पोपला गरिबांसाठी चर्चचं छप्पर विक असं सांगण्याइतपत टगेपणा मॅराडोनाकडे होता.
जगात सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारा खेळ म्हणजे फुटबॉल… या खेळातील काही नावं अशी आहेत जी जगातल्या प्रत्येकाला माहीत असतात. भले तो माणूस खेळणारा असो किंवा नसो. या खेळाडूंची नावे कानावर पडत असतात…
दिएगो मॅराडोना असेच एक नाव.
काल अचानक हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आता भारतात फुटबॉलची तेवढी क्रेझ नाही पण या माणसाच्या जाण्यानं सगळ्यांना हळहळ लागली. मॅराडोना हा साधा फुटबॉलपटू नव्हता. त्याने 1986साली आपल्या देशाला फुटबॉल वर्ल्ड कप जिंकून दिला. अनेक स्पर्धा जिंकत अर्जेंटिना त्याकाळात जगज्जेता संघ बनू शकला याचे श्रेय मॅराडोना यांना दिले जाते.
त्याच्या पायावर देवाने जादूचा तुकडा ठेवला होता अशी म्हण आहे. पण त्यापलीकडे तो एक महान माणूस होता.
मॅराडोना ज्या घरात वाढला तेव्हा त्याला तिथे तब्बल आठ भावंडे होती. त्यामुळे भावाच्या परिस्थितीतच त्याची जडण-घडण झाली. त्यांच्या घरांमध्ये पाण्याची सोय नव्हती. घरांमध्ये वीज येत नव्हती. पुढं त्यानं आयुष्यात प्रचंड पैसा कमावला. पण त्यांनी ही गोष्ट नजरेआड केलीे नाही.
तो आपलं बालपण आयुष्यभर विसरला नाही. जगातल्या इतर मुलांना अशा परिस्थितीत रहावे लागू नये असाच त्याचा नेहमी प्रयत्न होता.
त्यांनी वापरलेली एक ट्रिक तो परत कधीच वापरायचा नाही. त्याने फुटबॉल खेळण्याच्या इतक्या नव्या नव्या करामती पद्धती शोधून काढल्या की त्याला फुटबॉलचा जादूगर म्हणून संबोधले जाऊ लागले. दरवेळी एखादी नवी कल्पना वापरून तो प्रतिस्पर्ध्याला चकवा देत असे. तो बाकीच्या खेळाडूंनी इतका चपळ आणि धसमुसळा नव्हता. पण जणू काही त्याला शरीरभर डोळे होते. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष असे.
त्याचे मैदानात असणे म्हणजे जवळपास ॲक्रोबेटिक्स प्रकाराचा अविष्कार होता. एखाद्या निष्णात नर्तकी प्रमाणे फुटबॉल सोबत खेळत असे. त्याचे पदलालित्य बघून लोक मंत्रमुग्ध होत. खेळामधील हार आणि जीत याच्या पलिकडे जाउन मॅराडोना मोठा माणूस बनला होता.
त्याला कोकेनचे व्यसन होते. त्याचे वजनही कधी स्थिर राहिले नाही. त्यामुळे अनेक शारीरिक व्याधी त्यांना जडल्या होत्या. पण त्याने आपले आयुष्य आपल्या तत्त्वांवर जगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला योग्य वाटेल तीच गोष्ट त्याने आयुष्यभर केली. एका बंडखोर माणसाप्रमाणे त्याने आपल्या निर्णय घेतले आणि ते योग्य सिद्ध करून दाखवले.म्हणून तो फक्त फुटबॉलच्या ग्राउंड वर नाही तर आयुष्याच्या मैदानावरही एक महान खेळाडू होता.
तो जसा फुटबॉलच्या मैदानावर डाव्याबाजूने खेळायचा तसाच आपल्या राजकीय विचारांनीही तो डावीकडे होता.
त्याने आपल्या आयुष्यभर सतत साम्राज्यवादाच्या विरोधी भांडवलशाहीचा विरोध करत कम्युनिस्ट भूमिका घेतली. फुटबॉलच्या मैदानावर जेवढा प्रसिद्ध होता तेवढाच राजकीय वर्तुळात देखील त्याच्या नावाची चर्चा होती.
एकदा त्याने जॉर्ज बुश यांचा फोटो असलेले टी-शर्ट घातले होते. पण यावेळी त्याने त्यांचा उदोउदो केला नव्हता तर त्यांच्या फोटोच्या वर वॉर क्रिमिनल असे लिहिले होते.
जगातल्या अनेक भागात जॉर्ज बुश यांनी युद्ध सुरू केली होती. त्यालाच दर्शवण्यासाठी मॅराडोना लोकांच्या मध्ये तसा शर्ट घालून गेला. आपल्या साठ वर्षाच्या आयुष्यात त्याने समाजवादी विचारसरणीला आपलेसे केले.
एक फुटबॉलपटू म्हणून तो स्वतः आपल्या खेळाच्या बाबत बाप होता. पण म्हणून त्याने फक्त आपले लक्ष मैदानावरच केंद्रित केले नाही.
