के’सागरने क्लासेस उघडले नाहीत पण अधिकाऱ्यांच्या पिढ्या घडवणारा ब्रँड उभा केला
आईबापाने MPSC/UPSC कर, अधिकारी हो म्हणून सांगून गावाकडनं पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करायला पाठवलं. आधी तर ओ कि ठो काही ज्ञान नव्हतं. इथल्या पेठा, तिथे असलेली क्लासेसची गर्दी, स्टडी रूममध्ये मान खाली घालून अभ्यास करणारे, पोह्यात सांबर टाकून नाश्ता करणारे भावी अधिकारी, त्यांच्या हातात दिसणारे भले मोठे पुस्तकांचे ठोकळे बघून मन दडपून जायचं. या स्पर्धा परीक्षेच्या शर्यतीत आपला नंबर लागणार का? याच टेन्शन असायचं.
अप्पा बळवंत चौकामध्ये(ABCमध्ये) फेऱ्या मारून पुस्तकांची जुळवाजुळव करायला घेतली. अशातच बोजड पुस्तकांच्या गर्दीमध्ये एक साथीदार भेटला ज्याने दाखवून दिलं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास छोट्या आणि सुटसुटीत पुस्तकात सुद्धा मावू शकतोय. या दोस्ताचं नाव म्हणजे के’सागर.
स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही पुण्यातून करत असाल, मुंबईतून करत असाल किंवा आपल्या गावाकडे शेतीच्या बांधावरून करत असाल,अधिकारी होण्याचं स्वप्न बघून अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याच्या हातात के’सागर प्रकाशनच पुस्तक आलं नसेल असा विद्यार्थी आणि अधिकारी दुर्मिळच.
के’सागरची आता पर्यंत १ कोटी पेक्षा जास्त पुस्तके विकली गेली आहेत. एका मराठी प्रकाशकाची एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तके विकल्या गेल्याचे हे एकमेव उदाहरण असू शकते.
पण आपल्या पैकी अनेकांना माहित नसतं की मराठी पोरांना अधिकारी बनवणारं के’सागर हे प्रकाशन नेमकं कोणाचं आहे ? विशेषतः नावावरून अनेकांना ही संस्था महाराष्ट्राच्या बाहेरची असेल असं वाटतं. के’सागर हा प्रत्येकाच्या तोंडात रुळलेला शब्द पण त्याच्या मागचा इतिहास कित्येकांना माहित नसतो. त्यामुळे बोल भिडूच्या वतीने के’सागर काय आहे याचा शोध घेण्यात आला. त्याचा हा किस्सा.
तर के’सागर प्रकाशनाचे संस्थापक आहेत श्री.विठ्ठल सदाशिव क्षीरसागर. ते के’सागर या नावाने लेखन करत आहेत.
के’सागर यांचे शिक्षण पुण्यातील नूमवित झाले. इतर सर्वसामान्य कुटुंबांप्रमाणे के’ सागर यांच्या घरची परिस्थिती होती. त्यांच्या घरात आई-वडील आणि चार भावंडे असा परिवार होता. के’सागर मोठे असल्याने त्यांच्यावर घरची सर्व जबाबदारी येऊन ठेपली होती.
वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी गरवारे नायलॉन येथे शिकाऊ उमेदवार (apprentice) म्हणून कामाला सुरुवात केली. बी.कॉम पूर्ण करून सरकारी नोकरी करावे असे त्यांच्या डोक्यात होते. पुढे काही दिवसात पनवेल येथील डीएड, बीएड कॉलेज मध्ये ज्युनियर क्लार्क म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
एकीकडे नोकरी तर दुसरीकडे त्यांचे बी.कॉमचे शिक्षण सुरु होते.
पनवेल येथे असतांना पुण्यात बदली व्हावी म्हणून प्रयत्न करत होते. काही दिवसात त्यांची पुण्यात बदली झाली. याकाळात त्यांचे बी-कॉमचे शिक्षण पूर्ण झाले. नंतर त्यांनी पुण्यात विधी महाविद्यालयात एलएलबीला ॲडमिशन घेतले.
पुणे विद्यापीठाच्या एलएलबी परीक्षेत विशेष गुणवत्ता व विशेष प्रशस्तीपत्रकासह ते प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले होते. लॉ पूर्ण झाल्यानंतर १९८० ते ८३ दरम्यान त्यांनी लॉच्या विद्यार्थांसाठी क्लास घेतले होते.
एलएलबीला असताना के’सागर यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, अभ्यासक्रमा नुसार अभ्यास करण्यासाठी कुठलेही पुस्तक नाही.
