मोदींच्या विरोधात आंदोलन करून हे ‘५’ जण राष्ट्रीय स्तरावरील नेते झाले

सध्या दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये एक चेहरा सातत्याने माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे. ते म्हणजे शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा. तेच सध्या या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. कृषी कायदा आणि प्रामुख्याने केंद्र सरकार विरोधात सुरु असलेलं हे आंदोलन सध्या राष्ट्रीय स्तरावरील सर्वात महत्वाचा विषय बनला आहे.

त्यासोबतच टिकैत यांचं नाव देखील भारतातील घराघरात जावून पोहोचलं आहे. मात्र सरकारच्या कायद्यांविरोधात आणि प्रामुख्याने मोदी सरकार विरोधात आंदोलन करून भारताच्या घराघरात पोहोचलेलं टिकैत एकटेच नेते नाहीत.

मागील ७ वर्षांमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या नेत्यांमध्ये एकूण ५ जणांची नाव प्रामुख्याने घ्यावी लागतात. यातील पाहिलं नाव म्हणजे,

१. हार्दिक पटेल 

स्कॅम सिरीजमध्ये एक डायलॉग आहे,

‘हमी इंडियन्स को हिरो बनाने मे बडा मजा आता है, आज का कॉमन आदमी कल हिरो बन सकता है!

अशाच एका २२ वर्षाच्या हार्दिक पटेल या कॉमन मॅनला गुजरातच्या माणसांनी ऑगस्ट २०१५ मध्ये अवघ्या महिन्याभरात हिरो बनवलं होतं. २०१४-१५ वर्षाच्या कॉलेजमधल्या निवडणूकीत बिनविरोध महासचिव होत हार्दिक यांनी पहिल्यांदा शहरी राजकारणाला सुरुवात केली. पण त्यावेळी त्यांना साधं तालुका पातळीवर देखील कोण ओळखत नव्हतं.

मात्र कॉलेजच्या काळात त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. हे काम करताना त्यांना पाटीदार समाजातील काही प्रश्न समजू लागले. आपल्या समाजातील केवळ गरीबच नाही तर श्रीमंत असलेल्या मुलांना देखील सरकारी नोकरी मिळतं नाही, आणि या गोष्टीला केवळ आरक्षण जबाबदार आहे. हे त्याच्या लक्षात आलं.

पाटीदारांच्या जमिनींच पण मोठ्या प्रमाणावर अधिग्रहण झाले होते पण त्यांना नोकऱ्या दिल्या नव्हत्या असं हार्दिक पटेल यांचं म्हणणं होतं.

या सगळ्या मुद्द्यावरच त्यांनी पाटीदार समाजाला आरक्षण देण्याची मागणी तत्कालीन मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याकडे केली होती. त्याच दरम्यान जुलैमध्ये हार्दिक यांची बहीण मोनिका यांना नियमानुसार राज्य सरकारची विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळाणार होती, पण ती त्यांच्यापेक्षा कमी गुण असणाऱ्या ओबीसी कोट्यातील मुलीला मिळाली. 

याच घटनेनंतर हार्दिक यांनी ‘पाटीदार अनामत आंदोलन समितीची’ स्थापना केली आणि २२ व्या वर्षी आरक्षणाची मागणी घेऊन राज्यसरकारच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली.

या मागणीला उचलून धरतं ६ जुलै २०१५ त्यांनी एक छोटीशी रॅली काढली होती. पहिल्यांदा मिसरूड देखील न फुटलेलं पोरग म्हणून लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण हळू हळू त्याच्या बोलण्यात दम वाटू लागला. जशा सभा वाढत गेल्या तसा त्यांना मिळणार प्रतिसाद देखील वाढत गेला.

२५ ऑगस्ट २०१५ रोजी अहमदाबादमध्ये केलेलं आंदोलन हे पाटीदार समाजासाठी आजवरचं सर्वात मोठं आंदोलन होतं. यानंतर झालेल्या हिंसेमुळे सरकारला सैन्याला बोलवावं लागलं होतं.

त्यादिवशी पोलिसांनी हार्दिक यांना अटक केली पण एव्हाना त्यांना अवघ्या महिन्याभरात राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली होती. २२ व्या वर्षी मुख्यमंत्री आणि देशाच्या पंतप्रधांना थेट भिडणारा नेता म्हणून ओळख जाऊ लागलं होतं. ९ सप्टेंबर २०१५ ला लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये पटेल नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती.

पुढे २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला, त्यानंतर अवघ्या १९ महिन्यात त्यांना गुजरात काँग्रेसचं कार्यकारी अध्यक्ष बनवलं गेलं होतं.

२. कन्हैया कुमार

मुळाचा बिहारचा असलेला कन्हैया कुमार हा सध्या कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहे. २००२ मध्ये पटनाच्या कॉलेजमधून विद्यार्थी राजकारणाची सुरुवात केल्यानंतर त्याने ऑल इंडिया स्टूडेंट फेडरेशनच काम सुरु केलं.

पटनामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही दिवसातच तो जेएनयु मध्ये पीएचडी करण्यासाठी दाखल झाला. याच दरम्यान त्याने इथे देखील विद्यार्थी राजकारणातून विद्यार्थ्यांचं संघटन सुरु केलं, विद्यापीठाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत २०१६ मध्ये ती जिंकली देखील. याच वेळी त्याच नाव पहिल्यांदा चर्चेत आलं.

मात्र त्यानंतर २०१६ मध्ये जेएनयुमधील कथित कार्यक्रमानंतर त्याच नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचल होतं. अफजल गुरुला दिलेल्या फाशीच्या विरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप झाला होता. यानंतर कन्हैया कुमारसह ७ जणांना अटक करण्यात आली होती.