फिफा म्हणजे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ असोसिएशन फुटबॉल ही संस्था जगातील फुटबॉलचा सर्व कारभार बघते. या संस्थेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असतो. या संस्थेच्या विरुद्ध काही बोलणे म्हणजे त्या फुटबॉलपटू खेळाडूने आपले करिअर संपवणे होईल.
पण मॅराडोना आयुष्यभर या संस्थेत होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढला. त्याच्या मतानुसार “फुटबॉल खेळणारा खेळाडू हासुद्धा एक कामगार होता. कामगारांना मिळणारे सर्व हक्क त्याला मिळाले पाहिजेत तसेच त्याच्या आयुष्याची आणि निर्वाहाची सोय त्याच्या सरकारने केली पाहिजे. त्यासाठी फुटबॉलपटू लोकांनी एकत्र येऊन आपली युनियन उभारावी” असे त्याचे मत होते. फक्त मत मांडूनच तो थांबला नाही.
नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी फुटबॉलपटूना एकत्र बोलावले. यामध्ये अनेक मोठे खेळाडू सहभागी होते. तसेच नव्याने फुटबॉल खेळू लागलेल्या तरुण खेळाडूंचा देखील भरणा होता.
या सर्वांना एकत्र घेऊन त्याने इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल फुटबॉल प्लेयर्स ही संस्था स्थापन केली. फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम ही संघटना करते. जगाच्या अनेक देशांमध्ये या संस्थेची व्याप्ती आहे. फुटबॉल खेळणारा खेळाडू हा सुद्धा माणूस आहे आणि त्याला माणूस म्हणून अधिकार मिळाले पाहिजेत अशी या संघटनेच्या कामामागची धारणा आहे.
मॅराडोनाला फुटबॉल वर्तुळात “El 10” या नावानेही ओळखले जाते. दहा हा आकडा फुटबॉल खेळा मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर शोभून दिसतो. अशा बोटावर मोजण्या इतक्या खेळाडूंमध्ये तो एक होता.
आपल्या प्रसिद्धीचा फायदा त्याने पैसा कमावण्यासाठी च न करता त्याने गरीब देशांच्या विकासासाठी केला.
जागतिक स्तरावर त्याला प्रसिद्धी मिळाली होती. त्याचा उपयोग करून त्याने अनेक गरीब देशांमधील सरकारांना मदत केली. त्यांनी आपली विचारसरणी कधीच जगापासून लपून ठेवली नाही. 1990 च्या दशकामध्ये जेव्हा रशियामधील सोवियत युनियन पडली तेव्हा भले भले लोक आपण डाव्या विचारांचे आहोत हे दाखवायला घाबरत होते.
पश्चिमेकडील जगात मार्क्सवादी शिवी म्हणून वापरली जात होती . त्या काळामध्ये आपण मार्क्सवादी आहोत हे उघड सांगण्याची हिम्मत करणारा मॅराडोना हा एकमेव फुटबॉलपटू होता.
त्यांनी नेहमीच जगात समाजवादी मार्गाने काम करणाऱ्या सरकारांना आपला पाठिंबा दिला. पुरोगामी चळवळींना तो उघडपणे पाठिंबा देत असे. जमेल तसे त्यांचे समर्थन करून त्यांना जगात प्रसिद्धी देत असे. जगात जिथे जिथे कम्युनिस्ट सरकार होते जवळपास त्या सर्व ठिकाणी मॅराडोना यांनी भेट दिली होती.
दिएगो मॅराडोना भारतामध्ये आला तेव्हा त्याचा बहुतांश मुक्काम हा केरळमध्ये होता. केरळच्या कम्युनिस्ट नेत्यांशी त्याने चर्चा केली. अनेक वरिष्ठ कम्युनिस्ट नेत्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत त्याने एक छोटीशी मॅच सुद्धा खेळली होती.
यावेळी केरळच्या कम्युनिस्ट पक्षाचे नेते एम ए बेबी यांच्याशी त्याने दीर्घ बातचीत केली होती. बेबी यांच्याशी त्याचा चांगला स्नेह होता. त्याने 2012 यावर्षी आपला वाढदिवस सुद्धा केरळमध्येच साजरा केला.
यापूर्वी 2008 मध्ये ही मॅराडोना भारतात आला होता. त्यावेळी त्याने भारतातील फुटबॉल साठी सर्वात प्रसिद्ध शहर म्हणजे कोलकाता शहरामध्ये आपला मुक्काम ठेवला होता. यावेळी त्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सर्वात प्रसिद्ध नेते ज्योती बसू यांची घरी जाऊन भेट घेतली होती.
जन्माने कॅथलिक ख्रिश्चन होता पण धर्मावर त्याचा कधीच विश्वास बसला नाही.
त्याने वर्ल्डकप मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध केलेला गोल देवाच्या आशीर्वादानेच झाला होता अशी लोकांची श्रद्धा आहे. पण या गोष्टीला मॅराडोना हसण्यावारी नेत असे.
