महाकालेश्वर कॉरिडोर; कमलनाथ सरकारने मंजुरी दिली तर शिवराज सिंग सरकारने काम पूर्ण केलं

काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या धर्तीवर बांधलेल्या उज्जैनच्या महाकाल कॉरिडोरचं आणि महाकाल लोकाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. ८५६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा ९०० मीटरचा कॉरिडोर भारतातील आजवरचा सगळ्यात मोठा कॉरिडोर आहे. 

काशी विश्वनाथ कॉरीडोरपेक्षा ९ पट मोठ्या असलेल्या या कॉरिडॉरमध्ये देवी देवतांच्या २०० मुर्त्या, ५० म्युरल्स आणि १०८ स्तंभ असलेल्या या कॉरिडॉरमध्ये शिव आणि शक्ती या दोघांना दाखवण्यात आलंय. यात शिव आणि सतीच्या विवाह सोहळ्याचं म्युरल सगळ्यात लक्षवेधी ठरत आहे. 

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग असलेल्या महाकालेश्वर मंदिराच्या कॉरीडोरच्या निर्मितीकडे सुद्धा काशी विश्वनाथ कोरोडोरप्रमाणेच लक्ष लागलेले आहे. 

कारण काशी विश्वनाथ कोरोडोरच्या धर्तीवर या कॉरीडोरच्या निर्मितीचा प्रस्ताव काँग्रेसच्या कमलनाथ यांच्या सरकारने मांडला होता. तर प्रकल्प पूर्ण करण्याचं काम भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांच्या काळात होतेय. 

पण या कामाची सुरुवात आणि समाप्ती जरी दोन सरकार करत असल्या तरी याचा इतिहास काशी विश्वनाथ मंदिरासारखाच आहे.

महाकालेश्वराचं हे मंदिर नेमकं कोणी आणि केव्हा बांधलं याचा काही स्पष्ट उल्लेख आढळत नाही. मात्र ७ व्या शतकातील ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख सापडतो. ७ व्या शतकातील प्रसिद्ध लेखक बाणभट्ट यांच्या कादंबिनीत या मंदिराचं सविस्तर वर्णन करण्यात आलंय. तर ५ व्या शतकातील महान संस्कृत कवी कालीदासांच्या मेघदूतमध्ये सुद्धा याचा उल्लेख आढळतो.

या मंदिराची निर्मिती उज्जैनचे राजे विक्रमादित्य यांनी केली होती असं सांगितलं जातं. 

राजा विक्रमादित्याच्या नंतर राजा परमार भोज यांनी त्यांच्या राज्यातील अनेक मंदिरांची निर्मिती केली होती. त्यात राज्याची राजधानी  असलेल्या अवंतिका म्हणजेच उज्जैन शहरात महाकालेश्वर मंदिराची निर्मिती केली असं सांगितलं जातं. त्यांनी मूळ मंदिराचा जीर्णोद्धार करून मंदीराचा कळस आणखी उंच केला होता.

मात्र मुस्लिम शासकांच्या काळात या मंदिरावर आक्रमण करून मंदिराला अनेकदा तोडण्यात आलं होतं.  सर्वप्रथम ११ व्य शतकात मोहम्मद गजनीने या मंदिराची तोडफोड केली होती. तर इसवी सन १२३४ मध्ये दिल्ली सल्तानीचा बादशाह इल्तुमिशने मंदिरावर हल्ला करून मंदिराची तोडफोड केली. 

ही बातमी जेव्हा धारचे राजे देपालदेव यांना कळली तेव्हा त्यांनी मंदिराला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ते मंदिरापर्यंत पोहोचण्याच्या आधीच मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. मात्र नंतर देपालदेव यांनी मंदिराचं पुन्हा बांधकाम केलं. मात्र काळाच्या ओघात पुन्हा एकदा हे मंदिर पडलं. 

जेव्हा दिल्लीचा सुलतान इल्तुमिश याने मंदिर पाडलं तेव्हा पुजाऱ्यांनी शिवलिंग वाचवण्यासाठी ते एका सरोवरात लपवून ठेवलं होतं. त्यामुळे मंदिराच्या भग्नावशेषांचीच पूजा केली जात होती. दिल्लीच्या सल्तनतीनंतर औरंगजेबाने या मंदिराच्या अवशेषांचा वापर करून त्याजागी एक मस्जिद उभारली होती. 

पण १७२८ मध्ये मराठ्यांनी मालवा प्रांतावर हल्ला केला आणि उज्जैनसह हा सगळा  प्रांत जिंकून घेतला.

जेव्हा मराठ्यांनी मालवा जिंकला तेव्हा हा भाग सरदार राणोजी शिंदे यांच्याकडे होता. राणोजी शिंदे यांनी उज्जैन शहरात स्वतःची राजधानी वसवली आणि महाकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची सुरुवात केली. मात्र मंदिराचं काम सुरु असतांना त्यांना बंगालच्या स्वारीवर जावं लागलं. तेव्हा राणोजींनी त्यांच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे आदेश दिले.

