खरच काँग्रेस महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येवू शकतं का…?

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदांची नाव बघितल्यास आज पर्यंतच्या यादीत सगळ्यात आक्रमक प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांचं नाव हमखास घ्यावं लागतं. मागच्या काही दिवसात त्यांनी घेतलेल्या भूमिका किंवा केलेली वक्तव्य हेचं सगळं सिद्ध करतात. आता नुकतीच त्यांनी भूमिका घेतली आहे ती स्वबळाची.

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना पटोले म्हणाले होते, 

लोकसभा आणि विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून २०२४ मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल यासाठी काम करा. मागील वेळेस राज्यात काँग्रेस चौथ्या क्रमांकावर होती. २०२४ च्या निवडणुकीनंतर आपला पक्ष पहिल्या क्रमांकावर असेल

यामुळेच सगळ्या राज्यात सध्या चर्चा सुरु झाली आहे ती काँग्रेस पुन्हा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची. आज संजय राऊत यांनी देखील पुण्यात बोलताना “काँग्रेसला त्यासाठी शुभेच्छा” असल्याचं म्हंटलं आहे.

पण या सगळ्यामुळे एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे खरंच महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा स्वबळावर सत्तेत येऊ शकते का?

इथं ‘पुन्हा’ हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कारण एक काळ होता जेव्हा राज्यावर काँग्रेसची एकहाती पकड होती. आकडेवारीत सांगायचं झालं तर पहिल्या तीन निवडणुकांमध्ये म्हणजे १९५२ साली २६९ जागा, १९५७ साली २३४, १९६२ साली २१५ अशा जागा मिळाल्या होत्या.

यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बॅरिस्टर अंतुले, शरद पवार या नेत्यांनी काँग्रेस तळागाळात पर्यंत रुजवली होती. 

मधल्या काळात म्हणजे १९७७ मध्ये शरद पवार यांनी बंड केल्यानं काँग्रेस विभागली गेली, त्यामुळे सत्तेततून बाहेर गेली, मात्र त्यानंतर १९८० साली झालेल्या निवडणुकीत तेवढ्याच ताकदीने काँग्रेसनं कमबॅक केलं. २८६ पैकी तब्बल १८६ जागा जिंकत काँग्रेस पुन्हा उभी राहिली होती. त्यानंतर जवळपास १९९४ पर्यंत काँग्रेस महाराष्ट्रात पुन्हा स्वबळावर सत्तेत होती.

नंतरच्या काळात १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेस दोन गटात विभागली गेली, पुढे राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत आघाडी स्थापन केली. मात्र हिच घटना राज्यात काँग्रेसची ताकद विभागण्यास प्रामुख्यानं कमी होण्यास महत्वाची ठरली. 

मात्र या काळात देखील विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, रणजित देशमुख, अशोक चव्हाण, पतंगराव कदम अशा सगळ्या दिग्गज नेत्यांनी काँग्रेस राज्यात मोठ्या प्रमाणात वाढवली. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच सातत्यानं १५ वर्ष काँग्रेस मुख्यमंत्री पद स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी झाली.

पण २०१४ ला देशासह राज्यात काँग्रेसचे देखील काँग्रेसची पीछेहाट झाली. याच वर्षी काँग्रेसला राज्यात पहिला दणका बसला तो लोकसभा निवडणुकीला, आणि दुसरा बसला तो विधानसभेच्या निवडणुकीला. 

२०१४ ची लोकसभा निवडणूक :

२०१४ ची लोकसभा हि खऱ्या अर्थानं ऐतिहासिक अशी ठरली होती. राजीव गांधी यांच्यानंतर प्रथमच एखाद्या पक्षाला सत्तेत येण्यासाठी पूर्ण बहुमत मिळालं होतं. याच लाटेत महाराष्ट्रात देखील प्रथमच काँग्रेसचा दारुण पराभव झाला. भल्या भल्या नेत्यांचे बालेकिल्ले ढासळले.

यात अगदी सुशील कुमार शिंदे, मिलींद देवरा, प्रिया दत्त, गुरुदास कामत, संजय निरुपम असे सगळे दिग्गज पराभूत झाले. केवळ अशोक चव्हाण, आणि राजीव सातव या नेत्यांनी आपले किल्ले वाचवले होते.

