५ महिन्यात ५ हजार लोकं कमी केलेत, स्टार्ट-अप्सचा फुगा देखील फुटण्याचा मार्गावर?
आपल्याकडे एक म्हण आहे. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. भारताच्या अर्थव्यवस्थेत सध्या तसंच काहीतरी होत असल्याचं दिसत आहे. करोनानंतर जोमात निघालेल्या अर्थव्यस्थेच्या गाडीचा वेग कमी झाल्याची चिन्ह आहेत. त्यात अर्थव्यस्थेचा कणा असलेल्या आयटी क्षेत्रावर देखील मंदीचं वारं घोंगावू लागला आहे.
अन् त्यात आता स्टार्टअप्सची भर पडतेय का ?अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे.
गेल्या ५ महिन्यात भारतातल्या स्टार्टअप्सनी ५६०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे.
करोनाच्या लॉकडाऊनमध्ये जोमात आलेल्या वेदांतू ,अनअकॅडमी सारख्या ऑनलाइन शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्टार्टअप्सनी अनुक्रमे ४२४ आणि ६०० कर्मचारी कमी केले आहेत. ईकॉमर्स ककंपनी मेशोने देखील १५० कर्मचाऱ्यांना घरी बसवलंय.
जरी कर्मचाऱ्यांचा आकडा बघून मोठा वाटत नसला तरी या स्टार्टअप्समध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्या पहिली तर ९ ते १०% कर्मचारी कमी केल्याचं कळतं.
गेलं वर्ष भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टिमसाठी सर्वात भरभराटीचं वर्ष ठरलं होतं. नोव्हेंबर २०२१ मध्ये भारत जागतिक स्तरावर स्टार्टअप्ससाठी तिसरी सर्वात मोठी इकोसिस्टम म्हणून उदयास आला होता. भारतातल्या ६३४ जिल्ह्यांमध्ये ५९,००० हून अधिक स्टार्टअप्स असल्याची नोंद सरकारदरबारी होती. इन्व्हेस्ट इंडिया या एजन्सीनुसार भारतीय स्टार्टअप इकोसिस्टममध्ये गुंतवणूकदारांच्या संख्येत ९ पट वाढ झाली आहे, स्टार्टअपच्या एकूण निधीमध्ये ७ पट वाढ झाली आहे आणि इनक्यूबेटरच्या संख्येत ७ पट वाढ झाली आहे.डिसेंबर २०२१ पर्यंत भारतात एकूण ७९ युनिकॉर्न स्टार्टअप्स होते.
त्यातले ४२ युनिकॉर्न एकट्या २०२१ मध्ये तयार झाले होते. २०२० आणि २०१९ मध्ये अनुक्रमे १० आणि ९ युनिकॉर्न तयार झाले होते.
एवढे आकडे ह्यासाठी दिली कि तुम्हाला कळावं की स्टार्टअप इकोसिस्टिमची गाडी भारतात किती जोमात होती.
मग एवढं सगळं असताना भारतातल्या स्टार्टअप्सची गाडी नेमकी कुठं खोळंबली तेच बघू.
तर सुरवात करू करोनानंतर आलेल्या अर्थव्यवस्थेतील ट्रेंड पासून.
लॉकडाऊनमुळे गंडलेल्या अर्थव्यवस्थानमध्ये तेजी आणण्यासाठी जगभरातल्या रिझर्व बँका अर्थव्यस्थेत मोठ्या प्रमाणात पैसा ओतत होत्या.
यातलं काही पैसा लोकांकडे पोहचला तर काही इन्व्हेस्टमेंट सिस्टिममध्ये आला. त्यानंतर मग जगभरातल्या गुंतवणूकदारांनी हा पैसा गुंतवण्यासाठी नवनवीन संधी शोधायला सुरवात केली. मग भारताच्या वाढत्या स्टार्टअप इकोसिस्टममध्ये त्यांना एक आकर्षक संधी दिसली. डर के आगे जीत है म्हणत रिस्क घेऊन पैसे लावण्यास तयार असणाऱ्या व्हेंचर कॅपिटलिस्टनी भारताततल्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.
परिणामी भारताच्या स्टार्टअप इकोसिस्टमची झपाट्याने वाढ झाली ज्याची आकडेवारी आपण वरती बघितलीच.
मग आता प्रश्न येतो स्टार्टअप्सवाल्यानी या पैशाचे काय केले. तर त्यांनी मग सेल्स,मार्केटिंग, डिस्कॉउंटवर तुफान पैसा खर्च केला. झोमॅटो, पेटीएम ते अगदी झेप्टोपर्यंत आपल्याला जी भरमसाट डिस्काउंट मिळत होती ती अशीच मिळत होती. पैसा मोठ्या प्रमाणात येत होता त्यामुळं त्यानं रिझल्टदेखील तसाच द्यायचा होता. त्यामुळं त्यांनी तुफान पैसा कस्टमर बेस वाढवण्यासाठी ओतला.
यामुळं रेव्हेनु जरी वाढत असला तरी प्रॉफिटच्या नावाने बोंब होती. तेवढ्यात घडल्या या घटना.
