एकेकाळी देशावर राज्य करणारा पक्ष, आजचे अनेक प्रादेशिक पक्ष त्याच्या तुकड्यातुन तयार झालेत..

सध्या भारतात राष्ट्रीय पातळीवर दोनचं पक्षांचा दबदबा आहे. पहिला म्हणजे सध्याचा सत्ताधारी पक्ष भाजप आणि दुसरा म्हणजे विरोधी पक्ष काँग्रेस. या दोन्ही पक्षांशी राज्य पातळीवरचे आणि स्थानिक पातळीवरचे अनेक पक्ष जोडलेले आहेत.

म्हणजेच भाजप आणि मित्र पक्षांचं मिळून एनडीए तर कॉंग्रेस आणि मित्र पक्षांचं यूपीए

असं असलं तरी, गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर या दोनचं पक्षांचा दबदबा राहिलाय.

मात्र एक काळ होता जेव्हा या दोन्ही पक्षां पेक्षाही जनता दलाचा विस्तार मोठा होता. अनेक राज्यांत या पक्षाचा जाळं पसरलेलं होतं. मात्र, अशा काही घटना घडल्या की पक्षाला अनेक फाटे फुटले आणि पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाला.

जनता दल हा अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांचा मिळून बनलेला पक्ष होता. देशातील अनेक राज्यांमधून हे नेतृत्व आलेलं होतं. बहुतेक नेते जयप्रकाश नारायण यांच्या १९७७ च्या ‘संपूर्ण क्रांती’ आंदोलनातून आलेले होते. पक्षाला भक्कमपणा यावा, यासाठी एकेका नेत्याला एकेक राज्य आंदण दिल्याप्रमाणे जनता दल हा पक्ष कार्यरत होता. त्यामुळेच सत्तेवर आल्यानंतर नेत्यांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा उफाळून आल्या व स्वत:चं नेतृत्व कसं भक्कम होईल यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होऊ लागले.

त्यामुळे जे नेते राजकारणात पुढे सरकत होते त्यांचे पाय ओढण्यासाठी इतर नेते एकत्र येत होते, असं चित्र तेव्हा तयार झालं होतं. शिवाय नेत्यांचे वैयक्तिक हितसंबंधही महत्त्वाचे बनले होते.

तर, १९९६ चा तो काळ नरसिंह राव यांच्या काँग्रेस सरकारचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देशातील कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीला बहुमतापर्यंत मजल मारता आली नाही. त्यामुळे १९९६ मध्ये जनता दलाच्या देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आघाडीचं सरकार काँग्रेसच्या पाठिंब्याने केंद्रात सत्तेवर आलं.

त्यातूनच जुलै, १९९७ मध्ये जनता दलाचे अध्यक्ष पद भूषवलेल्या लालूप्रसाद यादव यांनी जनता दलातून बाहेर पडून राष्ट्रीय जनता दल (राजद) हा पक्ष स्थापन केला. असं म्हटलं जातं की, चारा घोटाळ्यात अडकलेल्या लालूप्रसाद यांना केंद्रात आपल्याच पक्षाचं सरकार असूनही हवी ती मदत मिळत नसल्यामुळे त्यांनी देवेगौडांच्या विरोधात बंड केलं.

१९९७ मध्ये बंड केल्यानंतर लालूप्रसाद यांनी आपल्या पक्षामार्फत बिहारमध्ये जम बसवला आणि २००० साली झालेल्या निवडणुकीत स्वत:च्या बळावर ते सत्तेत आले.

चारा घोटाळा प्रकरणामुळे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यावर लालूप्रसाद यांनी आपली पत्नी राबडी देवी यांना मुख्यमंत्रिपदी आरूढ केलं व बिहारमध्ये आपली पकड कायम ठेवली. त्याचप्रमाणे पुढे केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये २००४पासून सक्रिय राहून रेल्वे मंत्रिपदाची आपली कारकीर्द गाजवली.

