सायकलवरून गोळ्या विकणारा सिंधी माणूस महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हलवू लागला

आपल्या डोळ्यासमोर घडणारं राजकारण आणि पडद्यामागे घडणारं राजकारण यात जमीन अस्मानच अंतर आहे असं म्हणतात. काही खिलाडी असतात ज्यांचं नाव देखील आपल्याला ठाऊक नसत पण सरकारे पाडणे किंवा निवडून आणणे त्यांच्या हातात असते. आपल्या डावपेचांनी राजकारणाची दिशा बदलणारे असे नेते कधी कुठल्या पक्षाचे नसतात पण जेव्हा कधी संकटाची वेळ आली तेव्हा प्रत्येक पक्ष त्यांच्याकडे मदतीचा हात घेऊन जातो.

अशाच पॉलिटिकल मॅनेजर मध्ये सर्वात अग्रक्रमाने नाव यायचं कन्हैयालाल गिडवाणी यांचं.

स्वातंत्र्यावेळी फाळणीमुळे देशोधडीला लागलेल्या सिंधी समाजात त्यांचा जन्म झाला. मुळगाव सांगली. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. पटवर्धन हायस्कुलमध्ये शिकायला होते. वडिलांचा छोटा मोठा व्यवसाय पण यात संपूर्ण कुटूंबाचं पोट भरायचं नाही. खूप लहान वयात कन्हैयालाल गिडवाणी उद्योगधंद्याला लागले.

सांगलीच्या गल्ली बोळात फिरून सायकलवर अडकवलेल्या पिशवीतील गोळ्या बिस्किटे विकणारा हा तरुण टप्पे टोणपे खात व्यवहारी जगाला सामोरे जायला शिकला. व्यापारी कुटूंबात जन्मलेला असल्यामुळे अंगभूत शहाणपण होतं पण आजूबाजूला काय घडतंय हे समजावून घेण्याची चौकस बुद्धी देखील होती.

पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजण्याचा हा काळ. ठिकठिकाणी साखर कारखाने उभे राहू लागले होते. ऊसाच्या साखरेने ग्रामीण भागात समृद्धी आणली होती, विकासाची गंगा वाहू लागली होती. या गंगेत हात धुवून घेता येईल पहिली जाणीव कन्हैयालाल गिडवाणी यांना झाली.

साखरेचं राजकारण कस चालतंय, त्याची बाजारपेठ कशी असते, सरकारी धोरणे, आयात-निर्यात आंतरराष्ट्रीय स्थिती याचे साखरेवर कसे परिणाम होतात या किचकट प्रकरणाचा त्यांनी गाढा अभ्यास केला. 

वसंतदादा पाटील हे त्याकाळी सहकारातील मोठं नाव. लोकांची सुखदुःखे समजून घेणारा लोक नेता. शाळेतील शिक्षण झालं नसलं तरी व्यवहारातील ज्ञानाने हुशार होते. शेतकऱ्याला त्याच्या घामाचा पैसा फक्त सहकारातूनच मिळेल हे त्यांनी ओळखलेलं. सांगली शेतकरी सहकारी साखर कारखाना उभा केलाच पण यशवंतराव चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचं नेतृत्व सुद्धा त्यांच्याच हातात आलं.

कृष्ण कोयना पंचगंगेच्या पाण्यावर ऊस जोमाने पिकू लागला, सहकारी कारखाने मोठ्या प्रमाणात साखर बनवू देखील लागले मात्र अजून बाजारपेठेचा अंदाज त्यांना लागत नव्हता. मोठमोठे व्यापारी भावावर नियंत्रण ठेऊन बसलेले होते. या व्यापाऱ्यांच्या मोनॉपोलीला धक्का देण्यासाठी त्यांच्याच सारखा चाप्टर डोक्याचा माणूस वसंतदादा पाटलांनी शोधून काढला.

तो म्हणजे हे कन्हैयालाल गिडवाणी.

गिडवाणी लवकरच वसंतदादांच्या खास वर्तुळात जाऊन पोहचले.

