पावसापाण्याची पर्वा न करता केवळ दिलेला शब्द पाळण्यासाठी मधुबाला तिथे पोहचली पण..

शाळेमध्ये असताना अगदी दहावीपर्यंत ‘शाळेभोवती तळे साचुन सुट्टी मिळेल काय?’ हि ओळ पावसाळ्यात दरदिवशी मनातल्या मनात म्हणायचो. शाळा आवडायची पण पावसाळ्यात शाळेला दांडी मारायला वेगळीच मजा यायची. थोडं वय वाढल्यावर सुद्धा असंच. आज मुसळधार पाऊस पडून ट्रेन बंद होऊदे, जेणेकरुन ऑफीसला बिनधास्त रजा मारता येईल.

पावसाळ्यात थंडगार वातावरणात सकाळी उठायचाच कंटाळा, तर पुढच्या गोष्टी करायची सोयच नाही. काॅलेजच्या वेळचे दिवस वेगळे असतात, तेव्हा मात्र कितीही पाऊस असुदे, काॅलेज बंद असुदे, मित्रांना भेटायची भरपुर इच्छा घरी शांत बसु द्यायची नाही… असो! हे एवढं सगळं सांगण्याचं तात्पर्य इतकंच, पाऊस आला की कुठेही न जाता घरी थांबण्यास आपलं प्राधान्य असतं.

पण फक्त दिलेला शब्द पाळण्यासाठी हिंदी सिनेजगतातील एक अभिनेत्री मजल-दरमजल करीत शूटींगसाठी गेली होती. या अभिनेत्रीचं नाव मधुबाला.

मुमताज जेहेन बेगम दहलवी अर्थात सौंदर्याची खाण असलेल्या मधुबालाचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ चा. अगदी हाॅलिवूडच्या मरलीन मन्रोसोबत मधुबालाची तुलना करण्यात आली होती. कारण दोघीही सौंदर्यवती असल्या तरीही दोघींचं आयुष्य एक दंतकंथा झालेलं.

भिडूंनो, मधुबाला हि बाॅलिवूडची पहिली हिरोईन जी हाॅलिवूडमध्ये ओळखली जायची.

तो किस्सा असा की, हाॅलिवूडचे नामवंत छायाचित्रकार जेम्स बर्क जेव्हा भारतात आले होते, तेव्हा जगप्रसिद्ध अशा ‘लाईफ’ मॅगझिनसाठी त्यांनी मधुबालाचे फोटो काढले. “आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठी स्टार” अशी उपाधी या ‘लाईफ’ने मधुबालाला दिली होती. ‘लाईफ’ मध्ये मधुबालाचे फोटोग्राफ छापून आल्यावर भारतात मधुबालाची जी प्रचंड लोकप्रियता होती, त्याविषयी या मॅगझिनमध्ये लिहिलं होतं.

यामुळे मधुबालाची महती जगभरात सर्वदूर पोहोचली.

ऑस्कर पुरस्कार विजेते दिग्दर्शक फ्रँक चोप्रा जेव्हा एका फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतात आले, तेव्हा मधुबालाला घेऊन हाॅलिवूडमध्ये एखादा सिनेमा करण्यास ते उत्सुक होते. पण मधुबालाच्या वडिलांनी ‘मधुरा भारतात राहून बाॅलिवूड सिनेमांमध्येच काम करेन’ अशी भुमिका घेतल्याने मधुबालाचा हाॅलिवूडमध्ये प्रवेश झाला नाही.

२२ वर्षांच्या करियरमध्ये मधुबालाने इतकं काम करुन ठेवलंय, की ते काम आज तिच्याठायी असलेल्या प्रतिभावंत अभिनेत्रीची साक्ष करुन देतं. मधुबाला प्रत्येक भुमिका करताना संपुर्ण समर्पण वृत्तीने काम करायची. शुटींगची वेळ पाळण्यात ती काटेकोर असायची. तिच्या वक्तशीरपणाबद्दल हिंदी सिनेजगतात नेहमीच तिचं कौतुक व्हायचं. हल्ली जे कलाकार एक-दोन सिनेमे करुन स्वतःला मोठे कलाकार समजतात, आणि प्रत्येक कार्यक्रमाला उशीरा येणं हे त्यांच्या सवयीचं झालेलं असतं, त्यांनी मधुबालाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा.

