इंदिरा गांधींची मिटिंग सुरु होती आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष समोर बसून घोरत होते

एक काळ होता महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाचं दिल्लीत देखील मोठं वजन असायचं. आबासाहेब खेडकर, वसंतदादा पाटील, विनायकराव पाटील, प्रतिभाताई पाटील, निलंगेकर, सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदम ते आत्ताच्या अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंच्या पर्यंत एकाहून एक दिग्गज या पदावर बसले आहेत.

सत्तरच्या दशकातदेखील महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. पक्षाला मोठी रसद इथून पुरवली जायची. प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल राज्यातला मोठा नेता असे. त्याची पक्ष संघटनेवर पकड असायची. गल्ली ते दिल्ली प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांशी संपर्क असायचा.

पुढे आणीबाणी नंतर काँग्रेस फुटली आणि महाराष्ट्रातही गोंधळ उडाला. इंदिरा काँग्रेस रेड्डी काँग्रेस समाजवादी काँग्रेस अशी भांडणे सुरु झाली. नेते विभागले, कार्यकर्ते विभागले. त्यात प्रदेशाध्यक्षाचं दिल्लीतील वजन कमी झालं. 

ऐंशीच्या दशकात तर अगदी कपडे बदलावेत तसे पटापट मुख्यमंत्री बदलले गेले. याच वेगात काँग्रेसने आपले प्रदेशाध्यक्ष देखील बदलले.  तेव्हा तर राज्याच्या मुख्यमंत्र्यावर वचक राहावा म्हणून आपल्या मर्जीतला नेता प्रदेशाध्यक्ष पदी बसवण्याची पद्धत आली. बरेच कमी अनुभव असलेले नेते देखील फक्त दिल्लीकरांची एकनिष्ठ म्हणून प्रदेशाध्यक्ष पदावर आले.

यातीलच एक नाव म्हणजे एस.एम.आय. असीर

जेव्हा अंतुलेंना हटवून बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करायचा प्रयोग फसला तेव्हा लोकनेते वसंतदादा पाटील यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. तेव्हा प्रदेशाध्यक्ष होते सहकार तपस्वी गुलाबराव पाटील. ते देखील सांगलीचे होते. त्यामुळे त्यांना हटवण्यात आलं आणि त्या जागी आले एस.एम.आय असीर.

एकेकाळी अहमदनगरमध्ये इंग्रजी शिकवणारे प्रोफेसर असलेले असीर हे स्वातंत्र्यलढ्याच्या काळचे नेते होते.  नेहरू मौलाना आझाद गांधीजी यांची भाषणे ऐकून ते ४२ च्या चले जावं आंदोलनात उतरले. तेव्हा कारावास देखील सहन केला. काँग्रेस सेवा दलाचे काम करताना स्वयंसेवकांची फळी देखील उभी केली.

स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात अनेक वर्ष काँग्रेसच काम निष्ठेनं केलं. १३ वर्ष ते जिल्हा काँग्रेसचे सेक्रेटरी होते.

पुढे आणीबाणी नंतर काँग्रेस फुटली तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींसोबत जाण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात इंदिरा काँग्रेस पक्ष स्थापन केला. त्यांचं घर हेच या पक्षाचे कार्यालय बनले होते. इंदिरा गांधींसाठी ते कारावासात देखील जाऊन आले.

जनता सरकारवेळी इंदिरा गांधींची केस न्यायालयात लढणाऱ्या रामराव आदिक यांचे ते मित्र होते. या काळात त्यांचे गांधी घराण्याशी ऋणानुबंध दृढ झाले. पुढे जेव्हा रामराव आदिक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले तेव्हा असीर यांना दळणवळन, कामगार,जेल आणि वफ्फ या चार खात्याचे कॅबिनेट मंत्री पद देण्यात आलं होते.

अभ्यासू आणि निष्ठावंत अशी ओळख असणाऱ्या असीर यांना इंदिरा गांधींनी वसंतदादांवर वचक ठेवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष केलं.

त्यांचे विरोधक म्हणायचे की अंतुलेंना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर नाराज झालेल्या मुस्लिम मतांना कुरवाळण्यासाठी असीर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली होती.

असीर हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जायचे. एकदा त्यांनी स्वतःच मी मुसलमान आहे म्हणून प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं असं पत्रकारांना सांगितलं. पण जेव्हा याबद्दलचे वाद दिल्लीपर्यंत पोहचले तेव्हा त्यांनी मला मुसलमान नाही तर अल्पसंख्यांक समाज असं म्हणायचं होत हा खुलासा केला.

एकदा तर त्यांच्या बूट भरलेल्या कपाटाचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला. पण चांगले राहणीमान असे यात वाईट काय असा सवाल असीर यांनी केला होता.

अशा अनेक आरोपांमुळे असीर यांची कारकीर्द वादळी ठरली. याला ब्रेक लागला एका दिल्लीमध्ये झालेल्या घटनेतून.

जेष्ठ पत्रकार दिनकर रायकर आपल्या आठवणींमध्ये सांगतात

एकदा इंदिरा गांधींनी काँग्रेसच्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांची बैठक दिल्लीत बोलावली होती. त्या तेव्हा पंतप्रधान देखील होत्या. पक्षाच्या संघटनेच्या आणि निवडणुकीसंदर्भात ही महत्वाची बैठक सुरु होती. स्वतः इंदिराजी सर्व सूचना सांगत होत्या.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असीर समोरच्या रांगेत बसले होते. दिवसभराच्या दगदगीनंतर असीर यांची दमछाक झाली  त्यांचं वय देखील झालं होतं.

इंदिरा गांधी बोलत असताना असीर यांना केवळ झोपच लागली नाही तर ते चक्क घोरूही लागले.

ते समोरच बसले असल्यामुळे पंतप्रधानांचे त्यांच्याकडे साहजिकच लक्ष गेले. पण त्या वेळी इंदिरा गांधी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पुढे बैठक संपवून असीर मुंबईला परत येईपर्यंत त्यांचे प्रदेशाध्यक्षपद गेले होते.

फक्त बैठकीत झोपल्यामुळे पंतप्रधानपद गमावलेले प्रदेशाध्यक्ष म्हणून एस.एम.आय. असीर यांची इतिहासात नोंद झाली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.