एकेकाळी लॉटरी विकणाऱ्या लक्ष्यामामांनी विचारही केला नव्हता की त्यांचाच फोटो लॉटरीवर येईल…

शनिवार रविवार हे दिवस आता कितीही कॅज्युअल वाटत असले तरी एक काळ असा होता की या दिवसांनी एखाद्या महत्वाच्या दिवसासारखं म्हणजे चतुर्थी, महाशिवरात्री किंवा एकादशी असं स्वरूप होतं आणि या दिवसांनी महत्व होतं ते त्याकाळच्या दोन आघाडीच्या शिलेदारांचं एक म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि दुसरे म्हणजे अशोक सराफ.

नंतरच्या काळात या दोन दिग्गजांना लोकांनी मामा बनवलं आणि असं मामा बनवलं की ते दोघ टीव्हीवर दिसले तरी लोकं त्यांना मामा म्हणतात. यातले दीर्घकाळ स्मरणात राहतील ते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. या माणसाने पिढ्या हसवल्या इतक्या मोठ्या ताकदीचा नट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे होते.

अशोक सराफ अधूनमधून आपल्याला दिसतात पण लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यानंतर सगळ्यांच्याच काळजात चर्र झालं होतं.

लक्ष्यमामा म्हणल्यावर विनोद ओघाने आलाच, प्रचंड हजरजबाबी आणि डोळ्यांच्या बाहुल्यातून बोलण्याची कला ही फक्त लक्ष्मीकांत बेर्डेना जमली. अनेक नट ओढूनताणून कॉमेडी करायचा प्रयत्न करतात पण एकदम सहजसोप्या पद्धतीने आणि अजिबात कंबरेखालचे विनोद न करता निखळ मनोरंजन लक्ष्मीकांत बेर्डे करायचे.

नाटकात पडदे ओढण्याचा रोल करण्यापासून ते मराठी सिनेमा इंडस्ट्रीतला सगळ्यात जास्त मानधन घेणारा कलाकार म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे उदयास आले याच लक्ष्या मामांची एक भारी गोष्ट आहे म्हणजे यश मिळवणं, सक्सेस होणं काय असतं ते या माणसाकडून शिकायला मिळतं.

सुरवातीला नाटकांमध्ये फारशी कमाई नसायची, व्यावसायिक नाटकांना गर्दी खेचून आणणे म्हणजे मोठं दिव्य मानलं जायचं त्या काळात हाऊसफुल्ल शो करणारे लक्ष्मीकांत बेर्डे होते. स्टारडम इतकं मोठं होतं की नाट्यगृहा बाहेरच्या पाटीवर लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव वाचूनच लोकं तिकिटं खरेदी करायची कारण त्यांना माहीत असायचं की लक्ष्मीकांत बेर्डे हिरो आहे म्हणल्यावर हसण्याची शंभर टक्के हमी.

पण लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मराठीतला सगळ्यात मोठा स्टारडम मिळवण्याचा प्रवास मुळातच सोपा नव्हता. यशाच्या शिखरावर थंडी वाजते म्हणणारा हा नट दिग्गज लोकांपैकीच एक पण आपल्या भूमिकेने प्रेक्षकांना वेडावून या माणसाने सोडलं.

सुरवातीला कामच मिळत नसायचं तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी पोटापाण्यासाठी कामधंदा शोधायचं ठरवलं. 

मग या खडतर काळात रेल्वे स्टेशनवर चणे फुटाणे विकण्याचं कामसुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केलं. नाटकाच्या तुटपुंज्या पैशातून म्हणजे नाटकात पडदा ओढणाऱ्या मुलांचं रोजंदारीचं काम लक्ष्मीकांत बेर्डे करायचे पण ते फार पैसे नसायचे म्हणून त्या मिळालेल्या मानधनातून वेगळं काहीतरी काम काढायला हवं म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे धडपडत होते.

मग त्यांना एकाने लॉटरी विकण्याचा सल्ला दिला, तो फक्त सल्ला होता पण लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ती गोष्ट मनावर घेतली आणि रेल्वे स्टेशनवर ते लॉटरी विकू लागले. लॉटरी विकता विकता ओळखी वाढू लागल्या आणि नाटकाचं वेड होतंच त्यामुळे नाटकातून हळूहळू छोट्या छोट्या भूमिकाही मिळत गेल्या. 

मग पुढे महेश कोठारे यांच्याशी लक्ष्मीकांत बेर्डे यांची भेट झाली धुमधडाका सिनेमा लक्ष्मीकांत बेर्डे यांना मिळाला, नंतर दे दणादण, धडाकेबाज, झपाटलेला अशा अनेक सिनेमांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना मोठं ग्लॅमर आणि स्टारडम मिळवून दिला.

नंतर एकेदिवशी स्टेशनवर फिरत असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक लॉटरी विकणारा दिसला आणि सहज आपणही तेच काम करत होतो म्हणून उत्सुकतेने ते तिथे गेले तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण लॉटरीवर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो होता.

यश म्हणजे काय असतं याच हे सगळ्यात भारी उदाहरण, एकेकाळी लॉटरी विकणारे लक्ष्मीकांत बेर्डे स्वतःलाच लॉटरीच्या तिकिटावर पाहुन चकित झाले होते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.