६ जागांच्या जोरावर हा माणूस नेतन्‍याहूंची १२ वर्षांची खुर्ची काढून घेण्याच्या तयारीत आहे

जगात कुठेही जावा, अगदी गल्ली पासून दिल्ली पर्यंत आणि दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत. इथं भाषा, प्रांत, जात-पात या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतील, पण मात्र एक सगळ्या ठिकाणी गोष्ट कॉमन असती ती म्हणजे राजकारण.

नेता, पक्ष, गट-तट, आणि त्याभोवती फिरणार राजकारण.

या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय आहेत, समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळेच अमेरिकेत निवडणुकांची मतमोजणी चालू असली तरी आपल्याकडे गावात त्याची चर्चा सुरु असते. कोण येईल किंवा कोण आलं हा प्रश्न हमखास विचारला जातोच, आणि भारतात निवडणूक सुरु असली तरी तिकडे न्यूयॉर्कमध्ये त्यावर पैजा लागलेल्या असतात.

आता देखील काहीस असचं. राजकीय धुरळा तिकडे इस्रायलमध्ये सुरु आहे पण कालपासून त्याच्या चर्चा भारतात झाडायला सुरुवात झाली आहे. त्याला कारण पण तसंच आहे. कारण नेसेटमध्ये (इस्रायलची संसद) अवघा ६ जागा नेता तिथले मागचे १२ वर्षांपासूनचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची काढून घेण्याच्या तयारीत आहे.

त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष सध्या इस्रायलकडे लागलं आहे. आणि तसंही भारतासाठी तर इस्रायल शेतकऱ्यांपासून अगदी मोदींपर्यंत सगळ्यांसाठी महत्वाचा देश आहे. त्यामुळे भारताचं लक्ष लागणं साहजिक गोष्ट आहे.

नेमकं काय सुरु आहे सध्या इस्रायलमध्ये?

गाझापट्टी-पॅलेस्टाइनसोबतचा धुरळा खाली बसवल्यानंतर आता पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या समोर राजकीय धुरळा सुरु झाला आहे. इस्रायलमध्ये सध्या विरोधकांची एकजूट झाली असून, येत्या १ ते २ दिवसात नेतन्याहू सरकार कोसळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याचं कारण म्हणजे नेतन्याहू यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या नेत्यानचं विरोधी पक्षांसोबत चर्चा सुरू केली आहे.

वास्तविक इस्रायलच राजकारण मागच्या २ वर्षांपासूनच अत्यंत अस्थिर आहे. तिथं २ वर्षात ४ निवडणुका पार पडल्या आहेत. पण त्यानंतर देखील नेतन्याहू आणि त्यांच्या लिकुड पक्षासह दुसरा कोणताही पक्ष किंवा एकही नेता तिथं स्थिर सरकार देऊ शकलेला नाही.

थोडक्यात सांगायचं तर आपल्याकडे १९९८-१९९९ या दोन वर्षात जशी राजकीय अस्थिरता होती अगदी तशीच काहीशी अस्थिरता आता तिथं सुरु आहे.

या सगळ्याला कारण सांगितलं जात आहेत ते म्हणजे नेतान्याहूयांच्या वरील आरोप. २००९ च्या निवडणुकींपासून लाचखोरी, पैशांची अफरातफर असे अनेक आरोप नेतान्याहू यांच्यावर सातत्यानं होत आहेत. त्यावरुन त्यांच्यावर तिथल्या न्यायालयामध्ये केस देखील सुरु आहे.

सोबतच तिथली निवडणूक प्रक्रिया देखील बहुमत न मिळण्यासाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. इस्रायलमध्ये प्रपोशनल रिप्रेझेंटेशन या पद्धतीअंतर्गत निवडणूक पार पडत असतात. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणं ही एक अवघड गोष्ट समजली जाती.

मार्चमध्ये देखील असचं झालं. नेतन्याहू बहूमत सिद्ध करण्यासाठी अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या नंबरवर असलेल्या येश एतिड या पक्षाला आणि त्याचे नेते येर लेपिड यांना सरकार बनवण्यासाठी संधी देण्यात आली आहे. त्यांना बहूमत सिद्ध करण्यासाठीची मुदत उद्या म्हणजेच २ जून पर्यंत देण्यात आली आहे.

युद्धामुळे लांबली होती प्रक्रिया…

खरंतर नेतन्याहू बहूमत सिद्ध न करु शकल्यानंतर येर लेपिड यांना सरकार बनवण्यासाठी २८ दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण गाझापट्टी संघर्षामुळे यावर परिणाम झाला. सोबतच या सगळ्या गोंधळात त्यांचा सहयोगी पक्ष अरब इस्लामिस्ट पार्टीने स्वतःला आघाडी स्थापन करण्यासापासून लांब ठेवलं.

