जॅकी श्रॉफचं नाव ऐकताच दाऊदची टरकली…

मुंबईचा वाळकेश्वर एरिया आणि तीन बत्ती चाळ. ते ८० चं दशक होतं. या तीन बत्ती चाळीत ऐक डॉन रहायचा. त्याचं वय जेमतेम १६-१७ वर्ष.

मुंबईतल्या अंडरवर्ल्डचे दोन प्रकार पडतात.

पहिला प्रकार दाऊद, टायगर मेनन, अबु सालेम यांच्या सारख्या लोकांचा. त्यांनी मुंबई नासवली. दिवसाढवळ्या खून होवू लागले. दूसरा प्रकार यापुर्वी होता करिम लाला, सुल्तान मिर्झा सारख्या माणसांचा. अशी माणसं लोकांना मसीहा वाटायची. दोन नंबर करणाऱ्या लोकांचे ऊसूल असायचे.

त्यानंतरच्या काळात मुंबईच्या चाळीत अनेक भाई देखील झाले. अरुण गवळी सारखे काही भाई मोठे झाले तर काही मारले गेले. हे भाई चाळीसाठी दैवत असायचे. लोकांच्या मदतीला धावून जायचे.

असाच एक डॉन होता तो म्हणजे हेमंत श्रॉफ.

हेमंतच वय होतं १७ आणि जयकिशनच वय होतं १०. दोघे सख्खे भाऊ. जयकिशन भित्रा होता. आईच्या पाठीमागे रहायचा. तर हेमंत हा खऱ्या अर्थाने भाई होता.

हेमंत वयाच्या १७ व्या वर्षी समुद्रात बुडून वारला. जेव्हा हेमंत बुडत होता तेव्हा भित्रा जयकिशन तिथेच होता. स्वत:च्या भावाला बुडताना त्याने पाहिलं पण तो काहीच करु शकला नाही.

या घटनेनंतर जयकिशन आतून बाहेरून बदलून गेला. आईचा पदर घेवून चालणारा जयकिशन धाडसी झाला. तीन बत्ती चाळीसाठी हा ओळखीचा चेहरा झाला. त्याचंच नाव जॅकी श्रॉफ.

जॅकी डॉन नव्हता, मात्र तो अडल्या नडल्याच्या मदतीला जाणारा अस्सल भिडू मात्र नक्कीच होता.

मुंबईची भाईगिरी, टोळी ही त्याच्या परिचयाची होती. अडल्यानडल्यानंतर त्याच्या मागे उभा राहणारी त्याची खास माणसं होती. तो काळ गॅंगवारच्या मुंबईचा नव्हता तर एकमेकांसाठी हात देणाऱ्या वेगळ्याच भाईगिरीचा होता.

कट टू काळ सरकला…

बस स्टॉपवर उभा राहिलेल्या जॅकी श्रॉफला मॉडेलिंगची ऑफर आली. तिथून पुढे देव आनंद साहेबांनी त्याला स्वामी दादा या पिक्चरमध्ये शक्ती कपुरचा साईडर म्हणून उभा केला. सुभाष घई यांनी त्याला “हिरो” म्हणून लॉन्च केला आणि बॉलिवूडला खराखुरा भाई मिळाला.

९० च दशक.

इथे जॅकी श्रॉफ बॉलिवडूच्या स्टार पैकी एक होता. दूसरीकडे मुंबईला डॉनगिरीने ग्रासल होतं. बॉलिवूड हे पैसे मिळवून देणारा हुकमी एक्का आहे हे ओळखून दुबईच्या भाईने इथे बस्तान मांडल होतं.

बॉलिवूडच्या प्रॉड्युसरना सर्वात मोठ्ठा सहारा होता तो दाऊदचा. स्टार लोकांनी खट्ट केलं की हे प्रोड्युसर दुबईच्या भाईला फोन लावून आपलं काम आपल्या अटीनुसार पुर्ण करुन घेत असत.

अशीच एक जोडी होती समीर हनीफ या प्रोड्युसरची. समीर हिगोंरा आणि हनीफ ताडावाला. हे दोघं दाऊदच्या जवळची माणसं म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी दिव्या भारती आणि जॅकी श्रॉफ यांना एकत्र घेवून दिलं हि तो हैं या पिक्चरचं शुटिंग सुरू केलेलं होतं.

पिक्चरचं शुटिंग सुरू करण्यात आलं. पण अपेक्षित वेळेपेक्षा हे शुटिंग लांबल. तारखा पुढे ढकलण्यात आला. जॅकी श्रॉफ आपल्या पुढील तारखा इतर सिनेमांना दिवून बसला होता त्यामुळे त्याला आत्ता या नव्या तारखांसोबत जुळवून घेणं अशक्य होतं.

झालं अस की जॅकी ने नवीन तारखा दिल्या नाहीत आणि फिल्मच शुट रखडलं.

या पिक्चरचं दिग्दर्शन असरानी करत होते.  समीर आणि हनीफचे पैसे अडकल्यामुळे त्यांना कोणत्याही परस्थितीत फिल्मच शुट लवकर पुर्ण करायचं होतं.

त्यामुळे समीर आणि हनीफ आत्ता शेवटचा उपाय म्हणून टायगर मेमन याच्याकडे गेले. त्याने दाऊदच्या कानावर ही गोष्ट घालून दाऊद जॅकीला धमकावू शकतो याचं वचन समीर हनीफ या जोडीला दिले.

टायगरने ही गोष्ट दाऊदच्या कानावर घातली.

दाऊदने हिरोचं नाव विचारताच टायगरने जॅकी श्रॉफचं नाव सांगितलं.

जॅकीचं नाव ऐकताच, दाऊदने हात वर केले.

दाऊद म्हणाला,

तो जग्गू दादा असल्यापासून माझ्या माहितीतला आहे. त्याच्या मी कधीच आडवं गेलो नाही व यासाठी मी त्याला फोन करुन मला त्याच्यासोबत वैर घ्यायचं नाही.

दाऊदनेच हात वर केल्यानंतर जग्गू दादाला धमकावण्याची हिंम्मत इतर कोण करणं अशक्य होतं. यानंतर जॅकी श्रॉफच्या वेळेनुसार फिल्मचं शुट पार पडलं आणि पिक्चर रिलीज करण्यात आला.

पुढे जेव्हा गुलशन कुमार यांच्या हत्येसंदर्भात दुबईच्या पार्टीत उपस्थित राहिल्याबद्दल सलमान खान, शाहरूख खान आणि जॅकी श्रॉफ यांची चौकशी करण्यात आली तेव्हा शाहरूख घामाने भिजला होता.

सलमानने आपली चौकशी चोरून गुप्तपणे करण्यात यावी म्हणून गळ घातली मात्र जॅकी थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीसांच्या प्रश्नांना हसत खेळत उत्तर देवू लागला. त्यानंतर तो आपल्या स्टाईलने मिडीयासमोर देखील निवांतपणे आला.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.