महाभारताच्या ३० वर्षानंतर दुर्योधन शकुनीमामाच्या नावे अटक वॉरंट निघालं होतं.

२ ऑक्टोंबर १९८८ रोजी दुरदर्शनवर महाभारत नावाची मालिका सुरू झाली होती. चोप्रा बाप लेकांनी ही मालिका बनवली. ही मालिका तेव्हा एवढी फेमस झाली की सगळीकडं महाभारताचीच चर्चा असायची.

लोकांकडं तेव्हा टिव्ह्या नव्हत्या. गावातल्या एखाद्याच्याच घरात टिव्ही असायची. त्यावर ही मालिका बघायला गावातल्या लोकांची तुफान गर्दी व्हायची. या मालिकेला लोकांनी पार डोक्यावर घेतलं होतं कारण ही मालिका देवाची होती. त्यातले लोक हे देवच आहेत हे आपल्या बापड्या लोकांना वाटायचं.

या सिरियलमधला श्रीकृष्ण, भीम अर्जुन, दुर्योधन शकुनी मामा भीष्म हे देखील तितकेच प्रसिद्ध झाले. त्यांच्या खऱ्या नावापेक्षा त्यांच्या कॅरॅक्टरच्या नावाने अख्खा भारत यांना ओळखायचा. कृष्ण झालेल्या नितीश भारद्वाज यांची आरती ओवाळली जायची तर पुनीत इस्सार सारख्या दुर्योधनाला लग्नाच्या कार्यक्रमात जेवायला देखील दिल जायचं नाही.

एकूणच सबंध देश आपल्या भावभावनांनी या सिरियलशी जोडला गेलेला होता.

अशातच एक दिवस एक एपिसोड आला दौपदी वस्त्रहरण. पांडव हे कौरवांसोबत द्युताच्या खेळासाठी हस्तिनापूरला आलेले असतात आणि या खेळात शकुनीच्या मॅच फिक्सिंगमुळे धर्मराज युधिष्ठिर आपलं सगळं राज्य, संपत्ती हरतो. फक्त इतकंच नाही तर आपली पत्नी पांचाली द्रौपदीला देखील या जुगारात तो गमावून बसतो.

हा एपिसोड प्रचंड रंगला. दुःशासन जेव्हा मांडी ठोकून रजस्वला द्रौपदीचं वस्त्रहरण करत असतो तेव्हा हे दृश्य बघून आयाबायांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. भर दरबारात हा अत्याचार चाललेला असताना  भीष्म द्रोण यांच्या पासून ते द्रौपदीचे पती पांडव खाली मान घालून बसलेले असतात, राजा धृतराष्ट्र पुत्रप्रेमामुळे आंधळा होऊन त्याला अडवत नसतो. अखेर संकटमोचक कृष्ण येऊन द्रौपदीची लाज राखतो. तेव्हा मात्र टीव्ही समोर बसलेल्या अबाल वृद्धांना हायस वाटलं.

भारताच्या इतिहासातील सर्वाधिक लोकांनी पाहिलेल्या एपिसोडमध्ये या महाभारतातील द्रौपदी चीरहरण एपिसोडचा समावेश केला जातो.

निर्मात्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत आपल्याला मिळालेल्या या पावतीमुळे अभिमानाने छाती भरून आली होती. पुढच्या एपिसोडच धुमधडाक्यात शूटिंग सुरु होतं.

असच एक दिवस दुर्योधन झालेले पुनीत इस्सर एकदा कुठेतरी आपल्या कार मधून निघाले होते. अचानक त्यांच्या पाठीमागून एक पोलीस व्हॅन आली आणि त्यांनी पुनीत यांना अडवलं. पुनीत इस्सर यांना काहीच कळेना. आपण सिग्नल वगैरे तोडलोय कि काय या विचाराने त्यांनी गाडी थांबवली आणि नम्रपणे पोलिसांना विचारलं कि,

“what happened officer ? is everything alright?”

पोलिसांनी सांगितलं कि तुमच्या नावाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. 

पुनीत यांना धक्काच बसला. ते पोलीस स्टेशनला गेले तर पाहतात तर काय तिथे शकुनी मामा झालेले गुफी पेन्टल, कर्ण झालेले पंकज धिर वगैरे आधीच आलेले होते. पोलिसांनी त्यांना सांगितलं की

तुम्ही दाखवलेल्या वस्त्रहरणच्या एपिसोडमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि म्हणून बनारस येथे एकाने तुमच्या विरुद्ध केस केली आहे.

