१५ व्या वर्षी अतिरेक्यांच्या गोळ्या खाल्या, १७ व्या वर्षी नोबेल जिंकलं. ती सध्या काय करते?

आजच्याच दिवशी ६ वर्षांपूर्वी मलाला युसुफझाई हे नावं सगळ्या जगात एका वेळी चर्चेला आलं होत. ज्या वयात तुम्ही आम्ही शाळेतल्या भाषण स्पर्धेत पाहिलं, दुसरं आलोच्या अगरबत्त्या घेऊन मिरवत असतो त्या वयात म्हणजे १७ व्या वर्षी या मुलीला जगातील सर्वोच्च आणि प्रतिष्ठेचा ‘नोबेल पुरस्कार’ मिळाला होता.

असं म्हणतात की, कमी वयात एखाद मोठं यश मिळालं असेल तर लगेच डोक्यात जात. पण मलाला याला अपवाद ठरती. ती थांबली नाही, यश आणि सन्मान तिच्या डोक्यात गेला नाही.

तालिबान्यांनी १५ व्या वर्षी डोक्यात गोळ्या घातल्यानंतर देखील ती पुन्हा उठून उभी राहिली, १७ व्या वर्षी शिक्षणाच्या  जगातील मुलींचा उद्धार करून तिने नोबेल मिळवला आणि जगभरातील मानवाधिकार चळवळीचं प्रतीक बनली. आता ती ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवीधर झालीय… तिचा हा प्रवास सगळ्यांना थक्क करायला लावणारा आहे.

मलालाची गोष्ट सुरु होते,

पाकिस्तानातील खैबर पख्‍तूनख्‍वा प्रांतातील स्वात घाटीतून . हा भाग म्हणजे तालिबान्यांचा हक्काचा अड्डा. मलाला याच भागात राहायची. २००७ च्या दरम्यान तालिबान्यांनी इथे उच्छाद मांडला होता. शिकायचं लांबची गोष्ट नागरिकांना रस्त्यावर फिरणे अवघड व्हायचे.

तालिबान्यांनी तिथले डीवीडी, डान्स आणि ब्युटी पार्लर देखील बंद करून टाकले. वर्षाअखेरीस ४०० शाळा बंद पडल्या. यानंतर मलालाने हे सगळे अनुभव जगापुढे आणण्याचे ठरवले. वडिलांनी तिला पेशावरला आणले. जिथे तिने राष्ट्रीय माध्यमांसमोर जाहीर भाषण केले.

हाउ डेयर द तालिबान टेक अवे माय बेसिक राइट टू एजुकेशन? 

यानंतर २००९ मध्येच तिने बीबीसी उर्दू साठी ‘गुल मकई’ या नावाने ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली. तालिबान राजवटीमध्ये सामान्य माणसाचं जीणं कसं असतं याच वर्णन तिने जगासमोर मांडले.

मुलींचं आणि पर्यायानं महिलांचं शिक्षण तसंच पाकिस्तानमधली लष्करी राजवटीची दडपशाही थांबावी यासाठी मलालानं लहान वयातच काम सुरू केलं. पण डिसेंबर २००९ मध्ये वडील जियाउद्दीन यांनी मलालाची ओळख सार्वजनिक केली. 

यानंतर देखील न घाबरता तालिबान्यांच्या सगळ्या आदेशांकडे दुर्लक्ष करून मुली शाळेत गेल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करत राहिली. या कारणामुळे तालिबान्यांनी मलाला ला लक्ष केले.  

ऑक्टोबर २०१२ मध्ये एक दिवस मलाला शाळेतून घरी परतत असताना ती प्रवास करत असलेल्या स्कूलबसवर हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांतील एकाने विचारलॆ,

‘मलाला कौन है?’

बसमध्ये सगळी शांतात पसरली. त्या शांततेचं तालिबान्यांनी मलाला ला ओळखले आणि तिच्यावर गोळ्या चालवल्या, त्यातील एक गोळी तिच्या डोक्यात लागली. ती त्यावेळी केवळ १५ वर्षांची होती.

