तुमच्या वॉट्सएपवरच्या एका अफवेमुळं तिकडे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान होतयं…

मागच्या आठवड्यात कोरोनाचे पेशंट वाढायला लागले आणि सरकारने पुन्हा निर्बंध लावायला सुरुवात केली. यात काही जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली. तर काही ठिकाणची शाळा-महाविद्यालय बंद केली. अमरावती, नागपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये संख्या जास्त असल्यामुळे निर्बंध कडक केले. मात्र या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या अफवेनं जोर धरलाय.

मात्र सरकारकडून अशा कोणत्याही पद्धतीच्या लॉकडाऊनची घोषणा अद्याप तरी झालेली नाही.

पण याच अफवेचा परिणाम आता शेतीमालावर व्हायला सुरुवात झाली आहे. आणि याचा सर्वात जास्त फटका बसलाय तो द्राक्षाला आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला. मागच्या ३ ते ४ दिवसात बाजारात द्राक्षांच्या दरात ४ किलोच्या पेटीमागं कमीत कमी ७० ते ८० रुपयांचे दर कमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

या बाबत द्राक्ष भूमी उत्पादक कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित झांबरे यांनी ‘बोल भिडू’ला बोलताना व्यापाऱ्यांनी अफवेमुळे सौदे बंद केल्याचं सांगितलं. 

ते म्हणाले, लॉकडाऊनच्या घोषणेमुळे द्राक्षाचे दर कमी येऊन शेतकऱ्याला फटका बसायला सुरुवात झाली आहे. आणि जो पर्यंत सरकार लॉकडाऊनबद्दल स्पष्ट काही सांगत नाही तो पर्यंत हे दर कमी येतंच राहणार. भीतीमुळे व्यापाऱ्यांनी सौदे करायचं बंद केलं आहे, स्टॉक करून ठेवायला नाही म्हणत आहेत. मालाचा उठाव होईना झालायं, आणि त्याचा परिणाम म्हणजे दर पडतात.

आता यात पण वेगवेगळ्या जातीची द्राक्ष आहेत, माणिकचमनचे दर १२० ते १३० रुपयांपर्यंत खाली आलेत, त्याचे आधी दर कमीत कमी १८० ते २०० रुपये होते. सुपर सोनाकाचे दर होते २०० ते २१० रुपये होते ते आता १५० ते १६० रुपयांवर आले आहेत. एसएस आणि आरके या जातीचे दर २५०-२७० च्या घरात होते, ते आता १७० पर्यंत घसरले आहेत.

तासगाव तालुक्यातील सावळज गावातील शेतकरी राजू हिंगमिरे यांनी उठावं नसताना व्यापारी गाड्या भरतं असल्याचं म्हंटल आहे.

ते म्हणाले, आता लॉकडाऊन तर कुठेच नाही, पण व्यापारी शेतकऱ्यांना लॉकडाऊनची भीती घालून माल उठत नाही, खपत नाही अशी भीती घालून दर पाडत आहे. आमची रोज व्यापाऱ्यांशी चर्चा होते, यात ते उठावं नाही सांगतेत, पण गाड्या रोज भरायचं चालू आहे. त्यामुळे व्यापारी या अफवेचा फायदा घेत आहेत हे नक्की.

या अफवेचा एक्स्पोर्ट्सच्या मालावर काही परिणाम झाला आहे का? या प्रश्नावर सातारा जिल्ह्यातील किवळ गावातील सागर शिंदे या निर्यातदार शेतकऱ्याने सांगितले की,  

या अफवेचा परिणाम एक्स्पोर्ट्सच्या मालावर तर दुहेरी स्वरूपातील झाला आहे, हे नक्की. युरोपमध्ये लॉकडाऊन चालू आहे, चीन आपला माल घेत नाही त्यामुळे नाइलाजाने हा माल लोकल बाजारात आणला आहे. हा पहिला फटका.

दुसरा फटका म्हणजे हा माल लोकल मार्केटला आल्यावर जशी ही अफवा आली तशी लोकलच्या मालाबरोबर याचा पण पडला.

आता जो आम्ही ७० ते ७५ रुपये किलोने विकत होतो तो आता ४५ ते ५० रुपयांच्या घरात आला आहे. त्यामुळे माझं वैयक्तित कमीत कमी २५ ते ३० हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं आहे.

ही सगळी परिस्थिती पुढच्या आठवड्या पर्यंत सुरळीत होईल अशी अशा नाशिक जिल्ह्यातील निफाड मधील शेतकरी सागर पोटे यांनी व्यक्त केली आहे. 

या आठवड्यात शेतकऱ्याचं नुकसान झालयं हे खरं आहे. आमच्याकडे सौदे बंद नसून उलट लॉकडाऊनच्या अफवेमुळे शेतकरी माल काढणीसाठी गडबड करू लागला आहे, आणि त्याचा फायदा व्यापारी उचलत आहेत. यावेळी शेतकऱ्याला जास्त गरज आहे, असं म्हणतं व्यापारी अडवून बघतात, आणि दर पडतात.

आमच्याकडे आता थॉमसन या लोकल मालाचा दर मागच्या आठवाड्यत ३३ ते ४० रुपये किलो होता, तो आता २० ते २२ रुपयांच्या घरात आला आहे. मी स्वतः माझा प्लॉट मागच्या आठवड्यात ३३ रुपयांनी घातला होता. पण ही सगळी परिस्थिती २८ फेब्रुवारी पर्यंत राहील, जशी लॉकडाऊनची भीती कमी होईल तसे पुढच्या आठवड्यापर्यंत सगळे दर पुन्हा सुरळीत होतील, अशी आशा देखील पोटे यांनी व्यक्त केली.

पुढच्या आठवाड्यत जरी सुरळीत होण्याची अशा असली तरी एका अफवेमुळे द्राक्ष घेणाऱ्या शेतकऱ्याचं आठवड्यात दुसऱ्यांदा नुकसान झालं हे नाकारून चालणार नाही. मागच्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.