यानंतरच त्याच्या राष्ट्रीय राजकारणाची सुरुवात झाली होती. चांगला वक्ता मानला जाणाऱ्या कन्हैया कुमारने देशभरात मोदी विरोधातील आपल्या आंदोलन आणि भाषणाने ओळख मिळवली. २०१९ उजाडताना त्याच नाव एवढं प्रसिद्ध झालं होतं की त्याने थेट केंद्रीय मंत्र्याच्याच विरोधात निवडणूक लढवली होती. ज्यात त्याने अडीच लाखांपेक्षा जास्त मत मिळवली होती.

३. जिग्नेश मेवानी  

गुजरातमधील दलित समुदायाचा सर्वात मोठा चेहरा म्हणून जिग्नेश मेवानी यांना ओळखलं जात. ते सध्या गुजरात विधानसभेचे आमदार आणि राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे संयोजक देखील आहेत.

आधी प्राध्यापक आणि नंतर मुंबईतील एका वृत्तपत्रामध्ये पत्रकार म्हणून त्यांना काम केलं. काही दिवस काम केल्यानंतर त्यांनी ‘लॉ’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात वकिली सुरु केली. याच दरम्यान त्यांनी सक्रिय सामाजिक चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली.

न्यायालयात याचिका दाखल करून त्यांनी सरकारला भूमिहीन दलितांना जमीन देण्याची देखील मागणी केली होती.

जिग्नेश मेवानी यांचं नाव चर्चेत आलं ते २०१७ मध्ये उना येथे गोरक्षेच्या नावावर दलितांना मारहाण झाली होती. त्या हिंसेविरोधात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केलं होतं. यात त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बऱ्याचदा टीका केली होती.

यानंतर त्यांनी ‘आझादी कूच आंदोलन’ सुरु केलं होतं. ज्यात २० हजार दलितांना जनावर न उचलण्याची आणि मैला वाहून न नेण्याची शपथ दिली होती. ते म्हणाले होते, दलित आता सरकारकडे दुसऱ्या कामाची मागणी करतील. याच नंतर त्यांचं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं होतं. 

दलितांवर होणाऱ्या अत्याचाराला ते सरकारला जबाबदार धरतात. हिंदुत्व हा भाजपचा अजेंडा आहे, त्यामुळे हे सरकार असताना दलितांचं भलं कदापि शक्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. 

काही काळ त्यांनी आम आदमी पक्षाचं काम केल्यानंतर २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वडगाम मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि निवडणून देखील आले आहेत.

४. उमर खालिद 

दिल्लीचा रहिवासी असलेला उमर खालिद सर्वात पहिल्यांदा चर्चेत आला ते २०१६ मध्ये जेएनयुमधील कथित कार्यक्रमानंतर. अफजल गुरुला दिलेल्या फाशीच्या विरोधात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा आरोप झाला होता. यानंतर कन्हैया कुमारसह ७ जणांना अटक करण्यात आली होती. पण त्यात खालिद नव्हता, काही दिवसानंतर टीव्ही चॅनेलवरील दिसू लागल्यानंतर फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती.

जमीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा मोदी सरकार विरोधात अनेक बोलताना दिसू लागला, सातत्याने बातम्यांमध्ये झळकू लागला होता. पुढे २०१८-१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्रातील भीमा-कोरेगाव दंगली मध्ये देखील त्याच नाव आलं. २ समुदायांमध्ये तेढ निर्माण करणारे भाषण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता.

उमर खालिदला राष्ट्रीय पातळीवरील ओळख मिळाली ती २०१९-२० मध्ये झालेल्या नागरिकत्व कायदा विरोधी आंदोलनादरम्यान.

दिल्ली आणि संपूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन पोहचण्यासाठी त्याने ठिकठिकाणी सभा घ्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतभेटी दरम्यान झालेली दिल्ली दंगली घडवून आणण्यात उमरचा हात असल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला.

उमर खालिद आणि त्याचा मित्र दानिश यांनी ही दंगल घडवून आणण्याचा डाव रचला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याच आरोपात त्याला देशातील अतिरेक्यांच्या विरोधात वापरला जाणाऱ्या UAPA कायद्याद्वारे अटक करण्यात आली होती.

५. राकेश टिकैत

दिल्लीतील शेतकरी आंदोलना दरम्यान मागच्या आठवड्यात झालेल्या हिंसेनंतर भारतीय किसान यूनियन (टिकैत) गटाचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांचा टीव्हीवर धीरगंभीर आवाजात ‘एकवेळ आत्महत्या करेन पण आंदोलन मागे घेणार नाही’ असा निश्चय व्यक्त करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.

त्यांच्या डोळ्यात शेतकऱ्यांप्रती तळमळीचे अश्रू होते. यानंतर शेतकऱ्यांनी त्यांच्या निश्चयाला आणि अश्रुना नुसता सकारात्मक प्रतिसादच दिला नाही तर सामानाची आवारावर केलेले शेतकरी पुन्हा एकदा नव्या दमाने आंदोलनात सहभागी झाले.

जेष्ठ शेतकरी नेते महेंद्रसिंग टिकैत यांचे सुपुत्र असलेले राकेश हे भारतीय किसान युनियनचे २०१२ पासून राष्ट्रीय प्रवक्ता आहेत. अगदी ९० च्या दशकापासून ते वेगवेगळ्या ठिकाणी शेतकाऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत.

त्यामुळे त्यांना याआधी देखील शेतकरी आंदोनाचा चेहरा म्हणून ओळखलं जात होतं, पण असं म्हणतात की सध्याच्या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याने राकेश टिकैत यांना संपूर्ण भारतभर ओळख मिळाली आहे. या संपूर्ण शेतकरी आंदोलनाची संपूर्ण रुपरेषा तेच ठरवत आहेत.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.