पवारांच्या दोस्ताने इतक मोठ्ठं काम केलय की मोदींना देखील पुण्यात यावं लागलं…

स्वारगेटकडून ह़डपसरच्या दिशेने जाताना कॅम्पच्या पुढं गेलं की डाव्या बाजूला रेसकोर्स दिसतो. मी तर आयुष्यात पाहिलेला हा पहिला रेसकोर्स होता. आपल्या गावाकडच्या पोरांना जागा एकरात मोजायचं जाम कौतुक.

एवढ्या मोक्याच्या ठिकाणी एकरावर जागा बघुन आपण खूष झालो. रुमवर गेल्यावर चौकशी केली तेव्हा सायरस पूनावाला हे नाव ऐकायला मिळालं.

एका माणसांची हि जागा की रेसकोर्सचे मालक असल्यामुळे रेसकोर्सची जागा, की सामुहिक, संस्थेची मालकी या भानगडीत आपण हा लेख लिहताना देखील पडलो नाही. आपल्याला फक्त सायरस पूनावाला हे पुण्यातले सगळ्यात श्रीमंत माणूस आहेत इतकच कळलं.

पुनावाला यांच्या गॅरेजमधल्या गाड्यांची लिस्ट सांगायची म्हणली तर त्यांच्याकडे फेरारी F-430, रोल्स रॉयल्स, Cessna 560XL असल्या गाड्या आहेत. आणि फॉल्कन 900EX हे बिझनेस जेट पण आहे.

आत्ता आमच्यासारख्यांचा मॅटर असा असतोय की, रिलायन्सवाल्यांची जिओ पासून तेलाच्या खाणी दिसतात माणूस त्यांना पैसा मिळत असेल हे पटतं. बजाजवाल्यांच्या गाड्या दिसतात म्हणून ते पैसै मिळवतात हे पटतं.

पण पूनावाल्यांचे घोडे सुद्धा आम्हाला कधी दिसले नाहीत. साहजिक प्रश्न पडायचां? 

श्रीमंत आहेत ते ठिकाय पण इतका पैसा कसा मिळवलां..?

नंतर कोरोना आला आणि गणित सोडवणं सोप्प झालं, पुनावाला जगाला तारणहार ठरणारी लस बनवतात हे कळलं. सध्या अदर/आधार जे काही असले ते पुनावाला कारभार पाहतात त्यामुळे त्यांच नाव चर्चेत राहिलं.

पण या सर्व गोष्टींच्या मागे होते ते सायरस पुनावाला…

तर सायरस पूनावाला हे पहिल्यापासून गर्भश्रीमंत घरातले. आजच्या इतके नसले तरी श्रीमंती होतीच. त्यांच्या वडिलांनी १९४६ च्या दरम्यान पूनावाला स्टड फार्मची स्थापना केली होती. रेस साठी लागणाऱ्या उत्तम घोड्यांची पैदास करणं हा त्यांचा बिझनेस.

हा बिझनेस फुल फार्मात होता. थोडक्यात पैसे नव्हते, गरिबी होता असा काही संबध नव्हता. सायरस पूनावाला यांच शिक्षण देखील प्रतिष्ठित अशा बिशप स्कूल मधून झालं. पुण्याच्या BMCC मधून त्यांनी आपलं B.com पुर्ण केलं.

कॉलेज झालं आणि परंपरा, प्रतिष्ठा औंर अनुशासन या पद्धतीप्रमाणे ते देखील या व्यवसायात आले. तोपर्यन्त पूनावाला स्टड फार्म हा भारतातला प्रतिष्ठित स्टड फार्म झाला होता. रेसच्या घोड्यामध्ये पूनावाला कुटूंबाच नाव घेतलं जातं होतं. १३ घोड्यांपासून सुरू झालेला व्यवसाय सायरस पुनावाला यांच्या हाती येईपर्यन्त बराच मोठा झाला होता.

आत्ता सायरस पूनावाला यांच्या हाती पुनावाला स्टड फार्मची सुत्रे आली होती.

वेगळं काहीतरी करायचं म्हणून त्यांनी रेसिंग कार या विषयात रस घेतला. त्यांच मत होत की भविष्यात घोड्यांच्या रेस संपून जातील. कार रेसिंगला चांगले दिवस येतील. असा विचार करुनच साठच्या दशकात १३० डॉलर्स खर्च करुन एक डी टाईप जॅग्वुराच मॉडेल विकसित केलं. बऱ्याच प्रयत्नाने भांडवल गोळा करुन देखील अपेक्षित फायदा झाला नाही. त्यांना नाईलाजाने हा आतबट्याचा व्यवसाय बंद करावा लागला.

वेगळं काहीतरी करायचं होतं पण काय?

रेसिंग कार आणि त्यासंबधित व्यवसायात आलेलं अपयश जिव्हारी लागणारं होतं. अशाच वेळी त्यांना प्रश्न पडला  आपण हाफकिन इन्स्टिट्यूटला जे म्हातारे घोडे देतो त्यातून किती रुपये मिळतात?

