लोकशाहीर अमरशेख म्हणजे धग, रग, धुंदी आणि बेहोशी यांची जिवंत बेरीज….!

सूर्य नव्हता शिवबा जन्मले,विश्व आनंदले,  गाऊ लागले चराचरा होऊन शिवबाचे भाट,

आगळा होता त्यांच्या गाण्याचा थाट, काढली शाहिरानं त्यातून वाट

अमर शाहीर शिवबाचा भाट, पवाड्याचा थाट ध्यानी घ्या हो राजे……

हि रचना आहे लोकशाहीर अमर शेखांची.

महाराष्ट्राच्या क्रांतिकारी लढ्यातील आद्य नाव म्हणून अमर शेखांचा उल्लेख येतोच येतो. कामगार चळवळीचे प्रणेते बनून संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या शाहिरीने समाजमन ढवळून काढणारे अमर शेख एक वादळ होतं. २० ऑक्टोबर १९१६ रोजी अमर शेखांचा जन्म झाला.

अमर शेखांचं मूळ नाव होतं मेहबूब हुसेन पटेल होतं.

पण चळवळीच्या कामात जीव वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या मित्रांनी अमर शेख हे नाव ठेवलं आणि तेच पुढे कायम झालं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, द.ना गव्हाणकर आणि अमर शेख या त्रिमूर्तीने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आणि शाहिरीची ताकद काय असते ते दाखवून दिलं.

अमर शेख यांचा टिपेला पोहोचणारा आवाज, त्याला अण्णाभाऊंच्या शब्दांची जोड आणि वरून द.ना गव्हाणकर यांच्या दिग्दर्शनाची झालर या मुळे लोकांच्या काळजात या त्रिमूर्तीने जागा बनवली होती.

तमाशाचा बाज अंगीकारून अण्णाभाऊ, गव्हाणकर आणि अमर शेख यांनी लोकनाट्याला जन्माला घातलं. या बाजामुळे लोकांची अफाट गर्दी शाहिरी कार्यक्रमांना होऊ लागली. या तिघांनी मिळून लाल बावटा कलापथक सुरु केलं होतं. या कलापथकाची ताकद बघून वीर वामनराव जोशी म्हणाले होते,

‘‘जर प्रामाणिक देशभक्तांच्या व्याख्यानांनी देशात एका वर्षांत क्रांती झाली तर या कलाकारांच्या प्रभावी प्रचाराने ते कार्य केवळ तीन महिन्यांत होऊ शकते.’’

गोवा मुक्ती संग्रामाचा हा किस्सा अमर शेखांच्या कन्या लेखिका मल्लिका अमर शेख यांनी सांगितला होता, गोवामुक्ती संग्रामाच्या वेळी तिथे निवडणुका चालल्या होत्या. अमर शेख आणि कलापथकातले पंधराजण गेले होते. अमर शेखांचा प्रचारदौरा आणि त्यांनी तिथे केलेले कार्यक्रम इतक्या झपाट्याने प्रभाव करू लागले की विरोधक चिंतेत पडले.

अमर शेखांना कसं आवरायचं ते विरोधकांना कळेना.

शेवटी एके दिवशी रात्री दोन वाजता विरोधकांनी एका डॉक्टरच्या घरात घुसून त्याला बांधून ठेवून, त्याला आचार्य अत्रेंना खोटा फोन करायला लावला- ‘अमरशेख गेले!’ अत्रेंना प्रचंड धक्का बसला. तेवढ्या रात्री त्यांचे फोन अनेकांना गेले. सगळीकडे एकच पळापळ. 

अकस्मात आलेली लोकशाहीर अमर शेखांच्या निधनाची बातमी कुणालाच पचणारी आणि मानवणारी नव्हती. दुसऱ्या दिवशी बातमी आली की, ती अफवा आहे. शाहीर अमरशेखांचा प्रचारदौरा गोव्यात जोरात धडाक्यात सुरू आहे !

वन टेक गाणं लिहिण्यात अण्णाभाऊ आणि अमर शेख एक्सपर्ट होते, या दोघांनी एकदाच एक लावणी लिहिली होती. ती लावणी होती  ‘ऊन पडले फैना ग, बाई मी बांगडी मैना’  दोघांचं एकमेव शीघ्रकाव्य. एक ओळ न् कडवं अण्णाभाऊंचं, दुसरं अमर शेखांचं.

लोकशाहीर अमर शेख यांनी पोवाडे सुद्धा दर्जेदार लिहिले पण गायकी आणि शाहिरीमुळे त्यांच्या लेखनप्रपंचाकडे दुर्लक्ष झाले. समाजवादी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, उधमसिंगचा पोवाडा, यशवंतराव होळकरांचा पोवाडा असे प्रचंड ताकदीचे आणि ऐतिहासिक संदर्भांना धक्का न लावता त्यांनी दर्जेदार पोवाडे लिहिले.

अत्रेंसोबत अमर शेखांची विशेष दोस्ती होती. अमर शेखांच्या आवाजावर अत्रे कायम खुश असायचे आणि ते म्हणायचे लोकशाहीर अमरशेख म्हणजे धग, रग, धुंदी आणि बेहोशी यांची जिवंत बेरीज….!

गर्जा संयुक्त महाराष्ट्र भारती’, ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा खुशाल कोंबडं  झाकून धरा’ ही अमरशेखांची गीते लहानपोरांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडपाठ होती. अण्णाभाऊंनी लिहिलेली छक्कड माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतिया काहिली अमर शेखांनी सर्वप्रथम गायिली होती.

मुंबईच्या गल्लीबोळात व महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात होणाऱ्या अमरशेखांच्या कार्यक्रमांना १० ते १५ हजार लोक जमत असत. अगदी कार्यक्रमाला जमलेला जमाव शाहिरांच्या गाण्याला कोरस देत असे.

अण्णाभाऊ आणि अत्रे यांच्या निधनानंतर अमर शेख पूर्णतः खचुन गेले होते. पुढे २९ ऑगस्ट १९६९ रोजी लोकशाहीर अमर शेख यांचं निधन झालं. आपल्या लेखनात लोकशाहीर अमर शेख जीवनाबद्दलचं तत्व सांगताना लिहितात कि,

मी जगात एकदाच जन्माला आलो. आणि प्रत्येकजण एकदाच जन्माला येतो यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मरण आले तर ते लाखो लोकांपुढे गाताना, तारसप्तकी स्वर लावताना यावे अशी इच्छा आहे. पण माणसांच्या सर्व इच्छा सफल होतातच असे नाही; पण मी अभिमानाने म्हणेन, की माझे जीवन मी अत्यंत यशस्वीरीत्या जगलो आणि जाताना पण त्या विजयाचा आनंद बरोबर घेऊन जात आहे. जग हे फार सुंदर आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.