बाकीच्यांचं माहित नाही पण ज्योतिरादित्य शिंदे यांना गॅरंटी आहे, मोदी त्यांनाच मंत्री बनवणार

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कॅबिनेटच्या विस्ताराची चर्चा सुरु आहे.  या पार्श्वभूमीवर दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आलाय. असं म्हंटलं जातंय कि, या आठवड्यातच मोदी कॅबिनेटमध्ये मोठा बदल होऊ शकतो. कारण मंत्रिमंडळाची संभाव्य मंत्र्यांची यादी तयार झाली असून त्यांना फोन करून दिल्लीला बोलावणंही धाडलं आहे.

सध्या मंत्रिमंडळात एकून ५३ मंत्री आहेत, तर नियमांनुसार मंत्रिमंडळात ८१ जणांची भरती केले जाणे गरजेचे आहे. पण सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात २० नव्या चेहर्‍यांचा समावेश केला जाऊ शकतो. दरम्यान, केंद्राकडून संबंधित मंत्र्यांच्या जागा भरण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यासारख्या राज्यांना प्राधान्य मिळू शकत. पण केंद्राचा मेन फोकस हा आगामी निवडणूक असणाऱ्या राज्यांवर जास्त असल्याचे बोललं जातंय. 

या मंत्रिमंडळासाठी अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. पण, त्यातल्यात्यात काहींना थेट दिल्लीला बोलावण्यात आलंय. ज्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि ज्योतिरादित्य शिंदे या नेत्यांचा समावेश आहे.

८ राज्याच्या राज्यपालांची बदली 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी बऱ्याच राज्यांत नव्या राज्यपालांची नेमणूक केली. राष्ट्रपती भवनाकडून एक प्रेसनोट जारी करत ही माहिती देण्यात आली. यात काही राज्यपालांना ट्रान्सफर करून दुसऱ्या राज्यात पाठवलंय, तर काही नवीन राज्यपालांची नेमणूक करण्यात आलीये. 

मिझोरमचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची बदली झाली असून त्यांना गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची बदली झाली असून त्यांची त्रिपुराचे  राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलीये. तर त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची बदली झाली असून त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची बदली करून त्यांना हरियाणाचे राज्यपाल पद देण्यात आलंय. मिझोरमचे राज्यपाल म्हणून डॉ.हरि बाबू कंभपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर मंगूभाई छगनभाई पटेल यांची मध्य प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  यासोबतच राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर थावरचंद गहलोत याना कर्नाटकाचा राज्यपाल बनवण्यात आलंय.

वास्तविक, सध्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठीच या महत्वपूर्ण  बदल्या करण्यात आल्याचं म्हंटल जातंय. कारण केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या  थावरचंद गहलोत यांना दिल्ली सोडून कर्नाटकात राज्यपाल म्ह्णून नियुक्त केलं गेलंय.  ज्यामुळे अर्थातच केंद्रातील आणखी एक जागा रिकामी झालीये.  याच जागेवर दिल्लीला बोलावणं धाडणाऱ्या एका नेत्याची वर्णी लागणार आहे. 

ज्योतिरादित्य  शिंदे यांचं जवळपास फायनल झालय

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी बाकी नेत्यांना जरी बोलावलं असेल, तरी  यात सगळ्यात जास्त चर्चा होतेय ती ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नावाची.  ज्यांनी गेल्या वर्षीच काँग्रेस सोडून भाजप जनता पक्षात प्रवेश केला होता.  तेव्हापासूनच त्यांना केंद्राच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात जागा मिळणार असल्याचं बोललं जातं होतं.

मध्यंतरी मध्यप्रदेश मध्ये सत्ताबदल झाला तेव्हा ज्योतिरादित्य मुख्यमंत्री होतील का अशीही चर्चा झाली पण तस घडलं नाही. काँग्रेसमध्ये असताना राष्ट्रीय पातळीवरचे नेते म्हणून गाजलेले शिंदे भाजपमध्ये स्थानिक पातळीपुरते उरलेत का अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली.

 गेल्या काही दिवसांपासून ज्योतिरादित्य हे मध्य प्रदेशाच्या दौऱ्यावर होते. निश्चित कार्यक्रमानुसार त्यांना आज देवास नंतर इंदोरच्या दौरा करायचा होता. पण दिल्लीवरून फोन आला आणि मंगळवारी अचानक त्यांना आपला हा दौऱ्या रद्द करावा लागला. आता ते थेट इंदौरवरून दिल्ली दरबारी हजर राहतील. 

दरम्यान, दिल्लीला निघण्याआधी  ज्योतिरादित्य शिंदे यांनी उज्जैनच्या महाकाल मंदिराचे दर्शन घेतले. आपल्या पत्नी आणि मुलासह त्यांनी मंदिरात अभिषेकही केला.

त्यांचे पूर्वज महादजी शिंदेनी जीर्णोद्धार केलेल्या महाकाल मंदिराचे शिंदे घराण्यासाठी प्रचंड महत्व आहे असं म्हणतात. इथे दर्शन घेतल्यानंतर शिंदे कुटुंबीयांनी मोठ्या गणेश मंदिराचे दर्शन घेतले. ज्याच्यानंतर ते थेट  प्रख्यात ज्योतिषाचार्य पंडित आनंद शंकर व्यास यांना भेटण्यासाठी गेलेत. असे अंदाज बांधले जातायेत कि, पंडित आनंद शंकर व्यास यांच्याशी भेटून ज्योतिरादित्य आपली कुंडली आणि दोष निवारण करतील.

दरम्यान, थावरचंद गहलोत यांना राज्यपाल पद दिल्यामुळं मध्य प्रदेशातून केंद्रीय मंत्री म्ह्णून ज्योतिरादित्य शिंदे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केला जातोय.  कारण काँग्रेसमधून बाहेर पडत मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडून राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार बनवण्यात ज्योतिरादित्य शिंदे यांची मुख्य भूमिका होती. ज्यामुळे अर्थातच भाजपाला मोठा फायदा झाला.

आता आपल्याला  झालेल्या फायद्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांचंही मन राखण पक्षाला महत्वाचं आहे. राजस्थान, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये सुरु  बंडखोरी मुळे भाजपला सावध पावले टाकावी लागत आहेत. त्यातच ज्योतिरादित्य यांच्या आत्या वसुंधराराजे या देखील नाराज असल्यामुळे शिंदे कुटुंबीयांची समुजत काढायचं धोरण अमित शहानी हाती घेतलं आहे.

म्हणूनच मध्य प्रदेशातून कॅबिनेट मंत्रीचा चेहरा म्ह्णून ज्योतिरादित्य याचंच नावं फिक्स असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे त्यांनीही मंदिराचे दर्शन आपल्या मंत्रिपदाच्या सुरुवातीचा श्रीगणेशा केल्याचं दिसतंय.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.