीवर, भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य ज्यातून प्रतीत होईल अशा नव्या चिन्हाद्वारे भारतीय चलन चिन्हांकित करावं हा विचार प्रबळ झाला.

आगळेपण प्रतीत करणारं चिन्हं

केंद्रातील काँग्रेस सरकारातील केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी ही निकड लक्षात घेऊन नव्या चिन्हासाठीच्या चित्र-रचनेची (डिझाईनची) निवड योग्य तऱ्हेने साधण्यासाठी पाचजणांची समिती गठित केली आणि अर्थमंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावर अशा डिझाईनसाठी स्पर्धा आयोजित केली गेली.

त्याला प्रतिसाद देऊन अनेकांनी चित्ररूप चिन्हं पाठवली. मात्र, समितीने आलेल्या सगळ्या चिन्हांपैकी  मुंबईच्या आयआयटी संस्थेतील पदव्युत्तर शिक्षण  घेणाऱ्या आणि मूळ चेन्नईच्या डी. उदयकुमार यांच्या डिझाईनची निवड केली.

देवनागरी लिपीतील ‘र’ आणि रोम लिपीतील ‘R’ या अक्षरांचा त्यांनी घातलेला मेळ कल्पक ठरला. त्याचप्रमाणे भारतीय ध्वजातील  मधल्या पांढऱ्या पट्ट्यापासून प्रेरणा घेऊन या चिन्हामध्ये दोन आडव्या रेघांचा केलेला सर्जनशील वापरही वैशिष्ट्यपूर्ण ठरला. अशा चिन्हाद्वारे भारताचं आगळेपण प्रतीत होईल याबद्दल खात्री पटल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने १५ जुलै २०१० रोजी या चिन्हाला मान्यता देऊन नंतर त्याची अधिकृतपणे घोषणा केली.

भारतीय चलनातील नोटांवर आणि नाण्यांवर या चिन्हाची मुद्रा उमटवण्याची तातडीची योजना नसली तरी, मान्यता मिळाल्यावर थोड्यात काळात विविध क्षेत्रांत या चिन्हाचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.