बापूंच्या नावाने मिळालेला पुरस्कार समीर वानखेडे यांना देखील अभिमानास्पद वाटतो..

समीर वानखेडे म्हणजे सध्याचे राज्यातील सर्वात चर्चेत असलेले आणि दबंग ऑफिसर. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्स पकडल्यानंतर ते सध्या माध्यमांच्या हेडलाईनमध्ये आहेत. २ वर्षांपूर्वी देखील ते चर्चेत होते आणि त्यांच्यासोबतच आणखी एक व्यक्ती चर्चेत आली होती.

समीर वानखेडे यांना २०१९ एक पुरस्कार मिळाला होता.

‘जमादार बापू लक्ष्मण लामखडे पुरस्कार’ असं त्या पुरस्काराचे नाव होते.

जेव्हा वानखेडे यांना हा पुरस्कार मिळाला त्यावेळी ते महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरए) सहसंचालक होते. मार्च २०१९ मध्ये तब्बल २०० किलो सोन्याची आंतरराष्ट्रीय तस्करी उघडकीस आणल्याबद्दल हा त्यांना पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं म्हंटले होते.

साहजिकच प्रश्न पडला कि आता एवढ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसाला एका जामदार पदावरील अधिकाऱ्याच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचे एवढे काय ते कौतुक? पण कौतुक होते. कारण जमादार बापू लक्ष्मण लामखडे हे माणूस म्हणून आणि अधिकारी म्हणून तेवढेच मोठे होते, ग्रेट होते.

नेमके कोण होते जमादार बापू लक्ष्मण लामखडे?

बॉलिवूडच्या जुन्या चित्रपटांमधून दाखवल जायचं कि १९६० ते २००० हा ४ दशकांचा काळ म्हणजे मुंबईत दारु, मटका, स्मगलिंग, अंडरवर्ल्ड अशा अवैध धंद्याचा सुवर्ण काळ होता. त्यामुळे अनेकदा मुंबईला वेठीस धरलं जायचं. पण हेच स्मगलिंग आणि अवैध धंद्याचं वर्चस्व मोडून काढायचं काम कोणी केलं असले तर जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांनी.

जमादार बापू लामखडे म्हणजे मुंबईच्या कस्टम विभागातील एक धडाडती तोफ होते, त्यांचा आवाज ऐकताच मुंबईच्या सगळ्या स्मगलर्स, भाई लोकांच्या उरात अक्षरशः धडकी भरायची. मग तो मस्तान असो, कि युसुफ पटेल असो. बापूंच्या वाट्याला जाण्याच एकही भाईचं धाडस झालं नव्हतं. 

पिळदार मिशी, धाडधिप्पाड शरीरयष्टी असा काहीसा त्यांचा रुबाब होता. किमान ६ जण एकावेळी बसतील अशी त्यांची मगरमिठी होती. तर तोकडी पॅन्ट, बाहेर काढलेले शर्ट आणि सायकल हि त्यांची मालमत्ता होती. १९३५ साली त्यांनी हि सायकल विकत घेतली होती.

२ जुलै १९२२ रोजी महाराष्ट्राच्या जुन्नर तालुक्यातील मंगळूर-पारगाव या छोट्याश्या खेडेगावात शेतकरी कुटुंबात बापूंचा जन्म झाला होता. त्यांचे वडील प्लेगच्या साथीत वारले. तर त्यांचा थोरला भाऊ मुंबईच्या गोदीत काम करायचा तर स्वतः बापू शेतामध्ये शेळ्या चारुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे.

थोडं मोठं झाल्यावर बापूंनी देखील मुंबईच्या गोडीची वाट धरली. ३-४ वर्षे छोटी मोठी कष्टाची कामे करुन १९४४ साली वयाच्या २२ व्या वर्षी बापू मुंबई कस्टम्स मध्ये शिपायाच्या पदावर भरती झाले. पुढे ४ डिसेंबर १९७८ या आपल्या मृत्यूच्या दिवसापर्यंत म्हणजे जवळपास ३४ वर्ष ते मुंबईच्या कस्टम विभागात होते. 

