या आहेत भारतातल्या पहिल्या महिला आमदार

भारताच्या पहिल्या आमदार कोण?

त्या पण घराणेशाहीमुळे निवडून आल्या असतील का?

त्यांच्या नावाने त्यांचे वडिल, भाऊ नाहीतर नवराच कारभार हाकत असेल का?

त्या फक्त एका शो पीस प्रमाणे खूर्चीवर जावून बसण्यापुरता कारभार करत असतील का?

प्रश्न तर पोत्याने होते. म्हणून भारताच्या पहिल्या आमदारांच नाव शोधण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी केलेल्या कामांची माहिती घेतली.आपल्यालाच नाही तर सध्या असणाऱ्या आमदारांपासून ते महिला सरपंचांपर्यन्त अन् तिथून थेट राजकारणात येवू पाहणाऱ्या युवतींपर्यन्त सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा असं त्यांचं आयुष्य होतं. 

भारतातल्या पहिल्या महिला आमदारांच नाव मुथुलक्ष्मी रेड्डी.

पेशाने त्या डॉक्टर होत्या. सध्याच्या तामिळनाडू राज्यातल्या व त्या वेळेच्या पुडुकोता संस्थामधली ही गोष्ट. मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा जन्म ३० जुलै १८८६ चा. त्यांचे वडिल एस नारायण स्वामी हे चैन्नई संस्थानात महाराजा कॉलेजचे प्रिंन्सिपल होते. मुथुलक्ष्मींच कामापुरतं प्राथमिक शिक्षण झालं. यापुढे देखील शिक्षण घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर आईने जोरदार विरोध केला. आईच्या मते आपल्या मुलीने लग्न करून घरकाम करावं. मात्र वडिलांनी तिला पाठिंबा दिला. 

आईच्या विरोधाला झुगारून तिने मेडिकल कॉलेजची परिक्षा दिली.

मेडिकल परिक्षेत ती पास झाली. वरतून पुडुकोता संस्थानची स्कॉलरशीप देखील तिने मिळवली.  मद्रासच्या लक्ष्मी मेडिकल कॉलेजमध्ये त्या शिक्षण घेवू लागल्या. त्या वेळेची परिस्थिती सांगायची तर मुथुलक्ष्मी या त्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पहिल्या आणि एकमेव महिला होत्या. एक दिवस त्यांच्या कॉलेजमध्ये सरोजनी नायडू आल्या होत्या. सरोजनी नायडूकडे पाहून त्या प्रभावित झाल्या आणि तिथूनच पुढच्या प्रवासास सुरवात झाली. 

१९१२ साली त्या कॉलेजमधून बाहेर पडल्या. तेव्हा त्या देशातील पहिल्या महिला हाऊस सर्जन झाल्या होत्या. त्यानंतरच्या काळात त्या म. गांधी आणि अॅनी बेझंट यांना भेटल्या. त्यांच्या विचारांच्या प्रभावातून त्यांनी सामाजिक कामांना सुरवात केली. विमेंट इंडियन असोशिएशन मार्फत त्या सामाजिक आणि राजकिय काम करू लागल्या. 

नंतरच्या काळात डॉक्टरकीचे पुढील शिक्षण त्यांनी इंग्लडमध्ये राहून पुर्ण केलं. सामाजिक कार्यात झोकून दिल्यामुळे त्यांची वेगळी ओळख संपुर्ण तामिळनाडू राज्यात झालीच होती. 

म्हणूनच १९२७ साली डॉ. मुथुलक्ष्मी रेड्डी यांना मद्रास विधान परिषदेच्या सदस्य झाल्या. या निवडीमुळे भारतातल्या पहिला महिला आमदार ही ओळख त्यांना मिळाली. 

याच संधीचा अचूक फायदा त्यांनी घ्यायचं ठरवलं. विधान परिषदेच्या सदस्य झाल्यानंतरच्या काळात त्यांनी कॅन्सरसाठी काम करायचं ठरवलं. त्यातूनच पुढे म्हणजे १९५४ साली अड्यार येथे कॅन्सर इंन्स्टिट्यूटची पायाभरणी होवू शकली. आज त्या इन्स्टिट्यूटमध्ये दरवर्षी ८० हजार रुग्णांवर उपचार केले जातात. 

महिला आमदार म्हणून त्यांनी महत्वाचा प्रश्न हाती घेतला होता तो महिलांच्या न्याय व हक्कांचा. 

सतीप्रथा आणि बालविवाह यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला. देवदासी प्रथेविरोधात त्यांनी १९३० साली आवाज उठवला होता. आपल्या माहितीसाठी आजही दक्षिणेतील राज्यातून पुर्णपणे देवदासी प्रथा नष्ट करता येवू शकलेली नाही. त्यांनी जो आवाज उठवला ते साल होतं १९३०. फक्त देवदासी प्रथविरोधात आवाज उठवून त्या थांबल्या नाहीत तर,

१९३० साली मद्रास विधान परिषदेत त्यांनी देवदासी प्रथेविरोधात विधेयक आणलं आणि ते पारित करून घेतलं. त्यामुळेच देवदासी प्रथेविरोधातला कायदा अंमलात येवू शकला. 

AVVI नावाच्या संस्थेची स्थापना त्यांनी गरिंबासाठी केली. गरिब लोकांसाठी मोफत उपचार हा उद्देश या संस्थेचा होता. सामाजिक कामांसोबत भारतीय स्वातंत्र्याठी त्यांनी काम केलं. त्यातूनच १९३० साली त्यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. १९३१ साली लाहोर येथे झालेल्या आशियाई महिला परिषदेच त्यांनी अध्यक्षपद भूषवलं. १९५६ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं तर २२ जुलै १९६८ साली त्यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. 

भारताच्या पहिला आमदारांनी आपल्या जीवनाबद्दल ‘माय एक्सपीरियंस एज ए लेजिस्लेटर’ नावाने पुस्तक लिहले आहे. 

हे ही वाच भिडू.