ते ऐकून सगळ्यांना घाम फुटला. पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ सुरु झाला. कोणी सांगितलं कि आमची चूक नाही, हि कथा आम्ही लिहिलेली नाही, हवं तर तुम्ही जाऊन वेद व्यास याना पकडा. त्यांनीच लिहिलेलं महाकाव्य आहे हे.

काही वेळात महाभारताचे निर्माते बीआर चोप्रा रवी चोप्रा देखील आले. त्यांनी सगळ्या कलाकारांना शांत केलं आणि सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांनी मोठा वकील दिला, आपलं आजवरचं सगळं वजन वापरलं आणि हि केस रफादफा करून टाकली.

दुर्योधन शकुनीमामा कर्ण वगैरेंनी थोडक्यात जेल मध्ये जाता जाता वाचलो असं म्हणत सुटकेचा निश्वास सोडला.

पुढे हि सिरीयल संपली. फक्त भारतात नाही तर जगात सगळ्यात जास्त टीआरपी मिळवलेला टीव्ही प्रोग्राम म्हणून त्यांना ओळखलं गेलं. सगळे कलाकार गाजले. त्यातले काही जण आपली नवी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले तर काहीजण आपल्या जुन्याच चौकटीमध्ये अडकून राहिले आणि कालांतराने फिल्मइंडस्ट्रीमधून दिसेनासे झाले.

कट टू २०१६. महाभारत सिरीयल येऊन जवळपास २८ वर्षे झाली होती.  लोकांच्या मनात तिच्या आठ्वणी धूसर झाल्या होत्या आणि पुन्हा अचानल महाभारतचे कलाकार ब्रेकिंग न्यूज मध्ये झळकू लागले. कारण असं कि तो २८ वर्षांपूर्वीचा केस पुन्हा उघडला होता.

पुनीत इस्सर व इतर कलाकारांच्या घरी पुन्हा अटक वॉरंट आलं होतं आणि बनारसच्या कोर्टात येऊन आपली भूमिका मांडावी असे आदेश आले होते. पुनीत इस्सर व इतरांना तर हार्ट अटॅक येण्याची वेळ आली कारण आता तर त्यांचे संकटमोचक बी.आर.चोप्रा देखील नव्हते. त्यांचा मुलगा रवी चोप्रा, हि सिरीयल लिहिणारे पंडित रवींद्र शर्मा, राही मासूम रझा या साऱ्यांचं आता निधन झालेलं होतं.

एवढ्या वर्षात विसरून गेलेली हि केस आपल्याला जेलची हवा खायला लावते कि काय असं म्हणत हे सगळी तगडी अभिनेते मंडळी हादरून गेली होती.

सगळे एकमेकांना फोन करून आता काय करायचं विचारत होते. पुनीत इस्सर तर म्हणत होते कि मला जेल मध्येच टाका, त्या निमित्ताने पब्लिसिटी तर मिळेल. शेवटी सगळ्यांनी मिळून एक वकील शोधून काढला आणि त्याला घेऊन बनारसला आले.

महाभारतातले दुर्योधन, कर्ण आणि शकुनी मामा तिथल्या कोर्टात पोहचले. त्यांना सगळ्यात जास्त उत्सुकता होती कि आपल्यावर केस करणारा माणूस आहे तरी कोण? शोधता शोधता त्यांना ती महान व्यक्ती भेटली. तो माणूस हसत हसत त्यांना सामोरा आला आणि म्हणाला,

“आपके दर्शन कि अभिलाषा थी. एक फोटो मिल जाए तो बस्स बहुत कृपा होगी.  “

दुर्योधन, कर्ण आणि शकुनी याना काय करू आणि काय नाही असं झालं. पुनीत इस्सर सारखा बच्चनला एका बुक्कीत गार करणारा माणूस तर त्याला खाऊ की गिळू असं पाहात होता. फक्त एका फोटो साठी गड्याने ३० वर्षांपूर्वीची केस बाहेर काढली आणि या सगळ्या कलाकारांना अटक वारंट काढून बनारस पर्यंत बोलावून घेतलं. चक्क त्याला नमस्कार करत हे कलाकार मुंबईला परत आले.

महाभारत सिरीयल वरील लोकांचं प्रेम दाखवणारा असा हा किस्सा.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.