पण २००९ च्या लोकसभा निवडणुकीत अनिश्चित भूमिका घेतल्याने काँग्रेससोबतचं त्यांचं समीकरण बिघडलं आणि परिणामी, राज्यात राजदची मोठी पीछेहाट संभवली.

बिजू जनता दल’ व इतर पक्षांची स्थापना

लालूप्रसाद यांच्याआधी १९९२ मध्येच मुलायमसिंह यादव पक्षातूनबाहेर पडले होते आणि १९९६ मध्ये उत्तर प्रदेशात सत्तेवर आले होते. पक्षातून बाहेर पडायचं आणि स्वत:च्या राज्यातील संपूर्ण पक्ष ताब्यात घ्यायचा, असं या नेत्यांचं सूत्र होतं. हे सत्तासूत्र यशस्वी झाल्यामुळेच १९९७ मध्ये ओडीसात नवीन पटनायक यांनी बिजू जनता दल या नावाने आपली वेगळी चूल मांडली व पुढे ते सत्तेवरही आले.

१९९८ मध्ये अजितसिंह जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा राष्ट्रीय लोकदल हा पक्ष स्थापन केला. उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडे या पक्षाचा प्रभाव तात्पुरता असल्यामुळे हा पक्ष फार प्रभावी ठरू शकला नाही.

मात्र उत्तर प्रदेशमधील मुलायमसिंह सरकारमध्ये आणि दिल्लीतील वाजपेयी सरकारमध्ये या पक्षाला स्थान मिळू शकलं.

१९९९ मध्ये देवीलाल यांचे चिरंजीव ओमप्रकाश चौटाला जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी इंडियन नॅशनल लोकदल हा पक्ष स्थापन केला. पुणे ते हरियाणाचे मुख्यमंत्री देखील बनले.

या सगळ्या विभाजनांसह जनता दलातून फुटून जे पक्ष तयार झाले. त्यातले गट अस्थिर राहिले.

आता उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर जनता दलातून बाहेर पडलेल्या रामविलास पासवान यांनी लोक जनशक्ती पक्ष स्थापन केला. त्याआधी १९९४ मध्ये स्थापन झालेला समता पक्ष १९९९ मध्ये संयुक्त जनता दलात विलीन झाला.

या सगळ्या फाटाफुटीमुळे मूळचा जनता दल पक्ष कोणता हा प्रश्न निर्माण झाला. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सेक्युलर जनता दल पक्ष मूळचा मानला जातो. मात्र राष्ट्रीय पातळीवर त्यांचे अस्तित्व उरलेलं नाही. फक्त आता कर्नाटका पुरता उरलाय.

जनता दलाची स्थापना ही काँग्रेसच्या विरोधात पर्यायी राजकारण करण्यासाठी झाली होती. सत्तेवर आल्यानंतर बाबरी मशीद-रामजन्मभूमीचा वाद निर्माण झाल्यानंतर या पक्षाने भाजप, विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विरोधात भूमिका घेतली होती.

मात्र, या भूमिकेची किंमत सत्ता गमावून या पक्षाला चुकती करावी लागली; पण त्यामुळे भाजपविरोध ही या पक्षाची विचारसरणी बनली.

मात्र जनता दलामध्ये फूट पडून जसजसे अनेक पक्ष तयार झाले तसतसा या पक्षांचा भाजपविरोध मावळून गेला. लालूप्रसाद यादव वगळता सर्व गट व त्यांच्या नेत्यांनी भाजपशी जुळवून घेतलेलं दिसतं. अगदी ज्या जनता दलाला मूळ जनता दल मानलं जातं, त्या देवेगौडांच्या सेक्युलर जनता दलानेही कर्नाटकमध्ये सत्ता मिळवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या भाजपशी युती केली.

अशा रीतीने व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या पक्षाचा एका दशकभरातच सर्व आघाड्यांवर पराभव झाला.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.