कोणाला फियाट आवडायची तर कोणाला मारूती, पण मॅटाडोर आवडणाऱ्यांचा वेगळा क्लास होता..

कसंय भिडूंनो, माणसं अनेक गोष्टींचे शौकीन असतात. काहींना जुने पेन जमवायचा शौक असतो. काहींना जगभरातली जाडजुड पुस्तकं स्वतःच्या संग्रही असावी, अशी इच्छा असते.

तसंच काहींना असतो गाड्यांचा शौक. जगभरातल्या ज्या गाड्या क्लासिक म्हणुन ओळखल्या जातात, त्या एकदातरी स्वतःच्या हाताने चालवायला मिळाव्यात, यासाठी अशी माणसं अक्षरशः काहीही करायला तयार असतात.

एकेकाळी अशाच काही माणसांना फोक्सवॅगन कंपनीची ‘कॅम्पर बस’ चालवायची खुप इच्छा असायची. ५० वर्ष मागे डोक्यावल्यास लक्षात येतं की, बजाज कंपनीने स्वतःची एक अस्सल देसी क्लासिक गाडी निर्माण करुन गाडी चालवणा-या माणसांना भुरळ घातली होती.

हि गाडी म्हणजे बजाज कंपनीची ‘मॅटाडोर’.

१९६० साली बजाज टेम्पो कंपनीने या गाडीची निर्मिती करुन भारतातली सर्वात विश्वासु गाडी म्हणुन ओळख मिळवली. या गाडीचे पुढे सामानाची वाहतुक करण्यासाठी, शाळेची बस म्हणुन, अॅम्ब्युलन्स, पोलीसांचं वाहन असे अनेक उपयोग करण्यात आले. आम्हाला खात्री आहे, की अनेक जणांच्या जुन्या आठवणी ‘मॅटाडोर’शी जोडल्या गेल्या असतील.

‘टेम्पो’ उच्चारल्यावर एक धुळ बसलेली गाडी जी माल वाहतुक करतेय, असं चित्र लगेच डोळ्यासमोर उभं राहतं.

परंतु फिरोदियांनी टेम्पोच्या रुपाला थोडंसं वेगळेपण देऊन १९६४ साली ‘बजाज टेम्पो वायकींग’ हि गाडी बाजारात आणली. आणि पुढच्या पाच वर्षात १९६९ साली ‘बजाज टेम्पो मॅटाडोर’ची निर्मिती केली. पुण्यातील नागरीकांसाठी हि गाडी खास जवळचा विषय. कारण मॅटाडोर आणि वायकींग या बजाज टेम्पोच्या दोन गाड्यांची निर्मिती पुण्यात झाली आहे.

त्या काळात मुंबईत फियाट, कोलकात्यामध्ये अँबेसेडर या दोन गाड्या जशा लोकप्रिय होत्या, तसंच पुण्यात मॅटाडोरची वेगळीच शान होती.

मॅटाडोर हे बजाज टेम्पोच्या वायकींग गाडीचं पुढचं रुप होतं. दोघांमधला फरक सांगायचा झाला तर, वायकींगपेक्षा मॅटाडोर वजनाने हलकी होती. वायकींग पेट्रोलवर चालणारी तर मॅटाडोर डिझेलवर धावणारी. दोन्ही गाड्यांच्या रचनेत सुद्धा थोडासा बदल होता. एकाच गोष्टींमध्ये या दोन्ही गाड्यांमध्ये सारखेपणा म्हणजे , खाजगी क्षेत्रात आणि व्यावसायिक तत्वावर दोन्ही गाड्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर व्हायचा.

मॅटाडोर अनेकदा शाळेची बस म्हणुन नजरेत यायची. बहुतांश वेळा पिवळा रंग मारलेली हि बस शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षण.

काळ बदलत होता. हळूहळू या दोन्ही गाड्यांच्या निर्मितीला उतरती कळा लागली. पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने जास्त पेट्रोल खाणा-या वायकींगचं उत्पादन १९७० च्या आसपास बंद झालं. तर २००० साली मॅटाडोरची निर्मिती कमी झाली. याच काळात नव्या आकर्षक डिझाईनसह एक जॅपनीज गाडी बाजारात आली होती.

यामुळे वायकींग आणि मॅटाडोरचं लोकांमध्ये असणारं अप्रुप कमी झालं.

जुन्या वस्तु कितीही कालबाह्य झाल्या तरी नव्या पिढीला त्यांच्यातला क्लासिकपणाच अधिक भावतो. पुण्यात राहणा-या धनंजय बदामीकर या गृहस्थाला विंटेज गाड्या संग्रही बाळगायचा छंद. त्यांनी मॅटाडोर खरेदी करुन तिचं स्कुलबसमध्ये रुपांतर केलं आहे. अशा शौकीन माणसांमुळे जवळपास नामशेष झालेल्या मॅटाडोरला नवसंजीवनी मिळाली.

मॅटाडोरची निर्मिती २० वर्षांपुर्वीच बंद झाली असली तरी, मॅटाडोरची क्लासिक ओळख अजुनही तशीच आहे. केरळात राहणाऱ्या सहा मित्रांनी स्वतःचा एक म्युझिक बँड निर्माण केला.

शाळेत असल्यापासुन हे सहा मित्र एकमेकांसोबत होते. यापैकी एका मित्राच्या वडिलांकडे मॅटाडोर होती. या मॅटाडोरशी त्यांच्या अनेक आठवणी जोडल्या होत्या.

२०१० साली जेव्हा या मित्रांनी स्वत:चा म्युझिक बँड बनवला तेव्हा या बँडला त्यांनी ‘मॅटाडोरीया’ हे नाव दिले. बँडमार्फत मुबलक पैसे मिळावल्यावर या मित्रांनी गेल्या वर्षी हैदराबाद येथील एका गॅरेजमधुन मॅटाडोर विकत घेतली.

मॅटाडोरने हिंदी सिनेमात सुद्धा स्वतःची उपस्थिती दर्शवली आहे. खुप जणांना आठवत असेल, १९७८ साली आलेल्या बासु चॅटर्जींच्या ‘खट्टा मिठा’ सिनेमात पहिल्यांदा मॅटाडोर झळकली होती. अगदी हल्ली म्हणजे २०१४ साली आलेल्या कल्कीच्या ‘मार्गारीटा विथ व स्ट्रॉ’ सिनेमात तसेच २०१८ सालच्या जॅकी भगनानीच्या ‘मित्रो’ सिनेमात मॅटाडोरचा वापर केला गेला आहे.

‘जुनं ते सोनं’ या म्हणीचं समर्पक उदाहरण म्हणजे बजाज कंपनीची हि मॅटाडोर.

आजही काही शौकीन व्यक्तींमुळे आणि नव्या पिढीमधल्या काही माणसांना जुन्या गोष्टींची आवड असल्याने मॅटाडोर तिचं अस्सलपण शाबुत ठेऊन नवनवीन रुपात आपल्याला भेटत असते.

कधी सिनेमात, कधी कोणत्या गाण्यात तर कधी आपल्या मनातच मॅटाडोर आठवण म्हणुन भेटायला येते.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.