दादा तोवर राज्याचे आघाडीचे नेते बनले होते. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांशी त्यांनी थेट वैर घेतलं होतं. दादांच्यासोबतच सांगलीवरून मुंबईला आलेल्या गिडवाणी यांनी तिथेही चांगलाच जम बसवला. साखरेचं राजकारण सांभाळणारे गिडवाणी जीभेवर खडीसाखरेसारखी मिठ्ठास वाणी घेऊन वावरायचे. यामुळे राजकारणातील बडे आसामी आणि उच्चपदस्थ नोकरशाहीसोबत त्यांचा दोस्ताना निर्माण झाला.

पुढे शंकरराव चव्हाण यांच्याशी झालेल्या मतभेदातून दादांच मंत्रिपद गेलं , त्यांनी राजकारण संन्यास जाहीर केला.

मंत्रिपद गेलं तरी वसंतदादांचे राजकीय वजन अबाधित होते. त्यांचा ७० वा वाढदिवस सांगलीला धुमडाक्यात करायचं कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं. नेमकं तेव्हा नागपूरला विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते. काँग्रेसचे मंत्री आणि आमदार यांनी सांगलीला जाऊ नये, यासाठी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी हरप्रकारे प्रयत्न केले.

पण दादा समर्थक आमदार काहीही झालं तरी सांगलीला जाणारच अशी भूमिका घेतली. कन्हैयालाल गिडवाणी यांनी मुख्यमंत्र्यांच्या नाकावर टिच्चून या आमदारांना खास चार्टर्ड विमानाने नागपूर वरून सांगलीला आणलं आणि रातोरात परत देखील सोडलं.

वसंतदादांच्या वाढदिवसाच्या जंगी कार्यक्रमाचे चोख आयोजन करणारे कन्हैयालाल गिडवाणी सर्व राजकीय नेत्यांच्या नजरेत भरले.

पुढे दादा मुख्यमंत्री झाले, त्यांना राजीनामा द्यावा लागला. शरद पवार, अंतुले, बाबासाहेब पाटील असे अनेक मुख्यमंत्री मोजक्या वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राने पाहिले. या काळात विशेषतः शालिनीताई पाटलांशी कन्हैयालाल गिडवाणी यांचे सूर जुळले. कर्नाटकात रामकृष्ण हेगडे यांचे सरकार पाडायचा विडा उचलून शालिनीताई बेंगलोरला आल्या तेव्हा त्यांना रसद गिडवाणी यांनीच पुरवली होती.

असं म्हणतात की गिडवाणी तिथल्या हॉटेलात पैशांच्या बॅगेसह पोलिसांना सापडले होते. पण या सर्व प्रकरणातून गिडवाणी सहीसलामत बाहेर पडले. मुंबईमध्ये सर्व राजकीय वर्तुळांमध्ये त्यांचा सहज संचार सुरु होता.

वसंतदादांच्या मृत्यूनंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात जनता दलाची साथ पकडली.

नासिकराव तिरपुडे यांच्यासारख्या नेत्याला काँग्रेसमधून जनता पक्षात नेण्यात त्यांचाच हात होता. लवकरच पंतप्रधान व्हीपी सिंग यांच्या निकटवर्तीयांसोबत ते दिसू लागले. व्हीपी सिंग यांचं सरकार पडल्यावर चंद्रशेखर यांच्या पक्षात गेले. पडद्याआड राहून प्यादे हलवणे यात त्यांनी स्पेशलायजेशन  मिळवलं.

 १९९५ सालच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले तेव्हा गिडवाणी यांचं राज्यातलं महत्व प्रचंड वाढलं . मुख्यमंत्री शरद पवारांच्या काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. शिवसेना भाजप युतीला देखील सत्तेत जाण्यापासून काही मते कमी पडत होती. बाळासाहेबांनी कन्हैयालाल गिडवाणी यांची मदत घेतली. त्यांनी आपली खास टेक्निक वापरून अपक्ष आमदार शिवसेनेच्या पाठीशी उभे केले.