इतिहास,भूगोल,पंचायत राज सारख्या विषयांची माहिती देणारे पुस्तके बाजारात उपलब्ध नव्हते.
स्पर्धा परीक्षेसाठी केलेली त्यांची मेहनत फळाला आली. उपजिल्हाअधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी वर्ग -१, वर्ग -२, सरकारी कामगार अधिकारी आदी पदांसाठी ते पात्र ठरले वा निवड झाली होती.
के’सागर यांनी आयुष्याची सुरुवात कामगार म्हणून केली होती. कामगारांसाठी काही तरी करता येईल, असा विचार करून ते गव्हर्मेंट लेबर ऑफिसर म्हणून जॉईन झाले (सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून स्वेच्छा निवृत्ती)
त्यावेळी त्यांना जाणीव झाली की, बाजारात अभ्यासक्रमानुसार पुस्तके उपलब्ध नव्हते. परीक्षा देतांना आपल्याला जो त्रास झाला तो भविष्यात विद्यार्थांना होऊ नये म्हणून त्यांनी पुस्तके लिहायला सुरुवात केली. आता सारखे त्यावेळी इंटरनेटची सुविधा सुद्धा उपलब्ध नव्हती. त्यामुळे एखादी माहिती मिळविणे सोपे काम नव्हते.आयोगाने अभ्यासक्रम दिला होता. मात्र त्यात नेमके काय असेल हे स्पष्ट नव्हते.
यावेळी के’सागर यांच्या डोक्यात कल्पना आली की आपणच का पुस्तके लिहू नयेत? त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी याआधी लॉच्या ८ विषयांच्या नोट्स लिहिल्या होत्या ज्या अजित बुक लॉ या प्रकाशनाने छापल्या होत्या, त्या नोट्स ला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे के’सागर यांना स्वतःमधील लेखकाबद्दल पूर्ण विश्वास होता.
ज्युनियर क्लार्क असताना एक अधिकारी त्यांचा उल्लेख के’सागर असा करत होते. त्यामुळे त्यांनी याच नावाने लिखाण करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच या नावाशी जात, धर्म, पंथ यांचा शिक्का बसू नये असेही त्यांना वाटत होते.
आणि के’सागरचा जन्म झाला.
के’सागर यांनी १९८५ ते १९८६ दरम्यान एमपीएससीसाठी पहिले पुस्तक लिहिले. त्यापूर्वी त्यांनी प्राथमिक शिक्षकांसाठी एक पुस्तक लिहिले होते. त्या काळात नावा पेक्षा पैशांची जास्त गरज होती. त्यामुळे नाव न लिहिता त्यांनी ते पुस्तक लिहिले होते.
१९८६ साली आपल्या पत्नी सौ.शोभा क्षीरसागर यांच्या नावे के’सागर ही प्रकाशन संस्था सुरु केली.
के’सागर प्रकाशनाचे पहिले पुस्तक हे एमपीएससीच्या मुख्य परीक्षेचे पेपर दुसरा (महाराष्ट्रावर आधारित सामान्य अध्ययन) या विषयाचे होते. या पुस्तकाच्या २ हजार प्रती छापल्या गेल्या. पण त्या वर्षीची एमपीएससीची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर पहिला (भारतावर आधारित सामान्य अध्ययन) हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेकरता संपूर्ण जनरल स्टडीज हे पुस्तक प्रकाशित झाले. १९८८ मध्ये पीएसआय परीक्षेकरता संपूर्ण फौजदार हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
दुसऱ्या वर्षीच पीएसआय परीक्षेच्या स्वरूपात बदल झाला. त्यामुळे छापलेले पुस्तक वाया गेले. त्यामुळे के’सागर प्रकाशनाला चांगलाच आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे व्यापारी, प्रिंटरची देणी राहिली. के’सागर यांनी हार मानली नाही. पत्नीचे दागिने विकुन देणी देऊन टाकली आणि परत दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला सुरुवात केली. आजही गेली ३५-३६ वर्ष प्रकाशन संस्था आपल्या चांगल्या आर्थिक व्यवहारासाठी प्रसिद्ध आहे.
त्याकाळात के’सागर हे पुस्तके लिहित, त्यांच्या पत्नी ते पुस्तकांचे प्रुफ रीडिंग करत असत. तर वडील हे पुस्तकांचे गठ्ठे बांधत आणि त्यांचे भाऊ प्रुफ रीडिंग बरोबर के’सागर प्रकाशनाची विविध पुस्तके पुण्यातील वितरकांकडे घेऊन जात. के’सागरच्या पुस्तकाच्या प्रुफ रीडिंग करण्याचा त्यांच्या भावाला असा फायदा झाला की, त्यांची psi पदी निवड झाली. आणि सध्या ते पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
आपल्या पैकी अनेकांना प्रश्न पडतो की इतक्या सगळ्या विषयाची पुस्तके के’सागर कशी लिहतात?
