कोल्हापूरमध्ये मिळालेल्या पहिल्या मानधनातून राज कपूरने मुंबईत RK स्टुडिओ उभा केला.

भारतीय फिल्मइंडस्ट्रीचे सर्वात मोठे शो मन म्हणजे राज कपूर आणि त्यांनी बनवलेलं भव्यदिव्य कलाकृती म्हणजे आर के स्टुडिओ.

अवघ्या २४ व्या वर्षी या स्वप्नाळू डोळ्याच्या मुलाने हा स्टुडिओ बनवला आणि भारतीय सिनेमाचं रुपडं पालटून टाकलं.

आवारापासून ते मेरा नाम जोकर पर्यंत अनेक माईलस्टोन सिनेमे इथे बनले. एका हातात व्हायोलिन आणि दुसऱ्या हातात नर्गिस यांना पकडलेल्या राज कपूर यांची मूर्ती असलेला आर के चा लोगो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला आहे.

अशा या महान स्टुडिओची मुहूर्तमेढ मात्र कोल्हापुरात घातली गेली होती.

गोष्ट आहे चाळीसच्या दशकातली. कोल्हापूर ही भारतीय फिल्मइंडस्ट्रीची राजधानी मानली जात होती. बाबुराव पेंटर, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर असे अनेक दिग्गज इथे बनवत असलेल्या सिनेमाची कीर्ती जगभरात पसरली होती. अनेक मोठे मोठे सिनेस्टार कोल्हापुरात राहायला होते.

यातच होते पृथ्वीराज कपूर आणि त्यांची फॅमिली.

पेशावर मधून अभिनय क्षेत्रात नाव करायचं म्हणून आलेले पृथ्वीराज कपूर हे सिनेमा सृष्टीत स्थिरस्थावर झाले होते. हिंदी बोलपटामध्ये त्यांना पहिली संधी कोल्हापुरातच मिळाली होती.

शूटिंगच्या निमित्ताने ते व अख्ख कपूर कुटूंब कोल्हापूरला राहायला आलं होतं.

त्यांची मुले लहान होती. रोज संध्याकाळी तीन चाकी सायकल चालवणाऱ्या शशी कपूरला घेऊन हे सगळे रंकाळाच्या चौपाटीवर फेरफटका मारायला जायचे.

कोल्हापुरात जयप्रभा स्टुडिओमध्ये भालजी पेंढारकर ‘वाल्मीकी’ या चित्रपटाचे चित्रीकरण करीत होते. यात पृथ्वीराज कपूर यांची मुख्य भूमिका होती.

तगड्या पृथ्वीराज कपूर यांच्या सोबत त्यांचा १५-१६ वर्षांचा थोरला मुलगा राज देखील शूटिंग पाहायला यायचा. गोरा गोमटा निळ्या डोळ्यांचा राज कुतूहलाने भालजी पेंढारकर यांची सिनेमा बनवण्याची प्रक्रिया पाहत असायचा.

भालजींना हा हुशार चुणचुणीत छोकरा खूप आवडला.

त्यांनी पृथ्वीराज कपूर यांना सांगून राजला आपल्या सिनेमात नारदमुनीची छोटीशी भूमिका दिली. या सिनेमात राजने अभिनय तर केलाच पण शिवाय सिनेमाच्या प्रोडक्शनमध्ये देखील भालजींना छोटी मोठी मदत केली.

पुढे बॉलिवूडचा सर्वात मोठा हिरो, सिनेमेकर, दिग्दर्शक बनलेल्या राज कपूरच्या चेहऱ्याला पहिल्यांदा रंग लागला तो ही चित्रनगरी कोल्हापूर मध्ये. इथेच त्याने सिनेमा बनवण्याची धुळाक्षरे गिरवली.

वाल्मिकी सिनेमा बनला. कपूर कुटूंबीय मुंबईला परतण्यास तयार झाले. निघण्यापूर्वी भालजींनी राज कपूरच्या हातात पाच हजार रुपये दिले. स्वातंत्र्यापूर्वीचे ५ हजार म्हणजे आजचे लाखो रुपये.

पृथ्वीराज कपूर यांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते पेंढारकर यांना म्हणाले,

” बाबाजी, माझा मुलगा अजून खूप लहान आहे. ५ हजार रुपये बिदागी घेण्याच्या लायक नाही. ते पैसे तुम्ही परत घ्या.”

भालजी पेंढारकर हे पृथ्वीराज कपूर यांच्या पत्नीला बहीण मानायचे. ते म्हणाले,

“मी निर्माता म्हणून नाही तर एक मामा म्हणून माझ्या भाच्याला त्याची पहिली कमाई देत आहे. ते पैसे परत घेतले तर मला खूप वाईट वाटलं. मला तसं करायला लावू नका.”

पृथ्वीराज कपूर यांची पंचाईत झाली. भालजींचं मन राखण्यासाठी त्यांनी राजला ते पैसे स्वीकारायला लावले.

मात्र एवढी मोठी रक्कम अल्लड वय असलेल्या राजकडे ठेवू दिली नाही. याच पैशातून त्याकाळी मुंबई बाहेर असलेल्या चेंबूर येथे राजच्या नावावर ३ एकर जमीन घेतली.

याच जागी पुढच्या दोन तीन वर्षात राज कपूरने स्वतःच्या हिंमतीवर एक स्टुडिओ उभारला. त्याला स्वतःचे नाव दिले,

“आर के बॅनर”

वयाच्या २४ व्या वर्षी राज कपूरने पहिला सिनेमा बनवला. त्यापूर्वी त्याने कोल्हापूरला जाऊन आपले पहिले गुरू भालजी पेंढारकर यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

पुढील काळात राज कपूर आणि त्याचा आर के बॅनर जगप्रसिद्ध झाला. त्याकाळच्या सिनेमा बनवण्याच्या सर्व सोई सुविधा या स्टुडिओमध्ये होत्या. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, यांच्या पासून ऋषी, रणधीर, रणबीर यांच्या पर्यंत अनेक जण इथे घडले.

कपूर फॅमिली भारतीय सिनेमा क्षेत्रातील सर्वात मोठे घराणे म्हणून ओळखले गेले.

गेल्या काही महिन्यांपूर्वी मनावर दगड ठेवून कपूर कुटूंबियांना हा स्टुडिओ विकावा लागला. त्यावेळी बोलताना देखील रणधीर कपूर यांनी स्टुडिओच्या निर्मितीसाठी असलेले भालजी पेंढारकर यांचे योगदान विशेष होते हा उल्लेख केला.

कोल्हापूरचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही असं त्यांनीं सांगितलं.

मध्यंतरी कोल्हापूर मध्ये राज कपूर यांचा पुतळा देखील उभारण्यात आला होता. आजही कपूर कुटूंबातील कोणीही कोल्हापूरला आले तर ते अंबाबाईच दर्शन तर घेतात मात्र इथली माती कपाळाला लावून आपल्या अन्नदात्या नगरीला लवुन नमस्कार करतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.