अमेरिकेत बॅन असलेला लाईफबॉय साबण भारतात सगळ्यात जास्त विकला जातो….

आजच्या जमान्यात साबणाच्या जाहिराती टीव्हीवर इतक्या मोठ्या प्रमाणावर दाखवतात कि नक्की कोणती साबण निवडायची असे प्रश्न पडतात. हमाम, हळद चंदन मिक्स संतूर, डव्ह, डेटॉल अशा अनेक जाहिराती चालू असतात. पण आजसुद्धा असा एक साबण आहे जो आपली लोकप्रियता तशीच टिकवून आहे. तर आजचा किस्सा आहे लाईफबॉय साबणाचा. या साबणाला गावाकडं लायबॉय सुद्धा म्हणताना तुम्ही ऐकलं असेल.

इंग्लंडच्या युनिलिव्हर कंपनीच्या दोन भावांनी १८९५ मध्ये लाईफबॉय साबण बाजारात आणला. या लाईफबॉय साबणामुळे खऱ्या अर्थाने युनिलिव्हर कंपनीचा व्यवसाय वाढला. युरोपात या लाईफबॉय साबणाने चांगलाच धुमाकूळ घातला.

लाईफबॉय हे नाव ठेवण्यामागे इंग्लंडमधली एक कथा सांगितली जाते कि एका मुलाने समुद्रात वाहून जाणाऱ्या लोकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलं होतं. बॉय व्हू सेव्हज लाईफ यावरून लाईफबॉय हे नाव पुढे कायम झालं.

सुरवातीला एका विशिष्ट पिवळ्या रंगाच्या पॅकेटमधून लाल रंगाची अष्टकोनी वडी मिळायची. लाईफबॉय हा साबण सुरवातीला खेळाडूंसाठी तयार केला गेला होता आणि फक्त पुरुषांसाठीच बनवला गेला होता. कारण तेव्हा मेल डॉमिनन्स जास्त होता. पण हा ब्रँड महिलांमुळेच खरा मोठा झाला.

कार्बॉलिक असलेल्या लाईफबॉय मध्ये फेनॉलचं प्रमाण जास्त होतं आणि एक विशिष्ट सुगंध त्यातून येत असे त्यामुळे मार्केटमध्ये हातोहात हा साबण विकला जायचा.  युनिलिव्हर कंपनीने भारतात हा साबण विकायला सुरवात केली तेव्हा त्यांना भारतातून चांगलाच प्रतिसाद मिळवला. दुसऱ्या महायुद्धानंतर लाईफबॉय साबण चांगलाच दूरवर पसरला. 

टीव्हीवर जाहिरातीचा सगळ्यात उत्तम वापर लाईफबॉयनेच केला असं म्हणावं लागेल.

कारण डॉक्टरांकडे जाण्यापासून वाचायचं असेल तर तुम्हाला लाईफबॉय साबण वापरावाचं लागेल अशा प्रकारातून लिव्हर ब्रदर्सने प्रमोशन करायला सुरवात केली.

किटाणू आणि रोगांपासून रक्षण करण्यासाठी उपाय म्हणजे केवळ लाईफबॉय अशा त्यांच्या या जाहिरातीने लाईफबॉय मार्केटमध्ये वजन निर्माण करू पाहत होती.

लोकांमध्ये त्यांची हि डॉक्टरांपासून दूर राहण्यासाठी लाईफबॉय वापरा हि जाहिरात असरदार ठरली. लोकं भीतीने आणि जागृतीसाठी का होईना हि साबण घेऊ लागले. १९३३ मध्ये लाईफबॉय भारतात आला आणि भारतातला जवळपास ६७% नफा कमावू लागला. टीव्हीमध्ये जाहिरात होती कि लाईफबॉय हैं जहाँ तंदुरुस्ती हैं वहा…१९३२ ते १९४८ या काळात लाईफबॉयने ६० देशांसोबत आपला व्यापार जोडला होता.

लाईफबॉय हा त्याकाळात एकमेव उत्तम साबण असल्याने त्याला प्रतिस्पर्धी कोणी नसल्याने मार्केटमध्ये त्याची लगेच विक्री व्हायची. भारतामधे हिंदुस्थान युनिलिव्हर म्हणून त्यांचा व्यापार चांगलाच बहरला. युनिलिव्हरने बरेच प्रोडक्ट बाजारात उतरवले. पण लाईफबॉयने जे मार्केट कंपनीला मिळवून दिलं तस इतर कुठल्याही प्रोडक्टला जमलं नाही.

लाईफबॉय पुढे मात्र २००६ सालापासून अमेरिकेतून गायब होऊ लागला. जगातली वाढती लोकप्रियता आणि अमेरिकेत हा साबण बॅन झाला त्यामुळे युनिलिव्हरचं मोठं नुकसान झालं. मानवी त्वचेसाठी हा साबण धोकादायक असल्याचं अमेरिकेत बोललं जाऊ लागलं, त्यामुळे लोकांनी लाईफबॉय घेणेच बंद केलं. भारतात मात्र या साबणाची डिमांड आजही तशीच आहे जशी अगोदर होती. 

भारतात तर अनेक गावांमध्ये हा लाईफबॉय साबण जनावरं धुण्यासाठी वापरला जातो.

जागतिक पातळीवर सगळ्यात जास्त हा साबण भारत, ब्राझील त्रिनिदाद टोबॅगो अशा देशांमध्ये विकला जातो. कोटींमध्ये आज लाईफबॉय उलाढाल करतं. भारतात तसूभरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

आजारपणातून बरं होण्यासाठी लाईफबॉय फायदेशीर असल्याचं बोललं जातं, जाहिरातींचा आणि प्रमोशनचा योग्य वापर करून लाईफबॉय जगभर पोहचली. आज क्रिकेटमध्ये बांगलादेश संघाचा स्पॉन्सर म्हणून लाईफबॉयला ओळखलं जातं. 

आजच्या काळात लाईफबॉयने फेनॉलचं प्रमाण कमी करून वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये [ हँडवॉश ]लाईफबॉय मार्केटमध्ये उतरवला आहे. अमेरिकेत बॅन झालेला हा साबण भारतात मोठ्या प्रमाणावर विकला जातो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.