पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणाले, हा सरदारजी धावत नाही तर उडतोय !!
जगभरात ‘फ्लाइंग सिख’ या नावाने ओळखले जाणारे म्हणजे पद्मश्री मिल्खा सिंग. भारतीय अथलेटिक क्षेत्राला जगभरात चमकवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
आज त्यांचा जन्मदिन. त्यांचं नाव घेतलं की आठवतं ते १९६० सालच्या रोम ऑलिम्पिक मध्ये मिल्खा सिंग यांच्या आणि पर्यायाने भारताच्या हातातून निसटलेलं ऑलिम्पिक पदक.
अवघ्या एका शतांश स्प्लीट सेकंदाने मिल्खा यांचं ऑलिम्पिक पदक हुकलं होतं आणि मिल्खा यांच्याबरोबरच करोडो भारतीयांच्या ऑलिम्पिक पदकाच्या आशा धुळीस मिळाल्या होत्या. त्या चुकलेल्या ऑलिम्पिक पदकाची मिल्खा सिंग यांना शेवटपर्यंत खंत राहिली.
रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार होते.
कारण तोपर्यंत त्यांनी खेळलेल्या ८० पैकी ७७ आंतरराष्ट्रीय रेस त्यांनी जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे रोम ऑलिम्पिकपूर्वी १९५८ सालच्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये त्यांनी जागतिक विक्रम नावावर असणाऱ्या स्पेंसचा पराभव करून सुवर्णपदक पटकावल होतं. त्यामुळे अवघा देश त्यांच्याकडून ऑलिंपिक पदकाची अपेक्षा ठेऊन होता.
पण अंतिम फेरीत धावताना मिल्खा यांनी आपल्या प्रतीस्पर्ध्यांचा अंदाज घेण्यासाठी मागे वळून बघितलं आणि त्याचवेळी त्यांची मोमेंटम खराब झाली. या एका चुकीची किंमत मिल्खा यांना ऑलिम्पिक पदक हुकून चुकती करावी लागली. सुवर्णपदकाचे प्रबळ दावेदार असणारे मिल्खा चौथ्या नंबरवर गेल्याने कांस्यपदक देखील हुकलं.
मिल्खा याचं कांस्यपदक हुकलं असलं तरी,
यावेळी देखील त्यांनी त्यापूर्वीच्या ऑलिम्पिकमधल्या रेकॉर्डपेक्षा सरस कामगिरी नोंदवली होती.
१९६० सालचाच एक प्रसंग असा की मिल्खा यांना रेससाठी पाकिस्तानातून बोलावण्यात आलं. त्यावेळच्या आशियातील सर्वोत्कृष्ट धावपटूंपैकी एक समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या स्टार धावपटू अब्दुल खालिक बरोबर रेस करण्यासाठी पाकिस्तानकडून हे निमंत्रण मिळालं होतं.
खरं तर सुरुवातीला मिल्खा सिंग यांनी पाकिस्तानला जायला नकार दिला. कारण मिल्खा यांच्या फाळणीशी संबंधित आठवणी अतिशय कटू होत्या.
फाळणीच्या काळात झालेला त्यांच्या आई-वडलांचा खून त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला होता. त्यामुळे मिल्खा यांना पाकिस्तानात जाऊन पुन्हा एकदा या आठवणी जगवायच्या नव्हत्या.
अशा परिस्थितीत खुद्द देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मिल्खा सिंग यांची समजूत काढली आणि त्यांना पाकिस्तानात जायला तयार केलं.
खेळाच्या माध्यमातून आपल्या शेजारी देशासोबतचे संबंध सुधरवण्यासाठी आपल्याला पाकिस्तानात जायचंच आहे, असं पंडित नेहरूंनी मिल्खा सिंग यांना सांगितलं. तेव्हा कुठे त्या रेससाठी मिल्खा तयार झाले.
मिल्खा-खालिक यांच्यादरम्यानच्या या हाय-होल्टेज रेसची मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. पाकिस्तानी माध्यमांनी या लढतीला भारत विरुद्ध पाकिस्तान असं स्वरूप दिलं होतं. मिल्खा यांना मात्र ही गोष्ट बिलकुल आवडली नव्हती. दोन देशांमधील मित्रतापूर्ण संबंधासाठी खेळविल्यात येणाऱ्या या रेसला अशा प्रकारचं स्वरूप देण्यात आल्याने लढतीपूर्वी मिल्खा थोडेसे नाराज होते.
रेस बघण्यासाठी मैदानात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती. पाकिस्तानचे राष्ट्रपती फिल्ड मार्शल अयुब खां देखील लढत बघण्यासाठी त्यावेळी मैदानावर उपस्थित होते. रेस पार पडली आणि मिल्खा सिंग यांनी अब्दुल खालिक याला अगदी सहजच मात दिली.
पारितोषिक वितरण समारंभात फिल्ड मार्शल आयुब खां म्हणाले,
“मिल्खा जी, आज तुम्ही पाकिस्तानात धावले नाही, तर उडले आहात.”
फिल्ड मार्शल अयुब खां यांच्या या शब्दानंतरच मिल्खा सिंग यांच्या नावाशी ‘फ्लाइंग सिख’ ही उपाधी जोडली गेली आणि जगभर ते याच नावाने प्रसिद्ध झाले.
हे ही वाच भिडू.
- ते नसते तर भारत १९६५ सालचं पाकिस्तानविरुद्धचं युद्ध हरला असता !
- पाकिस्तानने भारताकडे हॉकी खेळाडू मागितला, भारताने सांगितलं, त्यासाठी युद्ध करावं लागेल !
- पाकिस्तान विरुद्धच्या त्या सामन्याचा खरा हिरो पुण्याच्या कानिटकरचा चौकार होता
- भारताचे पहिले अर्थमंत्री, जे पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान बनले !