जेएनयुच्या ५ वर्षानंतर कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये आहे, पण उमर खालिद कुठे गायब झालाय?

९ फेब्रुवारी २०१६. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये कथितरित्या भारत विरोधी घोषणा दिल्याच्या बातम्या आल्या. याचे कथित व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी जेएनयुच्या विद्यार्थी संघाचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमारला अटक केली. काही दिवसांनंतर यातील आणखी संशयित उमर खालिद आणि दुसरे विद्यार्थी शरण आले.

पुढे जाऊन न्यायालयात हे गुन्हे सिद्ध होऊ शकले नाहीत. मात्र याच घटनेनंतर कन्हैया कुमार आणि उमर खालिद हि जोडगोळी देशभरात चर्चेत आली. सरकारच्या विरोधातील चेहरा बनली. या जोडगोळीचा जेवढा विरोध झाला तेवढेच समर्थन देखील झाले.

मात्र आता जवळपास ५ वर्षानंतर २८ सप्टेंबरला अगदी वाजत-गाजत कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये आला आहे. याआधी कम्युनिस्ट पक्षाच्या चिन्हावर कन्हैयाने निवडणूक देखील लढली आहे. तर उमर खालिद मात्र सध्या कुठेही चर्चेत नाही. मग तो आहे कुठे?

सध्या उमर खालिद दिल्ली दंगलीचा कट, देशद्रोह आणि UAPA या आरोपांमध्ये जेलमध्ये आहे.

त्यामुळे एक प्रश्न नक्की पडतो कि एका वेळी एकाच घटनेतून चर्चेत आलेल्या कन्हैया कुमारच्या तुलनेत उमर खालिद इतका मागे का पडला? त्याला सक्रिय राजकारणात जागा का मिळाली नाही? कि तो जागा मिळवू शकला नाही?

दिल्ली दंगलीच्या आरोपांमधील एक प्रकरणात सध्या उमर खालिदला जमीन मिळाला आहे, पण FIR नंबर ५९/६० मध्ये अजूनही त्याला जमीन मिळू शकलेला नाही. त्याच्या जमीन अर्जावर पुढची सुनावणी ९ ऑक्टोबरला होणार आहे. मग अशात हमखास प्रश्न विचारला जातो कि, कन्हैयाला भारताच्या राजकारणाने स्वीकारले, पण उमर खालिद जेलमध्ये आहे. या मागची कारण काय आहेत?

१. याच पहिलं कारण त्याचे मित्र आणि लेखक दरब फारूकी ‘धर्म’ सांगतात :

ते एक हिंदी माध्यमाशी बोलताना सांगतात, मला माहित नाही की पूर्वीच्या गोष्टी कशा होत्या. पण आज आपला भारत नक्की कुठे आहे? हा प्रश्न नक्की पडतो. कारण आजच्या भारतात नाव हि गोष्ट सर्वात महत्वाची बनली आहे. तुमचे नाव काय आहे? हेच ठरवते कि तुम्ही कुठे पर्यंत जाणार? तुमचे नावच तुमचे ओळखपत्र बनले आहे. आणि खालिद आज मुस्लिम असण्याची किंमत चुकवत आहे.

२. कन्हैयाप्रमाणे खालिदला माध्यमांनी स्थान दिले नाही?

मानवाधिकार कार्यकर्ते आणि उमर खालिदचे मित्र जाकिर अली त्यागी एक हिंदी माध्यमाशी बोलताना म्हणतात की,

आज कन्हैया राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आहे आणि उमर खालिद तुरुंगात आहे. याचं एक मोठं कारण म्हणजे भारतातील मेनस्ट्रीम मीडियाने कन्हैयाला स्थान दिले, पण उमर खालिदकडे दुर्लक्ष केले. टीव्ही माध्यमांनी ना त्याला कोणत्या डिबेटला बोलावले, ना त्याच्या मुलाखती घेतल्या. या उलट माध्यमांनी खालिदला ‘तुकडे तुकडे ‘गॅंग’चा सदस्य म्हणून प्रोजेक्ट केले.

त्याचवेळी जाकिर अली त्यागी म्हणतात,

‘कन्हैया कुमारला ज्याप्रकारे भारताच्या राजकारणानं स्वीकारलं आहे त्याप्रमाणे उमर खालिदला स्वीकारलं जाणार नाही. राहुल गांधींनी ज्या प्रकारे कन्हैयाला नियुक्ती पत्र देत पक्षात घेतलं त्याप्रमाणे उद्या जर उमर खालिद तुरूंगातून बाहेर येऊन काँग्रेसमध्ये येऊ इच्छित असला तर काँग्रेस त्यांचं असंच स्वागत करेल का?

आज भारताच्या राजकारणात मुस्लिमांसाठी स्थान तर आहे, पण ते केवळ नेत्यांच्या मागे उभे राहण्यापुरतेचं.

३. कन्हैया कुमार संधीसाधू राजकारण खेळतो?

उमर खालिदचे वडील कन्हैयावर संधीसाधू राजकारणाचा स्पष्ट आरोप करतात. कन्हैया कुमार आधी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या विद्यार्थी विभागाचा नेता होता. आणि पुढे जाऊन तो CPI मध्ये गेला. त्याच्या राजकीय महत्वकांक्षा देखील होत्या. त्यामुळे त्याने निवडणूक लढली.

कन्हैयाचे काँग्रेसमध्ये येण्याचे राजकीय महत्वकांक्षा हेच कारण आहे. त्याला कम्युनिस्ट पक्षात आपलं भविष्य दिसून येत नव्हतं. त्यामुळे त्याला काँग्रेसमध्ये आपलं भविष्य चांगलं असेल आणि तिथं आपण निवडणूक जिंकू शकतो असं त्याला जाणवलं. त्यामुळेच तो काँग्रेसमध्ये आला.

भारताचे राजकारण उमर खालिदला स्वीकारेल का?

खालिदचे वडील म्हणतात, राजकारणात स्थान दोन कारणांमुळे मिळते.

यातील पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही वंचित समाजासाठी किती कटिबद्ध आहात, तुम्ही किती काळ त्यांच्या समस्यांसाठी उभे आहात. जर तुम्ही या दोन्ही गोष्टींमुळे समाजात ओळखला जात असाल तर आज नाही तर उद्या तुम्हाला तुमची जागा मिळतेच. दुसरे कारण म्हणजे तुमच्या राजकीय महत्वाकांक्षा ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही राजकारण खेळात, जिथं तुम्हाला संधी मिळेल तिथे तुम्ही जाता.

पण मला असं अजूनही वाटतं कि, भारतात अजूनही राजकारणाला जागा आहे. जर एखादा व्यक्ती समजासाठी किंवा वंचित वर्गासाठी परिश्रमपूर्वक काम करत असेल तर त्याच्यासाठी जागा नसते असं होऊच शकत नाही. उमरसाठी आज ना उद्या पण संधी असेल हे नक्की.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.