विद्यापीठातल्या पब्लिक टॉयलेटमध्ये मोहम्मद जिनाचे फोटो लावले जातायेत

भारत – पाकिस्तान काही नवीन नाही. दोन्ही देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे उलटून गेलीत. पण एकमेकांच्या विरुद्ध असलेला राग हा अजूनही अनेक घटनांमधून दिसून येतोय. नुकताच अश्याच एका नवीन वादाला तोंड फुटलंय. तो म्हणजे अलीगढ मुस्लिम विद्यापीठात (AMU) असलेल्या मोहम्मद अली जिना यांच्या फोटोवरून.

आता विद्यापीठातली ही काय पहिली घटना नाही. याआधीही कित्येक वेळा विद्यापीठातून मोहम्मद जिनाचा फोटो काढून टाकला जावा, अशी मागणी होत होती. कित्येकदा यासाठी आंदोलन देखील झालीत. दरम्यान, आता पुन्हा या फोटोवरून वाद पेटणार असल्याचं दिसतंय. 

खरं तर, उद्या १४  सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अलिगढला येणार आहेत. अलीगड जिल्हा मुख्यालयापासून ३० किमी दूर लोढा येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान तिथं येणार असल्याचे समजते. यासोबत ते उत्तर प्रदेश डिफेन्स कॉरिडॉरच्या अलीगढ परिसरालाही भेट देतील.  उत्तर प्रदेश डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये अलीगढसह सहा शहरांचा समावेश आहे.

पंतप्रधान कार्यालयाने सोमवारी एका निवेदनात ही माहिती दिली. पीएमओच्या म्हणण्यानुसार, “पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता उत्तर प्रदेशच्या अलीगढ येथील राजा महेंद्र प्रताप सिंह राज्य विद्यापीठाची पायाभरणी करतील. या प्रसंगी पंतप्रधान जनतेला संबोधितही करतील. नंतर ते विद्यापीठ कॅम्पसलाही भेट देतील. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा उपस्थित राहतील.”

योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी राजा महेंद्र प्रताप सिंह यांच्या नावाने अलीगढमध्ये नवीन राज्य विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. तज्ञांचे म्हणणे आहे की, राजा महेंद्रसिंह यांनी अलिगड विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आपली जमीन दान केली होती.

अश्यात भाजप कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी अलिगढमध्ये येण्यापूर्वी अलीगढ मुस्लिम विद्यापीठातुन मोहम्मद जिना यांचा फोटो हटवण्यात यावा. 

त्यांचं म्हणणं आहे कि, भारताचे तुकडे करणाऱ्या माणसाचे फोटो हटवण्यात यावेत. यासाठी विद्यार्थ्यांनी १२ सप्टेंबरला संध्याकाळी डीएस कॉलेजमध्ये आंदोलन केले, नंतर गांधी पार्क बस स्टँडजवळच्या पब्लिक टॉयलेटमध्ये मोहम्मद जिनांचे फोटो लावले गेले, यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यांनतर थोड्यात वेळात या घटनेचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाले.

दरम्यान, या घटनेची माहिती प्रशासनाला  मिळताच टॉयलेटमध्ये लावलेली मोहम्मद जिनाचे फोटो तातडीने काढण्यात आले. माहितीनुसार या आंदोलनात सहभागी झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. पंतप्रधानांचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत त्यांनी घरातच रहावे. बाहेर कोणीही पडू नये, नाहीतर नियमानुसार कारवाई केली जाईल. असं पोलिसांनी स्पष्टपणे सांगितलय. 

दरम्यान, याआधी ९ सप्टेंबरला शिवांग तिवारी नावाच्या भाजप नेत्याच्या नेतृत्वाखालील तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्ताने पत्र लिहून अलिगढ विद्यापीठातून जिनांचा फोटो हटवण्याची मागणी केली होती. या दरम्यान, तिथे निषेधही केला गेला, त्यावर प्रशासनाने आश्वासन दिले की, त्यांची मागणी सरकारपर्यंत पोहचवली जाईल.

महत्वाचं म्हणजे काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा मोहम्मद जिना आयांच्या विरुद्ध व्यक्तव्य केलं होतं. त्यांनी म्हंटल कि,

भारतात जिना यांना सन्मान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जिनांनी आपल्या देशाचे विभाजन केले आणि आपण त्यांच्या कर्तृत्वाचे वर्णन कसे करू शकतो. ते भारताचे पंतप्रधान बनण्याचा प्रयत्न करत होते, जेव्हा त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत, तेव्हा भारताच्या विभाजनानंतर त्यांनी पाकिस्तानची स्थापना केली.

त्यावेळी विद्यापीठाचे प्रवक्ते शफे किदवई यांनी जिना विद्यापीठाचे संस्थापक सदस्य होते आणि त्यांना विद्यार्थी संघटनेचे आजीवन सदस्यत्व देण्यात आले होते, असे सांगत जिनांच्या फोटोचा बचाव केला होता.

हे ही वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.