२०१४ ची विधानसभा निवडणूक :

लोकसभा निवडणुकांच्या अवघ्या काही महिन्यात महाराष्ट्रात विधानसभांच्या निवडणूक पार पडल्या होत्या. यात देखील मोदी लाट जाणवली होती. दुसरा धक्का बसला काँग्रेसला तो याच निवडणुकीत. १९९९ ला निम्मी ताकद घटल्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत आणखी निम्मी ताकद घटली.

म्हणजे निवडणुकीपूर्वी विधानसभेत ८२ जागांवर असलेला पक्ष निवडणुकीनंतर ४२ जागांवर आला. त्यामुळेच हातची सत्ता देखील काँग्रेसला गमवावी लागली. मतांचा टक्का देखील घसरला. २० टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आला. त्या तुलनेत भाजपचा मतांचा टक्का जवळपास १३ टक्क्यांनी वाढला होता, तर जवळपास ७६ जागा वाढल्या होत्या.

यानंतरच्या पुढच्या ५ वर्षांमध्ये काँग्रेस विरोधी पक्षात राहिला. आधी राधाकृष्ण विखे पाटील आणि नंतर विजय वडेट्टीवार यांच्या हातात हे विरोधी पक्ष नेते पद होतं. 

या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील काँग्रेस पीछेहाट आणि भाजपची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणूका येण्यापूर्वी अवघ्या २८ पैकी ६ महानगरपालिकांमध्ये काँग्रेस सत्तेत होती.

२०१९ नंतर आता काँग्रेसची ताकद किती आहे?

सर्वसामान्यपणे आजवरचा काँग्रेसचा इतिहास बघितल्यास पीछेहाट झाली तरी पुन्हा त्याच ताकदीने कमबॅक करण्यासाठी ओळखली जातं होती. यात मग अगदी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांचा इतिहास आपण उदाहरण म्हणून घेऊ शकतो.

मात्र २०१९ ची निवडणूक यासाठी अपवाद ठरली होती. २०१४ ते २०१९ या काळात काँग्रेसची ताकद वाढलेली बघायला मिळाली नाही. उलट कमीचं झाली.

लोकसभेची आकडेवारी सांगायची झाली तर २०१४ ला २ जागांवरून काँग्रेस अवघ्या १ जागेवर आली. यात देखील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसी, पुन्हा शिवसेनेमध्ये गेलेले आणि पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले बाळू धानोरकर हे निवडून आले होते. यंदा अशोक चव्हाण यांना देखील पराभव पाहायला लागला. 

जर विधानसभेचं सांगायचं झालं तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सभागृहात काँग्रेसची ताकद २ आमदारांनी वाढली म्हणजे ४२ वरून ४४ झाली. मात्र प्रत्यक्ष मतदानामध्ये काँग्रेसची ताकद कमी झाली होती. कारण २०१४ ला १७ टक्के असलेले मतदान २०१५ ला १५ टक्के झाले होते.

महाविकास आघाडी सरकार 

निवडणूक पार पडल्यानंतर अगदी चमत्कारकरित्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. या सरकारमध्ये काँग्रेस देखील सहभागी झाला. मात्र प्रत्यक्षात मुख्यमंत्री पद आणि इतर महत्वाची मानली जाणारी मंत्रिपद हि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली.

काँग्रेसमध्ये १२ जणांना मंत्रिपद, विधानसभा अध्यक्ष आणि काही महामंडळ वाट्याला आली. मात्र यातील बहुतांश महामंडळांवर अद्याप नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. सोबतच नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याच्या ६ महिन्यानंतरही विधानसभेचं अध्यक्षपद रिक्त आहे.

आता या सरकारसाठी काँग्रेस हा पक्ष किती महत्वाचा आहे यावर याआधीचं ‘बोल भिडू’ने २६ मे रोजी सविस्तर लेख लिहिला आहे. खालील लिंकवर क्लिक करून आपण तो वाचू शकता. 

आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या फळीतील नेत्यांची ताकद किती आहे?

वर सांगितल्या प्रमाणे अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अलीकडच्या काळातील विलासराव देशमुखांपर्यंत काँग्रेसमध्ये नेत्यांची एक मोठी फळी होती. ही फळी मागच्या ६० वर्षांच्या काळात काँग्रेससाठी अगदी आश्वासक वाटणारी होती. हे नेते नक्की काँग्रेसला नवी उमेद देणारे होते. यात अगदी जादुई स्पर्श म्हंटलं तरी अतिशोयक्ती ठरणार नाही.

