मोदींचे बेस्ट फ्रेंड सत्तेतून गेले, आता भारत – इस्रायलच्या संबंधांवर काय परिणाम होईल?

सगळ्या जगाच लक्ष लागून राहिलेल्या इस्रायलच्या राजकारणाचा अखेर निकाल लागलाय.

इस्रायलचे नवे पंतप्रधान म्हणून रविवारी नफ्ताली बेनेट यांनी शपथ घेतली. एकेकाळी माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे अगदी जवळचे मानले जाणारे बेनेट यांनी त्यांच्याच चुकीच्या धोरणांना विरोध करत पंतप्रधानपदी बाजी मारली. नेतान्याहू यांची १२ वर्षाची सत्ता संपवण्यासाठी  बेनेट यांनी मध्यम आणि डाव्या गटातील पक्षांशी हातमिळवणी केली.

थोडक्यात ज्यांच्या हाताला धरून राजकारणात आले त्यांनाच सध्या खुर्चीवरुन खाली खेचलं आहे.

मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या यमीना पक्षाने १२० सदस्यांच्या नेसेट (इस्त्रायली संसद) मध्ये अवघ्या सात जागा जिंकल्या. पण नेतन्याहू किंवा आपल्या विरोधकांपुढे गुढगे न टेकता ते   ‘किंगमेकर’ म्हणून समोर आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा .. 

भारताचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे इस्रायलच्या नवीन पंतप्रधानांचे अभिनंदन केले. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले कि, “आपण  पुढच्या वर्षी आपले  राजनैतिक संबंध उन्नत करण्याचे ३० वर्षे पूर्ण करत आहोत  आणि या निमित्ताने मी आपणास भेटण्यासाठी  आणि दोन्ही देशांमधील सामरिक भागीदारी आणखी बळकट करण्यासाठी उत्सुक आहे. “

यादरम्यान, मोदी आपले  मित्र नेतन्याहू यांनासुद्धा विसरले नाही. पंतप्रधानांनी ‘यशस्वी’ कार्यकाळाच्या समाप्तीसाठी  नेतान्याहुंचे कौतुक केले आणि  भारत-इस्त्राईल सामरिक भागीदारीकडे वैयक्तिक लक्ष दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. 

इस्त्रायल – भारत संबंधावर  काय होईल परिणाम ?

इस्त्रायलचे माजी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यकाळात इस्त्रायल आणि भारताचे खूप चांगले होते. या दरम्यान मोदी आणि नेतान्याहू यांची मैत्रीही कोणापासून लपून राहिलेली नाही. मात्र बेनेट सरकारमध्येही हे संबंध असेच राहतील का? असा प्रश्न इथं तयार होतो. 

तर, यावर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, नेतान्याहू यांच्याऐवजी नफ्ताली बेनेट पंतप्रधान म्हणून निवडून आल्याने भारत इस्त्रायलच्या ‘अतूट’ मैत्रीवर कोणताही परिणाम होणार नाही.

पश्चिम आशियाई प्रकरणांचे तज्ज्ञ कमर आगा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले की,

सत्तेत बदल झाल्यानंतरही भारत-इस्त्रायलचे संबंध पुढे जातील. त्यांच्यामते नाती एका माणसावर अवलंबून नसतात. ही नाती बऱ्याच वर्षांपासून वाढली आहेत आणि यापुढेही वाढत जातील.

त्यांनी सांगितले कि,  नफ्ताली आणि नेतान्याहू यांच्या विचारसरणीत काही फरक नाही. दोघेही कट्टर राष्ट्रवादी आहेत आणि भारतातही पंतप्रधान मोदींची प्रतिमा राष्ट्रवादी नेत्याची आहे.

आगा यांनी सांगितलं कि, भारतासोबतच्या संबंधामुळे इस्त्रायलला खूप फायदा आहे. कारण भारत इस्त्रायलकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं विकत घेत. आणि भारतानंतर इतर देशही त्याच्याकडून हत्यारं घेत असतात. ज्यामुळे दुसऱ्या देशांशीही संबंध जोडले जातात. याच कारणांमूळे भारत – इस्त्रायल संबंध नव्या सरकारमध्येही पुढे जातील.

पॅलेस्टाईनचा मुद्दा

गेल्या अनेक वर्षांपासून इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद सुरु आहे. त्यात इस्त्रायलचे नवे पंतप्रधान नफ्ताली बेनेट पॅलेस्टाईन स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत. यावर कमर आगा यांनी संगितलं कि,

‘बेनेट सरकारची  इच्छा असेल कि, भारताने पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर त्यांच्यासोबत यावे. पण भारत असं करणार नाही. कारण भारताच्या म्हणण्यानुसार पॅलेस्टाईन वादाचा तोडगा हा दोन देश बनवण्यात आहे. यात संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावांना लागू करायला हवे.

तस पहायचं झालं तर, इस्त्रायलला भारताकडून आणखी एका गोष्टीची गरज आहे, ती म्हणजे पश्चिम आशियात सुरु असलेल्या चढाओढीत टिकून राहण्यासाठी. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पश्चिम आशियात चीन जास्त वेगाने पुढे जातोय. त्यामुळे इस्त्रायलला पुढे जाऊन केवळ अमेरिकाच नाही तर भारताचीही तितकीच गरज आहे.

हे ही वाच भिडू  :

Leave A Reply

Your email address will not be published.