राणोजी शिंदे बंगालच्या स्वारीवर गेले असतांना त्यांच्या अधिकाऱ्यांनी औरंगजेबाने बांधलेली मस्जिद पडली आणि त्याजागी पुन्हा महाकालेश्वर मंदिराची निर्मिती केली. 

त्यांनी महाकालेश्वराच्या शिवलिंगाला सरोवरातून बाहेर काढलं. जेव्हा राणोजी शिंदे स्वारीवरून परतले तेव्हा त्यांनी महाकालेश्वराची मंदिरात स्थापन केली आणि पुन्हा एकदा मंदिर उभं राहिली. 

मंदिर जेव्हा पाडण्यात आलं होतं तेव्हा क्षिप्रा नदीच्या तीरावर दार १२ वर्षांनी भरणारा सिंहस्थ कुंभमेळा सुद्धा बंद झाला होता. मात्र राणोजी शिंदे यांनी मंदिराच्या निर्मितीबरोबरच उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या तीरावर सिंहस्थ कुंभमेळ्याला सुद्धा सुरुवात केली. तेव्हापासून अजगायत हेच मंदिर अस्तित्वात आहे.

पण आता या महाकाल कॉरीडोरच्या निर्मितीनंतर मंदिराच्या परिसरात मोठे बदल करण्यात आलेले आहेत.

या प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात एकूण १५२ इमारतींचे अधिग्रहण करण्यात आलं होतं. त्यामुळे पूर्वी २.८ हेक्टर जमिनीवर असलेला मंदिराचा परिसर आता ४७ हेक्टर इतका विस्तारला आहे. विस्तीर्ण झालेलय मंदिर परिसरात मुर्त्या आणि देखावे आहेत. प्रत्येक पुतळ्याच्या बाजूला एक क्यूआर कोड देण्यात यात आहे. या कोडला स्कॅन केल्यानंतर मूर्तीची संपूर्ण माहिती मिळणार आहे.  

सोबत भाविकांसाठी वेगवेगळ्या सुविधा सुद्धा देण्यात येणार आहेत. यात महाकाल प्लाझा, मिडवे झोन महाकाल थीम पार्क, नूतन स्कुल कॉम्प्लेक्स, गणेश स्कुल कॉम्प्लेक्स आणि घाटाचं बांधकाम करण्यात आलंय.   

प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात महाराजवाडा, महाकाल गेट आणि जुना मार्ग, रुद्रसागर, हरी फाटक पूल, रामघाट, रुद्रसागरमधील म्युझिकल फाउंटन, बेगम बाग रस्ता, या भागांचा विकास केला जाणार आहे. महाराजवाड्याचा पुनर्विकास करून तो वाद मंदिराच्या परिसराशी जोडला जाणार आहे. तसेच वाड्यात  हेरिटेज धर्मशाळा आणि कुंभ संग्रहालय, नक्षत्र वाटिका, फूड कोर्ट बनवण्यात येणार आहे. 

रुद्रसागर सरोवराची स्वच्छता करून त्याचा विकास केला जाईल तसेच क्षिप्रा घाटावर लेजर शोची व्यवस्था केली जाणार आहे. 

उज्जैनमधील या कॉरिडॉरची निर्मिती केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मंदिर प्रशासनाने केलीय.

काशी विश्वनाथ कॉरीडोरच्या धर्तीवर महाकाल कॉरिडोरची निर्मिती निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसच्या कमलनाथ यांच्या सरकारने २०१९ मध्ये परवानगी दिली होती. याचा आरखडा २०१७ मध्येच  तयार करण्यात आला होता.

मात्र काँग्रेसची सरकार कोसळून भाजपची सरकार आली आणि शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री झाले. कमलनाथ सरकारने या प्रोजेक्टसाठी ३०० कोटी रुपये मंजूर केले होते मात्र शिवराज सिंग चौहान यांनी हीच रक्कम ७५० कोटी रुपये केली. 

मध्य प्रदेश सरकारने सुरु केलेल्या या कॉरिडोर प्रकल्पात नंतर केंद्र सरकारने सुद्धा सहभाग घेतला. यात राज्य सरकारकडून ४२१ कोटी रुपये, केंद्र सरकारकडून २७१ कोटी रुपये, मंदिर समिती २१ कोटी रुपये तर फ्रांस सरकारकडून स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ८० कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

मात्र आता या कॉरीडोरच्या उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असतांना भाजपबरोबरच काँग्रेस पक्षाकडून या प्रकल्पाचं श्रेय घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. यासाठी काँग्रेसचे नेते आणि मध्य प्रदेशातील विरोधी पक्ष नेते गोविंद सिंग यांनी यावर मत मांडलाय. मात्र भाजपने त्यांचा दावा खोडून काढला आहे.

कमलनाथ यांनी मोदींच्या काशी विश्वनाथ कॉरिडोरप्रमाणे महाकालेश्वर कॉरीडोरची निर्मिती करून मध्य प्रदेशात हिंदू मतांना ओढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या जागी सत्तेवर आलेल्या शिवराज सिंग चौहान यांनी हा प्रकल्प पूर्ण केला. त्यामुळे याचा राजकीय फायदा भाजपला मिळेल असे राजकीय विश्लेषक सांगतात.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.