के’ सागर यांचे शिक्षण बी-कॉम मध्ये झाले होते. नंतर त्यांनी एलएलबी केली होती. त्यामुळे या दोन्ही विषयात त्यांची चांगली प्रगती होती. तसेच त्यांनी मुख्य परीक्षेला राज्य शास्त्र, सामाजिक शास्त्र, इतिहास, लॉ, मराठी वाडमय हे विषय घेतले होते. त्यामुळे या विषयांचा त्यांचा चांगला अभ्यास झाला होता.
त्यामुळे या विषयांची पुस्तके लिहतांना त्यांना अडचण आली नाही.
असे एक-एक करत ५० ते ६० स्वतंत्र पुस्तके के’सागर यांनी लिहली. अजूनही ६७ व्या वर्षी ते सकाळी १० ते ८ वाजे पर्यंत कार्यालयात बसून काम करत असतात. कुठलाही विषय समजून घेत साध्या सोप्या शब्दात मांडता आला पाहिजे. तेच के’सागर यांनी केले.
१९९७-१९९८ ला के’सागर प्रकाशनाच पहिले दुकान पुण्यातील अप्पा बळवंत चौकात सुरु झाले. आणि त्यापूर्वीच के’सागर ब्रँड म्हणून उभा राहिला. संपूर्ण राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांचा गळ्यातील ताईत हा ब्रँड बनला होता. राज्यातील एकही तालुका नसेल जिथे के’सागरची पुस्तके मिळणार नाहीत.
युपीएससीच्या तयारीसाठी महत्वाचे असणारे प्रा.रवीभूषण यांचे ल्युसंट जनरल सायन्स आणि ओब्जेक्टीव्ह जनरल सायन्स या पुस्तकाचे अधिकार के’सागर प्रकाशनाने आपल्याकडे घेतले आहे. ते पुस्तक आता के’सागर जनरल सायन्स या नावाने प्रकाशित करण्यात येत आहे. पुढील काही दिवसात युपीएससीच्या अनुषंगाने अनेक इंग्रजी आणि हिंदी माध्यमातील राष्ट्रीय स्तरावरील नावाजलेल्या लेखकांची पुस्तके के’सागर प्रकाशनच्या वतीने प्रकाशित होणार आहेत.
के’सागर एवढे प्रसिद्ध असतांना त्यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे क्लास का सुरु केले नाही? असा अनेकांच्या मनात विचार येतो. क्लास सुरु केला तर पुस्तकावरील लक्ष कमी होईल. तसेच लिखाणाची गुणवत्तेवर परिणाम होऊ नये म्हणून क्लास सुरु केले नसल्याचे सांगण्यात येते. मुख्य म्हणजे पुस्तकाच्या माध्यमातून खेड्यापाड्यात पोहोचता येते क्लास च्या माध्यमातून शक्य नाही. त्यामुळे क्लास सुरु करण्यात आले नसल्याचे सांगण्यात येते.
PSI-STI-ASO पूर्व परीक्षा या पुस्तकाच्या ८५ आवृत्या, संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबलच्या ९० आवृत्या, लेटेस्ट जनरल नॉलेजच्या ८२ आवृत्या छापून झाल्या आहे.
तसेच के सागर तर्फे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लेखकांचे इंग्रजी पुस्तकांचे मराठीत भाषांतर झालेले आहे आणि मराठीत यूपीएससी मुख्य च्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक मैलाचा दगड ठरलेला आहे तसेच यूपीएससीची मुख्य परीक्षा मराठीतून देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने ही पुस्तके वाचलेली असतात.
आजवर के’सागरने अनेक यशोदायी पुस्तकांचे लेखन केले आहे, मात्र त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांच्या कित्येक पिढ्या त्यांनी आपल्या पुस्तकातून घडवल्यात. या पुढेही ही परंपरा अशीच चालू राहील यात कोणतीही शंका नाही.
हे हि वाच भिडू
- MPSC, UPSC पुण्याच्या बाहेर घेवून जाणारा मास्तर.
- आले किती गेले किती संपले भरारा. PSI, STI साठी अजूनही आहे तात्यांच्या ठोकळ्याचा दरारा
- आबांमुळे MPSC एका वर्षात पीएसआय भरती करून त्यांना नोकरीवर रुजू करायची…