बापू म्हणजे मुंबईच्या कस्टम विभागातील बहिर्जी नाईकच! आपली सायकल आणि खबऱ्यांचे जाळे हे बापूंचे भांडवल होते. बापूंनी आपल्या कारकिर्दीत स्मगलिंगचा इतका माल पकडला की आजच्या हिशेबाने त्याची किंमत अब्जावधी रुपयांच्या घरात जाईल.

त्यांच्या अनेक गाजलेल्या कामगिऱ्यांपैकी एक म्हणजे २९ जुलै १९५७ रोजी व्हिक्टोरिया डॉकमध्ये तीन चीनी खलाशांकडून जप्त केलेले ३०० तोळे सोने. ते सोने या खलाश्यांनी आपल्या गुप्तांगात लपवलं होतं. असं म्हणतात कि कोणत्याही खबऱ्याची मदत न घेता केवळ आपल्या तीक्ष्ण निरीक्षणांच्या जोरावर बापूंनी हे स्मगलर्स पकडले होते.

आपल्या या कामगिरीने बापूंनी त्या काळात सिंगापूर, हॉंगकॉंग पर्यंतच्या गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून मुंबईच्या स्मगलिंग विश्वात बापूंच्या नावाची दहशत पसरली होती. या कामासाठी २ व्यक्ती बापूंच्या मागे पहाडासारख्या उभ्या होत्या. एक म्हणजे असिस्टंट कमिशनर तावडे आणि दुसरी म्हणजे शिपाई रामनाथसिंग.अपरात्री रात्री कधीही हाक मारली कि हे दोघे धावत यायचे.

शिवसेनेचे संस्थापक सदस्य आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री कै. प्रमोद नवलकर हे बापूंचे अगदी खास मित्र होते. नवलकर यांनी देखील बापूंविषयी ‘भटक्यांची भ्रमंती’ या लेखात बऱ्याच आठवणी लिहून ठेवल्या आहेत.

नवलकर सांगतात,

कोळसा मोहल्ल्यात स्मगल मालांनी ट्रक भरला जात होता. एक फर्लांगभर तो गेला असेल, अंधारात लपलेल्या बापूनी सायकलवर टांग मारली आणि भरधाव धावणाऱ्या ट्रकवर सायकलवरूनच झेप घेतली. बापूनी डरकाळी फोडल्याबरोबर ट्रकमधील तिघांनीही जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून खाली उड्या घेतल्या. बापू स्टेअरिंग वर बसला आणि त्यांनी ट्रक भरधाव पळवला.

पण क्षणात त्याच्या लक्षात आले कि त्याचा टकसीनि पाठलाग होत होता. पण तो पाठलाग अर्धवट सोडला गेला. बापू समजायचे ते समजला. त्यांनी ट्रक कस्टम हाउस मागील यार्डात बंद केला आणि विजेच्या वेगाने तो पुन्हा कोळसा मोहल्ल्यात येऊन धडकला. अपेक्षेप्रमाणे दुसरा ट्रक भरून झाला होता. बापूनी चित्याप्रमाणे त्या ट्रकवर झेप घेतली आणि तोही ताब्यात घेऊन कस्टमच्या यार्डात बंद केला. या गोष्टीमुळे दुसऱ्या दिवशी स्मग्लर्सच्या विश्वात प्रचंड खळबळ माजली.

No photo description available.

No photo description available.

अशा या बापूंना दोनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मुंबईच्या कस्टम विभागालाही बापूंच्या माध्यमातून पहिल्यांदा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.

४ डिसेंबर १९७८ ला त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या दुःखद निधनानंतर मुंबई कस्टम्सची मुख्य कचेरी ज्या चौकात आहे, त्या चौकाचे, केंद्रीय मंत्री ‘मगनभाई बारोट’ यांच्या हस्ते `जमादार बापू लक्ष्मण चौक’ असं नामकरण करण्यात आलं आहे. त्याकाळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या एस. एम. जोशी आणि इतर मातब्बर नेत्यांनी पुढाकार घेऊन, त्यांच्या जन्म गावी त्यांचा ब्रॉन्झचा पुतळा उभारण्यात मोठी मोलाची कामगिरी बजावली आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.