मलालावरील हल्ल्यानं आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष वेधलं. पाश्चिमात्य विचारसरणीच्या आणि पश्तून प्रांतात त्याच विचारांचा प्रसार केल्याबद्दल मलालावर हल्ला केल्याचं पाकिस्तानमधील तालिबाननं स्पष्ट केलं होतं.

गंभीररित्या जखमी झालेल्या मलाला उपचारासाठी आधी पाकिस्तान आणि नंतर इंग्लंडला नेण्यात आले. तिथे तिच्या मेंदूच्या कवटीचा काही भाग काढून टाकण्यात आला.

उपचारातून बारी झाल्यानंतर ती पुन्हा दुप्पट आत्मविश्वासाने उभी राहिली. वडील झियाउद्दीन यांच्या पाठिंब्यानं तिने मुलींच्या शिक्षणासाठी ‘मलाला फंड’ची स्थापना केली. सुरक्षितेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये न परतता ब्रिटनमध्ये राहूनच ती आणि तिच्या सारख्या हजारो-लाखो मुलींना शिकता यावा यासाठी तिनं मदतीची सुरुवात केली.

१२ जुलै २०१३ मध्ये यूएन अर्थात युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या व्यासपीठावरुन मलालानं जगाला उद्देशून भाषण दिलं. तिच्या प्रत्येक वाक्यात शिक्षणाचा हक्क किती महत्वाचा आहे आणि तो मिळालाच पाहिजे यावर जोर होता.

भाषण संपल्यानंतर तिला युएनमधल्या सर्व रथी-महारथींनी उभं राहून अभिवादन केलं. त्याच दिवशी तिच्या नावावरुनच आणि वाढदिवसानिमित्त १२ जुलैला ‘मलाला दिन’ असंही घोषीत करण्यात आलं.

२०१४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी तिला शांततेसाठीचा नोबेल जाहीर झाला.

सगळ्यात कमी वयात पुरस्कार पटकावणारी ती विजेती ठरली. मलाला आणि भारतात लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणारे कैलाश सत्यार्थी यांना एकत्रितपणे त्यावर्षीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

पुढचं शिक्षण सुरू असतानाच मलालानं आपल्या उपक्रमाचं काम सुरूच ठेवलं. २०१५ पासून तिने जॉर्डनमधील सिरीया निर्वासितांसाठी काम सुरु केले आहे. मलाला फंडच्या माध्यमातुन इथे असलेल्या मुलींच्या शिक्षणासाठी मलाला सुविधा उपलब्ध करुन देत आहे. सोबतच म्यानमार आणि रोहिंग्या निर्वासित इथेही तिने मलाला फंडच्या माध्यमातुन निधी उपलब्ध करुन देत मुलींच्या शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

२०१७ मध्ये तिने जगप्रसिद्ध आणि प्रतिष्ठीत ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळवला. आणि यावर्षी जूनमध्ये मलाला ‘ऑक्सफर्ड विद्यापीठा’तुन’ तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयात पदवीधर झाली.

कोरोना काळात देखील मलाला ने तिचे काम थांबले नव्हते. कोरोनाचा शिक्षणावर कसा आणि काय परिणाम होणार आहे या विषयीचा अभ्यास करुन संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरुन जगासमोर आणले.

मलाला ने सांगितले,
महामारी संपल्यानंतर देखील जगभरातील जवळपास २ कोटी मुली शाळेत जावू शकणार नाहीत. जागतिक पातळीवर त्यांच्यासाठी जमवण्यात येणाऱ्या निधीसाठी देखील अडचणी निर्माण होणार आहेत. त्याची विविध कारण आहेत. पण संयुक्त राष्ट्राने पाच वर्षापुर्वी लाखो मुलींच्या सोनेरी भविष्याची केलेली कल्पना सत्यात उतरण्यासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहेत.

नोबेलचा सर्वोच्च सन्मान मलालाला काम करण्यासाठी दुप्पट बळ देवून गेला. जगभरात तिने आपल्या कामाची व्याप्ती पसरवली. सिरीया, म्यानमार सारख्या भागात आपलं नाणं कामाच्या रुपातुन खणखणीत वाजवून दाखवलं आहे.

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Rushikesh says

    🙌🙌

Leave A Reply

Your email address will not be published.