मंदीर उघडण्यावरून जो वाद सुरूय त्यामध्ये कोणाचा “इगो” आडवा येतोय का?

राज्यात मागील दोन महिन्यांपासून मंदिर उघडण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्यात वाद सुरु आहेत. नुकताच या वादाचा आणखी एक अंक पहायला मिळाला तो म्हणजे राज्यपालांच्या पत्रावरून आणि मुख्यमंत्र्यानी त्याच आक्रमकतेमध्ये पाठविलेल्या उत्तरामधून.

पण खरच राज्यात सध्या मंदिर उघडण्याची गरज आहे का? इतर राज्यांमध्ये मंदिर उघडली आहेत का? सत्ताधारी आणि विरोधकांचे म्हणणे काय आहे? मंदिरातील पुजाऱ्यांचे काम म्हणणे आहे?

याचा बोल भिडूने घेतलेला सविस्तर आढावा.

इतर प्रमुख राज्यांमध्ये मंदिर उघडली आहेत का ?

भाजपाची सरकार असलेल्या गुजरात आणि उत्तरप्रदेश या राज्यात ८ जूनपासून तर मध्यप्रदेशमध्ये १५ जून, बिहारमध्ये ८ सप्टेंबर, हिमाचल प्रदेशमध्ये १० सप्टेंबरपासून मंदिरची दार भक्तांसाठी उघडली आहेत. गोव्यामध्ये देखील ८ सप्टेंबरपासून पुरातन चर्च प्रार्थनेसाठी खुली आहेत. गुजरातमध्ये तर आगमी नवरात्रोत्सवासाठीही मर्यादित संख्येने परवानगी दिली आहे. कर्नाटक मधील सुप्रसिद्ध इस्कॉन मंदिर ५ ऑक्टोबरपासून सुरु झालं आहे.

बिगर भाजप राज्यांमधील दिल्लीमध्ये ८ जून पासून मर्यादित संख्येवर मंदिर भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. तर सुप्रसिद्ध अक्षरधाम मंदिर देखील १३ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आले आहे.

तेलंगणा ८ जून आणि तामिळनाडू राज्यामध्ये १ सप्टेंबर मंदिर खुली केली आहेत. केरळमधील बहुतांश चर्च ८ जूनपासूनच सुरु झाली असून श्री पद्मनाभ स्वामी मंदिर येत्या १५ ऑक्टोबर आणि शबरीमाला मंदिर १६ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत.

तसेच अखंड भारताचे श्रद्धास्थान असलेले आंध्रामधील तिरुमला तिरुपती हे मंदिर देखील ११ जून पासूनच सुरु झाले आहेत.

काँग्रेसशासित राज्यातही धार्मिक स्थळ सुरु झाली आहेत. पंजाबमधील गुरुद्वारा ८ जून पासून सुरु करण्यात आली आहेत. तर राजस्थानमधील ७ सप्टेंबर आणि झारखंडमधील मंदिर ८ सप्टेंबरला सुरु केली आहेत.

ओरिसा आणि महाराष्ट्र या राज्यात अद्यापही मंदिर बंद आहेत.

विरोधक आणि सत्ताधारी काय म्हणत आहेत ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून मंदिर उघडण्याची मागणी करत आहेत. ते म्हणाले,

देशात अन्यत्र धार्मिक स्थळे खुली करण्यात आली तेव्हा त्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढलेला नाही. मग महाराष्ट्रातच धार्मिक स्थळे खुली का केली जात नाहीत. एकीकडे दारू दुकाने उघडली जातात, तर दुसरीकडे धार्मिक स्थळे उघडू दिली जात नाहीत याचा अर्थ समजत नाही.

तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील मंदिर उघडण्यासाठी सरकारला इशारा दिला आहे.

संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा न पाहता महाआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे आणि अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यास त्वरित परवानगी द्यावी. या मंडळींवर मंदिरांत जबरदस्तीने जाण्याची वेळ आणू नका.

घंटानाद आंदोलनाला भाजपचा पाठिंबा :

राज्यातील धार्मिकस्थळे आणि मंदिरे सुरू करण्यासाठी राज्यभरातील धार्मिक संघटनांनी २९ ऑगस्ट रोजी राज्यभर घंटनाद आंदोलन केले होते. या आंदोलनात भाजपही सहभागी झाला होता. या दरम्यान भाजपने राज्यात काही ठिकाणी लाक्षणिक उपोषण देखील केले होते.

तिकडे वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयएम या पक्षांनीही मंदिर आणि धार्मिक स्थळ सुरु करण्याची मागणी केली आहे.

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र या सगळ्यांच्या मागणीला विरोध दर्शवला होता. ११ ऑक्टोंबरला राज्यातील जनतेला संबोधित करताना म्हणाले होते,

‘जबाबदारी तुमच्यावर नाही आमच्यावर आहे, त्यापेक्षाही जनतेवर आमचे प्रेम आहे. तंगडयात तंगड घालून मंदिर बंद ठेवायची आमची इच्छा नाही. पण उघडलेल्या दरातून समृद्धी आली पाहिजे करोना नको”

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हि महाराष्ट्र सरकारच्या मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णयाचे एकप्रकारे समर्थनच केले आहे.

१३ ऑक्टोबर रोजी पंत्रप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार म्हणाले होते,

महाराष्ट्र मध्ये अशा धार्मिक स्थळांची संख्या मोठी आहे, जिथे सामान्य दिवसांमध्ये हि लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. यामध्ये मुंबईचे सिद्धिविनायक मंदिर, पंढरपूरचे श्री. विठ्ठल मंदिर, श्री. साईबाबा मंदिर शिर्डी आणि इतर ठिकाणचा समावेश आहे. अशा मोठ्या गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित सामाजिक अंतर अशक्य होऊन जात. त्याचमुळे महाराष्ट्र सरकारने मंदिर अद्याप बंद ठेवले आहेत.

मंदिरातील पुजाऱ्यांची मत काय आहेत ?

कोल्हापूर येथील आंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की,

इतर राज्यातील मंदिर उघडली गेलीत हे चांगलच आहे. मात्र ज्यांना रोज मंदिरामध्ये येण्याची सवय आहे ते आणि मनःशांतीसाठी येणारे भाविक सुरक्षित राहावे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. त्यामुळे सरकारने दोन्ही बाजूंचा विचार करून निर्णय घ्यावा.

तर पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे ट्रस्टी मुंबई तक या वृत्तवाहीनीसोबत बोलताना म्हणालेत,

महाराष्ट्रात आता जरा संख्या कमी होत आहे. त्यामुळे मंदिर उघडण्यासाठी इतके दिवस वाट बघितली आहे, अजून थोडे दिवस वाट बघितली तर कदाचित आपण कोरोनाला हरवू. त्यामुळे सध्या तर मंदिर उघडण्याची घाई करू नये.

न्यायालयाचे काय मत आहे ?

मंदिर आणि धार्मिक स्थळ सुरु करण्यासाठी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट आणि अंकित हिरजी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर १४ ऑगस्ट रोजी निकाल देताना न्यायालयाने सांगितले होते कि, देव हा आपल्या आतमध्ये वसला आहे. त्यासाठी मंदिरात जाणे हा एकाच पर्याय नाही. त्यामुळे आता मंदिर सुरु करता येणार नाहीत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.