म्हाताऱ्या आणि रेसमधून बाध झालेल्या घोड्यांना मिळणारी किंमत नाममात्रच होती. हाफकिन इन्टिट्यूमध्ये म्हाताऱ्या घोड्यावर कोणते प्रयोग केले जातात याची चौकशी केल्यावर त्यांनी समजलं की, माणसांसाठी वापरण्यात येणाऱ्या लसी बनवण्याच काम इथे चालतं आणि त्यासाठी घोड्याची आवश्यकता असते. 

B.com च शिक्षण झालेल्या सायरस पुनावालांना हि प्रोसेस कळली नाही पण फायद्याचा व्यवहार मात्र लक्षात आला. शिवाय हा व्यवसाय लोकांचा होता. त्यातून लोकांच भलच होणार होतं. माहिती घेतल्यानंतर समजलं की घोड्यांच्या रक्तातील सिरम नावाच्या घटकापासून लस बनवता येते. त्याकाळी साथीच्या रोगाचे प्रमाण जास्त असल्याने लस हि सर्वसामान्यांच्या आवाक्यात नव्हती. सायरस पुनावाला यांनी सर्व परिस्थिती अगदी जवळून समजून घेतली.

आणि निर्णय झाला तो म्हणजे,

आता आपणच घोड्यांच्या सिरमपासून स्वत: लसी बनवायच्या.

गरिबातल्या गरिब माणसाला परवडली पाहिजे अशी लस आपणाला बनवता येईल. पण त्यासाठी मेडिकल क्षेत्राची जाण असणं गरजेचं होतं. त्यांनी आपला भाऊ जाव्री पूनावाला यांना सोबत घेतले. साठच्या दशकात तीन ते चार लाख रुपयांच भांडवल गोळा करण्यात आलं. त्या काळी हि रक्कम खूपच मोठ्ठी होती.

आणि मग १९६६ साली आपल्या भावाच्या सहकार्यातून सिरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची स्थापना करण्यात आली.

कंपनी स्थापन झाली पण सर्वात मोठ्ठ काम होतं ते त्या पद्घतीची हुशार लोकं नेमून लस तयार करणं. त्यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूट मधून दहा डॉक्टरांना खास नेमण्यात आलं.

त्यांच्याकडे काम होतं की, धनुर्वाताच्या लस तयार करणं. दोन वर्ष या टिमने प्रयत्नपुर्वक काम करून घोड्यांच्या सिरम पासून धनुर्वाताची लस तयार केली. त्या नंतरचा प्रश्न होता या लसीला सरकारची मान्यता मिळवणं. सरकारने मान्यता दिलीच पण स्वस्त किंमत आणि प्रभावी असल्याने सरकारी दवाखान्यात त्याचा पुरवठा करण्याचं कंत्राट देखील या कंपनीला दिलं.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीला मिळालेलं हे पहिलं यश होतं. त्यानंतर या कंपनीची घोडदौड सुरू झाली ती आजही चालू आहे.

१९७४ साली या कंपनीने DPT हि त्रिगुणी लस तयार केली. १९८१ साली साप चावल्यानंतर प्रभावी ठरणाऱ्या लसीचं उत्पादन करण्यात आलं. १९८९ साली  Measles Vaccine M-Vac चं उत्पादन करुन SIL कंपनी भारतातील सर्वात मोठी लस निर्माण करणारी कंपनी ठरली. Diphtheria, Pertussis आणि tetanus अर्थात DPT या SIL कंपनीमार्फत लसीकरण झालेल्या मुलांच प्रमाण सांगायचं झालं तर आज जगातील ३ पैकी दोन मुलांना या कंपनीने उत्पादित केलेल्या लसीमार्फत लसीकरण झालेलं आहे. DPT, M-VAC,BCG, रुबेला यांसारख्या अनेक लसी सिरम इंडिया मार्फत उत्पादित करण्यात येवू लागल्या.

आशिया खंडातील सर्वात मोठ्ठी तर जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यामधील पहिल्या तीन मध्ये असणारी कंपनी म्हणून SIL चा आज उल्लेख केला जातो.

आज त्यांचा मुलगा अधर पुनावाला कंपनीचा कारभार पाहतो. सायरस पुनावाला यांच्या उत्पनातला ९० टक्के पैसा हा याच कंपनीतून येतो. आज कंपनीची नेट व्ह्यॅल्यू आठ अब्ज डॉलर असल्याचं सांगण्यात येत. साहजिक इतक्या मोठ्या रक्कमेतून गर्भश्रीमंत असणारे सायरस पुनावाला आपले शौक पुर्ण करतात. पण त्याचबरोबरीने त्यांच्या कंपनीमुळेच भारत महामारी सारख्या रोगातून वाचला आहे.

आपल्याला जी स्वस्तात पण प्रभावी लस टोचली आहे ती यांच्याच कंपनीने टोचलेली आहे हे खूप उशीरा आपल्याला समजतं. त्यांच्या याच कार्यामुळे भारत सरकारने त्यांचा पद्मश्री देवून गौरव केला. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.