विधानसभेवर शिवसेना भाजप युतीचा भगवा झेंडा फडकला यात कन्हैलाल गिडवाणी यांचा सिंहाचा वाटा होता. राजकारणाची सगळी सूत्र त्यांनी हलवली होती.

किंगमेकर म्हणून त्यांना नाव मिळालं. कन्हैयालाल गिडवाणी शिवसेनेत आले. शिवसेनाप्रमुखांनी त्यांना विधानपरिषदेवर आमदार देखील केलं. त्यावेळी विधानसभेत लातूरमधून पडलेल्या विलासराव देशमुखांना शिवसेनेत आणायची जबाबदारी गिडवाणी यांनी उचलली होती.

गिडवाणी यांचं ऐकून विलासराव काँग्रेस सोडून विधानपरिषदेला अपक्ष उभे देखील राहिले पण त्यांचा पराभव झाला. विलासरावांचा शिवसेना प्रवेश टळला.

खुद्द कन्हैयालाल गिडवाणी देखील शिवसेनेत फार काळ रमू शकले नाहीत. त्यांना विधानपरिषदेची दुसरी टर्म नाकारण्यात आली आणि ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यापाठोपाठ शिवसेना सोडून स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये दाखल झाले. राणेंच्या खास गटातले म्हणून त्यांना ओळखलं जायचं.

२००९ च्या निवडणुकांपूर्वी काँग्रेसने त्यांना प्रदेश प्रवक्तेपद दिले. पण दुर्दैवाने गिडवाणी राजकारणाच्या खेळात मागे पडत चालले होते. पक्षाने त्यांना राज्यसभा सोडाच पण विधानपरिषदेचं तिकीट देखील दिलं नाही.

पण तरीही त्यांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा व्यापार, साखरेच्या राजकारणामागे चालू असणारा कोट्यवधींचा गैरव्यवहार याची खडान खडा माहिती यामुळे त्यांचं महत्व कधी कमी झालं नाही. आपल्या खास मैफिलीत पत्रकारांना राजकारणात सुरु असलेल्या पडद्याआडचे किस्से ते रंगवून रंगवून सांगायचे.

आजकाल पत्रकारिता क्षेत्रात सूत्रांच्या हवाल्याने हा शब्द फेमस झाला आहे तेव्हाच्या राजकारणात खास खबरीचे सूत्र बऱ्याचदा गिडवाणी हे असायचे.

अचानक उदभवलेल्या आदर्श सोसायटी प्रकरणात मात्र गिडवाणी यांना पुरत अडकवलं. ते या सोसायटीचे प्रवर्तक होते. शहिद सैनिकांच्या नातेवाईकांसाठी आरक्षित असणाऱ्या जागेत हि सोसायटी उभी असल्याचे आरोप झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यां राजीनामा द्यावा लागला. विलासराव, सुशीलकुमार शिंदे अशा अनेक दिग्गज नेत्यांचा कथितपणे या घोटाळ्यात सहभाग होता असे आरोप झाले.

गिडवाणी यांच्यामागे कोर्ट कचेऱ्यांचे सत्र सुरु झालं.

एकेकाळी ज्यांना आपलं मानले ते सर्वजण दुरावले. पण तरीही गिडवाणी यांनी हार मानली नाही. त्यांनी एकाकी लढा सुरूच ठेवला. पुढे आदर्श सोसायटी प्रकरणामध्ये घोटाळा झालाच नसल्याचं कोर्टाकडून पुढं आलं पण हे पाहण्यासाठी कन्हैयालाल गिडवाणी हयात नव्हते.

२०१२ साली त्यांचं निधन झालं. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला एका निर्वासित कुटूंबात जन्मलेला हा माणूस फक्त आपल्या हुशारीच्या जोरावर राजकारणाच्या शिड्या चढत गेला. प्रत्येक पक्षात, प्रत्येक क्षेत्रात आपल्या साखरेसारख्या मिठास वाणीने माणसे जोडली. राजकारणाचे डाव मांडले आणि मोडले. महाराष्ट्राच्या सत्ताकारणाची अनेक रहस्ये त्यांच्याबरोबरच या जगातून निघून गेली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.