बिकिनी ते बुरखा- इराणमधील अशी घटना ज्यामुळे महिला केस कापतायेत, हिजाब जाळतायेत

पाहुण्या राहुळ्यांच्या भेटी गाठी घेऊन त्यांची ख्याली-खुशाली विचारणे हा प्रघात सगळीकडेच आहे. त्यासाठी सगळे पाहुण्यांच्या गावी हातात. असाच काहीसा प्लॅन बनवून एक २२ वर्षाची इराणी महिला महसा अमीनी आपल्या परिवारासोबत राजधानी तेहरानमधून कुर्दिस्तानकडे जात होती. सगळे जण नातेवाईकांना भेटण्यासाठी उत्सुक होते.

सर्व काही ठीक होतं फक्त एका गोष्टीचं पालन तिने केलं नव्हतं. तिने इराणच्या कायद्यानुसार डोक्यावर हिजाब घातला नव्हता…

रस्त्यामध्ये असतांना ही गोष्ट जेव्हा इराणच्या मोरॅलिटी पोलिसांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी महसाला अटक केली. कुटुंबाने याला विरोध केला पण पोलिसांनी ऐकलं नाही. अटकेनंतर जेलमध्ये तिला बेदम मारहाण करण्यात आली; इतकी की त्याच्यामुळे ती थेट कोमात गेली. ती कोमात गेल्यामुळे तिला  हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं पण हॉस्पिटलमध्ये असतांनाच तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला.

तिच्या मृत्युनंतर ही बातमी सगळीकडे पसरली आणि इराणमध्ये तिला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली. 

तेहरान शहराबरोबरच पश्चिम इराणमध्ये अनेक महिलांनी आपले हिजाब आणि बुरखे काढून रस्त्यावर फेकले. अनेक महिलांनी आपले केस कापले आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले. महसाला न्याय मिळवून देण्यासाठी केल्या जाणाऱ्या या आंदोलनात मोरॅलिटी पोलीस आणि इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या नवीन नियमांचा विरोध सुरु झाला.

कारण ऑगस्ट २०२१ मध्ये रईसी हे सत्तेत आले. तेव्हापासून सातत्याने महिलांचे स्वातंत्र्य आणि अधिकार कमी करण्याचे कायदे पुन्हा कठोर होत आहेत. त्यामुळे महिला रईसीच्या विरोधात उभ्या राहत आहेत. 

पण आज जरी इराणमध्ये बुरखा न घालण्यामुळे महिलांना मरेपर्यंत मारहाण केली जात असली तरी पूर्वी अशी परिस्थिती नव्हती.

इराणमध्ये १९७९ ची इस्लामिक क्रांती घडून येण्यापूर्वी देशात पहलवी राजघराण्याची सत्ता होती. त्या काळात ईराण एक धर्मनिरपेक्ष देश होता. याच राजघराण्यातील दुसरे राजे मोहम्मद राजा शाह यांनी देशात मोठ्या धार्मिक सुधारणा घडवून आणल्या होत्या.त्यांनी देशात आधुनिक शिक्षण रुजवलं, आधुनिक खानपान आणि कपडे घालण्याचे स्वातंत्र्य दिले होते. 

त्यामुळे इराणी महिला बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर फिरू शकत होत्या. 

परंतु शाह यांच्या सुधारणांना इराणमधील अनेक मुल्लांचा विरोध होता. त्यांनी शाह यांच्या सुधारणावादी प्रयत्नांना इस्लामविरोधी ठरवण्यास सुरुवात केली.

शाह हे अमेरिकेच्या हातातील बाहुलं आहे आणि तो इस्लामच्या संस्कृतीला नष्ट करत आहे असा प्रचार मुल्ला करायला लागले. त्यामुळे लोकं शाहाच्या विरोधात उभे व्हायला लागले. १९७८ सालात राजधानी तेहराणच्या शाहयाद चौकात तब्बल २० लाख लोकं एकत्र आले आणि त्यांनी शाहच्या विरोधात प्रदर्शन केलं. या प्रदर्शनामुळे शाह यांनी देश सोडला आणि ते अमेरिकेत गेले.