नीट वाचा सोपं आहे आणि समजलं तर अगदी नीती आयोगाचा सदस्य झाल्याचा फील येइल. पाहिलं युक्रेनमध्ये युद्ध झालं. त्यामुळं इंधनाच्या किंमतीत वाढ झाली. महत्वाच्या प्रोड्क्टसची सप्लाय चेन देखील खंडित झाली. ज्यामुळे जगभर महागाईची लाट उसळली.
मग महागाई कमी करण्यासाठी जगभरातल्या रिझर्व्ह बँकांवर दबाव वाढला.
झालं! मग त्यांनी अर्थव्यस्थेत पैसे ओतण्यापासून हात आखडता घेतला, व्याजदर वाढवले. त्यामुळं मग बाजारात पैशांचा पुरवठा कमी झाला. मंदीच्या शक्यता वर्तवण्यात आल्या. इतक्या दिवस २१ दिन मे पैसा डबल करण्याचा मागे असणारे व्हेंचर कॅपिटॅलिस्टनी आहे ते पैसे वाचवण्याचा मागे वळले. त्याचबरोबर आधी लावलेल्या पैश्यानवर त्यांना म्हणावे तसे रिटर्न्स मिळालेच नव्हते. उलट नुकसानच झालं होतं.
उदाहरणच घ्याचे झाल्यास टायगर ग्लोबल आणि सॉफ्टबँक या दोन आघाडीच्या व्हेंचर कॅपिटॅलिस्टचं घेता येइल.
टायगर ग्लोबलच्या टेक पोर्टफोलिओला $१७ बिलियनचे नुकसान झाले आहे, तर सॉफ्टबँकला $१३ बिलियन नुकसान झालं आहे.
इतक्या दिवस या व्हेंचर कॅपिटॅलिस्टच्या फंडिंगवर पैसे उधळत सुटणाऱ्या स्टार्टअप्सचे मात्र यामुळे वांदे झाले. यातल्या अनेकांना तर स्थापना होऊन १०-१० वर्षे झाली तर १ रुपयाचा प्रॉफिट काढता आला नव्हता. कारण त्यांचा गेमच पूर्ण फंडिंगवर चालत होता.
मग आता भविष्याबद्दल चिंता निर्माण झाल्याने या स्टार्टअप्सनी खर्चात कपात करायला सुरवात केली आणि त्यातूनच मग कर्मचाऱ्यांना कमी करण्यासारखे उपाय चालू झाले आहेत. त्यातच काही व्हीसीजनी पैसा देखील काढून घेण्यास सुरवात केली.
पेटीएम मॉल मधून जॅकमाने आपलं ४३% टक्के शेअर्स नुसत्या ४२ करोडला विकून पैसा काढून घेतले होते.
मग पहिला प्रश्न येतो ह्या व्हीसीज म्हणजे व्हेंचर कॅपिटॅलिस्टनी या कंपन्यांवर एवढे पैसे लावलेच कसे. तर ह्यां मोठ्या गुंतवणूकदारांना एक स्वप्न विकायचं असतंय. त्यानं एक गोष्ट सांगायची असते ज्यामध्ये तुमची आयडिया ही कशी बिलियन डॉलर आयडिया आहे असं पटवून द्यायचं असतंय.
Great entrepreneurs start as great storytellers
अशी म्हणच तयार झाली होती. मग सांगितल्या गेल्या गोष्टी. जशा की तुम्ही जरी एक ऑनलाइन पेमेंटसाठीचा प्लॅटफॉर्म चालवत असाल तर भविष्यात जाऊन तुम्ही त्याची एक बँक कराल मग ईकॉमर्स क्षेत्रात उतराल, लोकं बस पासून विमानापर्यंत तिकिटं तुमच्याच प्लॅटफॉर्म्सवर काढतील असं सगळं ‘व्हिजन’ मांडण्यात आलं.
काई नाही ही जी तुम्हाला स्टोरी सांगितली आहे ती पेटीएमची आहे. असंच ‘मार्केट डीस्रप्ट’ करण्याचं स्वप्न स्टार्टअप्सनी दाखवलं आणि वॅल्युएशनच्या जीवावर बिलियन डॉलर कंपन्या झाल्या. कधी कधी तर अशा गोष्टी बनवतना ज्याचे हे स्टार्टअप्स आहेत त्यांनादेखील आपण सांगतोय ते दिव्यस्वप्न आहे हे माहित असणार मात्र पैस्यांच्या पुढे ते सगळं मागे पडत गेलं.
मात्र याचवेळी झोहो, झेरोदा यांनी यामागे न पळता जसा इन्कम येइल तशा कंपन्या वाढवत नेल्या आणि त्यांच्या बॅलेन्स शीट्स चांगल्या स्थितीत आहेत.
त्यामुळं आता या मंदीच्या फेऱ्यातून मार्ग काढताना स्टार्टपसाचा खरा कस लागणार आहे.
हे ही वाच भिडू :
- TCS, Infosys सारख्या कंपन्यांची तेजी कमी झालीये, IT वाल्यांचं काय होणार ?
- 2008 मध्ये एकही युनिकॉर्न स्टॉर्ट-अप नसलेल्या मुंबईनं आज बेंगलोरला गाठत आणलंय
- तुमची स्टार्ट- अपची आयडिया भारी आहे, फक्त फंडिंगची सोय अशाप्रकारे करू शकता