मात्र अलीकडच्या काळात अशी नेते मंडळी फार कमी आणि ना के बरारबर म्हंटलं तरी चालेल. अलीकडच्या काळातील पहिली फळी बघितली तर यात प्रामुख्यानं नाव घ्यावी लागतात ते नाना पाटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत, पृथ्वीराज चव्हाण अशा नेत्यांची. 

पण नाना पटोले यांच्या बाबतीत सांगायचं तर ते सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या त्यांच्याकडे आक्रमक नेता म्हणून बघितलं जातं आहे. ते वेळोवेळी भूमिका घेऊन पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांना बळ देताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे २०१९ मध्ये ते स्वतः नागपूरमधून पराभूत झाले आहेत.

बाळासाहेब थोरात हे सध्या महसूलमंत्री पदावर आहेत. काँग्रेसचा एकनिष्ठ, विश्वासू आणि प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सोबतच आताच्या विधानसभेतील सर्वात जेष्ठ आमदार आहेत. मात्र इतके वर्ष राजकारण करून देखील अहमदनगर जिल्हा सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात त्यांचं वर्चस्व जाणवतं नाही. 

अशोक चव्हाण यांच्या बाबतीत गोष्ट सांगायची तर ते एकेकाळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते. मात्र सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये ते मुख्यमंत्री पदाच्या तुलनेत अत्यंत दुय्यम असं सार्वजनिक बांधकाम मंत्रालय सांभाळत आहेत. मुख्यमंत्री पदाचा डिमेरीट केल्यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीका देखील होत असते. सोबतच २०१९ मध्ये ते लोकसभेला देखील पराभूत झाले आहेत.

विजय वडेट्टीवार हे देखील मागच्या काळात काँग्रेससाठी राज्यातील नंबर १ चा चेहरा होते. कारण सर्वात महत्वाचं असणार विधानसभेतील विरोधीपक्ष नेते पद त्यांच्याकडे होते. मात्र त्यांना देखील सध्या मदत आणि पुनर्वसन मंत्रायलवर समाधान मानव लागलं आहे. तेव्हापासून ते स्वतः अधूनमधून मंत्रालयाबद्दल नाराजी व्यक्त करत असतात. 

नितीन राऊत हे १९९९ सालापासून नागपूर जिल्ह्यांमधून निवडून येतात. काँग्रेसमधील अत्यंत हुशार चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. सध्या ते राज्यात ऊर्जामंत्री म्हणून कार्यरत आहेत. मात्र मागच्या २० वर्षांपासून सातत्यानं निवडून येऊन आणि मंत्रिपदावर कार्यरत राहून देखील त्यांना नागपूरमध्ये देखील पक्षाची वाढ करता आलेली नाही. तिथं भाजपचं वर्चस्व आपल्याला दिसून येतं.

पृथ्वीराज चव्हाण म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. मात्र त्यांच्याकडे सध्या काँग्रेसमध्ये मंत्री म्हणून कोणतीही जबाबदारी नाही. किंबहुना त्यांनी ती घेतलेली नाही असं देखील आपण म्हणू शकतो. त्यामुळेच ते पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये देखील असतात कि नाही असं विचारलं जातं. 

भाई जगताप या नेत्याकडे सध्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद आहे. आगामी मुंबई पालिका डोळ्यासमोर ठेऊन सध्या ते पक्षबांधणी करत आहेत, सोबतच त्यांनी ही निवडणूक स्वबळावर लढवणार असं देखील जाहीर केलं आहे.

आता महाराष्ट्रात काँग्रेस पुन्हा स्वबळावर सत्तेत येणार का नाही याच उत्तर द्यायचं झालं तर सध्या काँग्रेसकडे असलेली वरील नेतेमंडळींची नाव बघितली तर त्यात संपूर्ण महाराष्ट्रभर ताकद असलेला असा एकही नेता दिसून येत नाही आणि हे सूर्यप्रकाशाएवढं स्वच्छ आहे.

त्यामुळेच आता जर काँग्रेसला पुन्हा स्वबळावर कमबॅक करायचं असल्यास पक्षासोबतच या नेत्यांना आपली ताकद देखील वाढावी लागणार आहे हे कोणाही नाकारणार नाही.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.