एकदा तो पोप जॉन पॉल दुसरे या आता संतपद भेटलेल्या पोपला व्हॅटिकन शहरात भेटला होता. त्यांना भेटून बाहेर आल्यानंतर मॅराडोनाला काय वाटले असे विचारण्यात आले. तो म्हणाला,
“मी चर्चमध्ये गेलो मला दिसलं चर्चच्या भिंती आणि छत सोन्याने रंगवलेली आहेत… आणि तेवढ्यात पोप मला म्हणाला, आम्हाला जगातील गरिबीची आणि गरीब मुलांची खूप चिंता वाटते.. त्यावर मी म्हणालो “देन यूअर सेलिंग, अमीगो, डु समथिंग!”
म्हणजे असं असेल तर,
“भावड्या, तू तुझ्या चर्चचे छप्पर वीक आणि काहीतरी कर!”
पॅलेस्टाईनवर जेव्हा जेव्हा इस्त्राईल देशाने अत्याचार केले तेव्हा तो पॅलेस्टिनी मुसलमानांच्या सोबत उभा राहिला. “हृदयातून मी एक पॅलेस्टिनी आहे. मी त्या लोकांचा संरक्षक आहे. मी त्यांचा आदर करतो आणि कुणालाही न भिता पॅलेस्टाईनचा पुरस्कार करतो” असे तो म्हणत असे.
त्याने आपल्या हातावर अर्जेंटिनाचा प्रसिद्ध क्रांतिकारक चे गव्हेरा याचा टॅटू काढून घेतला होता. तसेच त्याने आपल्या पायावरही क्युबाचे अध्यक्ष आणि क्रांतिकारक फिडेल कॅस्ट्रो याचा टॅटू काढला होता. हे दोघेही अमेरिकेविरुद्ध केलेल्या उठावासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे मॅराडोना नेहमी अमेरिकेच्या विरुद्ध ठामपणे उभा राहिला.
” अमेरिकेतून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मी तिरस्कार करतो. माझ्यात जेवढी ताकत आहे ती सगळी वापरून मी अमेरिकेचा तिरस्कार करतो”
असे तो म्हटला होता.
व्हेनेझुएला देशांमध्ये जेव्हा क्रांती झाली तेव्हा अमेरिकेने तेथील सरकारला पाठिंबा द्यायला नकार दिला. अशा वेळी मॅराडोना स्वतः त्या देशात गेला होता. त्याने नव्या सरकारला पाठिंबा दिला. तेथील नवे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांच्याशी त्याचा चांगला स्नेह होता. जगभर अमेरिकेने त्या माणसाची निंदा केली. पण मॅराडोना यांनी त्याला जगभर फेमस केले.
“माझा चावेझ यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. फिडेल कॅस्ट्रो आणि तो जे काही करेल त्याने जगात चांगलंच घडणार आहे” असं तो म्हणाला होता.
चावेझ यांच्या फॅन असणाऱ्या क्रांतिकारकांना त्यावेळी चाविस्ता असे म्हटले जायचे. मॅराडोना अनेकदा स्वतःला चाविस्ता म्हणून घेत असे. नुकत्याच बोलिव्हिया देशांमध्ये झालेल्या क्रांतीला त्याने पाठिंबा दिला होता. येथील पहिले आदिवासी अध्यक्ष युवो मोरालेस यांचे त्याने स्वतः भेटून कौतुक केले होते.
“मी समाजवादी आहे कारण मी माझ्या देशाच्या लोकांचा विचार करतो. देशात शांती आणि स्वातंत्र्य नांदावे अशी माझी इच्छा आहे. मला कोणीच खरेदी करू शकत नाही. मी पायाने डावखुरा आहे तसाच हाताने डावखुरा आहे आणि हृदयातून सुद्धा डावखुरा आहे. आम्ही लोकं नेहमी खरी गोष्ट बोलतो. छाताडावर अमेरिकेचे झेंडे घेऊन राहणे आम्हाला पसंत नाही. जगात समता आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे” असं तो भर पत्रकार परिषदेत म्हणाला होता.
दक्षिण अमेरिकेचे क्रांतिकारी कवी आणि पत्रकार एदुआर्दो गलियांनो यांनी मॅराडोना आणि फुटबॉल याच्या वर आधारित सॉकर इन द सन अँड शॅडो हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी मॅराडोना च्या खेळाची स्तुती केली आहे. त्यात त्याच्या सर्व गोष्टींचा उल्लेख येतो.
मॅराडोना हे वादळ आता थांबले असले तरी जगातील अनेक मुलांचा अजूनही तो आदर्श आहे. त्याने आपल्या खेळातून आणि आपल्या जगण्यातून निर्माण केलेले आदर्श येणार्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.
हे ही वाच भिडू.
- मोहम्मद सलाह इजिप्तमधील फुटबॉल क्रांतीचा नायक!!!
- 100 कोटी कमवणारा फुटबॉलपटू फुटका मोबाईल का वापरतो याला पण एक कारण आहे.
- युरोपमध्ये भल्याभल्या राजकारण्यांना जमलं नाही ते या फुटबॉलरने करून दाखवलं !!
- ड्रग्ज माफिया एस्कोबारच्या बोलावण्यावरून मॅराडोना फुटबॉल खेळण्यासाठी जेलमध्ये गेला होता !