शाहने देश सोडल्यानंतर आयतोल्लाह खामोनी यांनी इस्लामिक क्रांती घडवून आणली आणि महिलांचे अधिकार पुन्हा एकदा समाप्त करण्यात आले.    

नोकऱ्या, व्यवसाय, सार्वजनिक कामं या सगळ्या गोष्टींचे अधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यात आले.  मुक्तपणे बिकिनी घालणाऱ्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्याची सक्ती करण्यात आली. ९ वर्षावरील मुलींपासून सर्व महिलांवर हा नियम लागू करण्यात आला. याचं उल्लंघन केल्यास कारावासाची शिक्षा आणि दंडाची तरतूद केली गेली.

या नियमांच्या अंलबजावणीसाठीच २००५ मध्ये मोरॅलीटी पोलिसांची निर्मिती करण्यात आली.

मोरॅलीटी पोलीस संपूर्ण देशात महिलांच्या कपड्यांवर लक्ष ठेवतात. जर कोणती महिला सार्वजनिक ठिकाणी हिजाब आणि बुरखा घालत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. पोलिसांच्या या कारवाईत महिलांना मारहाण आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याची अलिखित पद्धत सुरु झाली. याबद्दल मरिना नेमत यांनी त्यांच्या ‘प्रिजोनर ऑफ तेहरान’ या पुस्तकात सांगितलंय.

परंतु हसन रुहानी यांच्या काळात परिस्थिती थोडीफार सुधारायला लागली होती.

२०१३ मध्ये इराणचे राष्ट्रपती झालेल्या हसन रुहानी यांनी महिलांना काही प्रमाणात अधिकार देण्यास सुरुवात केली. हिजाब आणि बुरखा घालण्याचे नियम काही अंशी शिथिल कारण्यात आले. तसेच मोरॅलीटी पोलिसांच्या कारवाया सुद्धा कमी झालेल्या होत्या.

पण ऑगस्ट २०२१ मध्ये रुहानी यांचा पराभव करून इब्राहिम रईसी राष्ट्रपती झाले. सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरियानुसार कडक कायदे केलेत. पूर्वी ९ वर्षाच्या मुलीवर लागू असलेला हा कायदा आता ७ वर्षाच्या मुलींवर सुद्धा लागू होतो. १२ जुलै २०२२ रोजी नवीन कायदे लागू करण्यात आले. त्यानिमित्त्य हिजाब आणि शुद्धता दिवस सुद्धा पाळण्यात आला होता.

पण रईसीने लागू केलेल्या नवीन नियमांचा विरोध करण्यासाठी अनेक महिलांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखे आणि हिजाब काढून फेकले होते आणि कायद्याविरोधात आंदोलनं केली होती. मात्र आता महसा अमीनीच्या मृत्यूमुळे आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप मिळालंय. 

ज्या ठिकाणी महसाचा मृत्यू झाला त्या तेहरान विद्यापीठात आणि शहरात आंदोलनाला सुरुवात झाली. महिला त्यांचे हिजाब काढून त्यांना जाळत आहेत. काही जणी त्यांचे केस कापत आहेत आणि याबद्दलचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून राष्ट्रपती रईसी यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. 

या आंदोलनात “हुकूमशहाला मरण द्या!!” असे नारे देण्यात येत आहेत. 

इब्राहिम रईसीचा इतिहास हा महिलांवर केलेल्या अत्याचारांनी भरलेला आहे. अल्पवयीन आणि गर्भवती महिलांवर सुद्धा त्याने अत्याचार केलेत. त्यामुळे त्याला इराणचा कसाई म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच या आंदोलनात महिलांसोबत पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते आणि सुधारणावादी पुरुष सुद्धा सहभागी झालेले आहेत. ते सर्वांना एकत्र येण्याचं आणि सरकारविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन करत आहेत.

हे ही वाच भिडू  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.