यानंतर आता पारडं पुन्हा नेतन्याहू यांच्या विरोधात गेलं आहे, आणि हे इतकं विरोधात गेलयं की कधी काळचा त्यांचा जीवश्य कंठश्य मित्र आणि संसदेत अवघ्या ६ जागा असलेला माणूस नेतन्याहू यांची १२ वर्षांची कारकीर्द संपुष्टात आणून स्वतः पंतप्रधान बनण्याच्या वाटेवर आहे.

त्यांचं नाव म्हणजे नफ्ताली बेनेट.

सध्या इस्त्राययमध्ये लिकुड पक्ष २९ जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. त्यानंतर येर लेपिड यांच्या येश एतिड पक्षाला १७ जागा आहेत. तर नफ्ताली बेनेट यांच्या यामिन पक्षाला अवघ्या ६ जागा आहेत. मात्र विरोधी पक्षांच्या आघाडीशी हातमिळवणी केल्यामुळे लेपिड सध्या किंगमेकर आणि किंग अशा दोन्ही भुमिका निभावण्याच्या तयारीत आहेत.

नफ्ताली बेनेट यांनी म्हटले आहे की,

माझे मित्र येर लेपिड यांच्यासोबत युती सरकार स्थापन करण्यासाठी मी प्रयत्नशील आहोत. दोन्ही पक्ष मिळून इस्रायलच्या अनियंत्रित अधोगतीला थांबवण्याचा तसंच देशाला पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. सोबतच हा निर्णय इस्त्रायली जनतेवर पाचवी निवडणूक लादण्यापासून वाचवू शकतो.

पण या सगळ्या पलिकडे जावून बेनेट यांची ओळख सांगणं गरजेच आहे.

तर कमांडो म्हणून काम केलेले बेनेट म्हणजे बेंजामिन नेतन्याहू यांचे एकेकाळचे सर्वात जवळचे आणि विश्वसनीय सहकारी. यांच्या मैत्रीच एक उदाहरण सांगायचं झालं तर बेनेट यांनी आपल्या मोठ्या मुलाचं नाव नेतन्याहू यांच्या मोठ्या भावाचं नाव योनी नेतन्याहू यांच्या नावावरुन ठेवलं आहे.

बेनेट यांनी याआधी नेतन्याहू यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदही सांभाळलं होतं. या काळात त्यांनी लिकुड पक्षातले नेतन्याहू यांच्या नंतरचे सर्वात ताकदवान नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित केलं होतं. त्याशिवाय वेस्ट बँकच्या मुद्याबाबत देखील त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

थोडक्यात भारतात ज्या प्रमाणे मोदींसाठी अमित शहा आहेत अगदी तसंच काहीसे नेतन्याहू यांच्यासाठी बेनेट होते.

पण २०१३ मध्ये बेनेट यांनी यामिन हा आपला स्वतंत्र पक्ष स्थापन करत इस्त्रायली राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. निवडणूका देखील स्वतंत्र लढल्या. मात्र निवडणूक झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या मित्राला म्हणजेच बेंजामिन नेतन्याहू यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या मंत्रीमंडळात सर्वात वरिष्ठ मंत्री म्हणून काम केलं.

या काळात त्यांनी संरक्षण, अर्थ, शिक्षण अशा अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी संभाळली. सोबतच मंत्रिमंडळातील सर्वात धनाड्य मंत्री म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. 

पण नेफ्ताली यांनी सध्या पुन्हा आपला मार्ग बदलला आहे. इस्त्रायलमधील डाव्या विचारांच्या पक्षांशी सध्या त्यांनी हातमिळवणी केली आहे. सोबतच बहूमत सिद्ध करण्यासाठी त्यांना अरब समर्थित मुस्लिम राजकीय पक्षांची गरज भासणार आहे.

या सगळ्या प्रयत्नांवर आणि येर लेपेड यांच्या हलचालींवर नेतन्याहू यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणतात,

नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली म्हणजे इस्रायलच्या नागरिकांसोबत धोका आहे. देश सध्या संकटातून जात असून राजकारण करण्याची ही वेळ नाही. सोबतच नवीन सरकार शेजारी राष्ट्रांसोबतचे राजकीय संबंध कसे हाताळेल? हा देखील एक प्रश्न आहे.

पण सौ बात की एक बात सांगायची झाली तर सध्या इस्त्रायलमध्ये सध्या डाव्या विचारांचे, उजव्या विचारांचे आणि मध्यममार्गी विचारांचे असे सगळे पक्ष एकत्र येताना दिसत आहेत. मात्र तिथल्या स्थानिक वृत्तांनुसार हा सगळा खटाटोप केवळ आणि केवळ नेतन्याहू यांना सत्तेपासून लांब ठेवण आणि त्यांची राजकीय कारकिर्द संपुष्टात आणणं यासाठीचं सुरु आहे.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.