दिलेला शब्द कसा पाळावा आणि कामाप्रती प्रेम आणि आदर कसा असावा, यासाठी तुम्हाला मधुबालाच्या आयुष्यात घडलेली एक गोष्ट सांगतो.

तारीख होती २१ नोव्हेंबर १९४८. मधुबाला लोअर परेल येथे असलेल्या कारदार स्टूडिओ मध्ये ‘दुलारी’ सिनेमाचं शूटींग करत होती. त्या दिवसाच्या शूटींगचं पॅकअप झालं. पुढच्या दिवशी सिनेमाच्या युनीटकडून मधुबालाला सकाळी ९ चा काॅल टाईम देण्यात आला.

२२ नोव्हेंबरचा दिवस उजाडला. मधुबालाला सकाळी ६ वाजताच जाग आली. बाहेर काळाकुट्ट अंधार आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसत होता. मधुबालाला घरच्यांकडून कळालं की रात्रभर मुंबईत असाच जोरात पाऊस पडतोय. मधुबाला अस्वस्थ झाली. कारण इतक्या पावसात ९ ला शूटींगला पोहचायचं होतं.

शूटींगला काहीही करुन जाणं तिला गरजेचं होतं. ती वडिलांसोबत ७ ला घराबाहेर पडली.

त्यावेळेस मधुबालाकडे गाडी नव्हती. तिचं घर होतं बांद्र्याला. त्यामुळे इतक्या पावसात बांद्रावरुन लोअर परेल गाठणं हे एक मोठं आव्हानच.

मधुबाला वडिलांसोबत बसस्टाॅपवर उभी. समोरुन बस आली पण ती दादरपर्यंतच होती. बांद्राहून थोडं तरी पुढे जाता येईल, या उद्देशाने मधुबाला वडिलांसोबत बसने दादरला पोहोचली. मुसळधार पावसामुळे दादरवरुन पुढे जाण्यासाठी बस, टॅक्सी असं कोणतंही वाहन नव्हतं.

अधिक विचार न करता मुंबईच्या त्या मुसळधार पावसातुन वाट काढत मधुबाला वडिलांसोबत ४ किमी चालत लोअर परेलच्या कारदार स्टूडिओपर्यंत ९ वाजुन १० मिनीटांनी पोहोचली. मधुबालाला बघताच स्टूडिओचा वाॅचमन आश्चर्यचकीत झाला. कारण इतक्या पावसातुन कोणीतरी इथे येणं, हि फारच मोठी गोष्ट होती. वाॅचमन मधुबालाला म्हणाला,

“भरपुर पावसामुळे इथल्या भागाची वीज गेली आहे. त्यामुळे पुढचे तीन दिवस शुटींग रद्द करण्यात आलं आहे.”

हे ऐकताच मधुबालाची मनोमन काय अवस्था झाली असेल, याची आपण कल्पना करु शकत नाही.

मधुबाला वाॅचमनला म्हणाली, “ठीकय, फक्त आम्ही येऊन गेलो होतो, हे कळवा.” वडिलांसोबत पुन्हा त्याच पावसातुन घरी जाताना दिलेला शब्द आणि वेळ पाळल्याचं समाधान मधुबालाच्या मनात होतं.

कामाप्रती किती निष्ठा असावी, हे मधुबालाच्या या गोष्टीवरुन कळुन येतं. पावसापाण्याची पर्वा न करता केवळ दिलेला शब्द पाळण्यासाठी मधुबाला शूटींगला गेली होती.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.