महाराष्ट्राशी आयुष्यभर भांडले पण आपल्या ऑफिस बाहेर उभारणाऱ्या पट्टेवाल्याला अंतर दिले नाही

महाराष्ट्राच्या राजकारणात जर कोणी व्हिलन म्हणून ओळखला जात असेल तर ते होते मोरारजीभाई देसाई. संयुक्त महाराष्ट्राला त्यांचा विरोध, सूर्य चंद्र असे पर्यंत वेगळा महाराष्ट्र होऊ देणार नाही अशा वलग्ना, आंदोलकांवर केलेला गोळीबार अशी अनेक पापं त्यांच्या खाती जमा आहेत.

गांधीवादी असूनही हेकेखोर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरारजी देसाईंबद्दल महाराष्ट्रात तरी चांगलं मत नाही.  

मोरारजी देसाई मूळचे गुजरात मधल्या सुरत जिल्ह्यातले. त्यांचं शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झालं. पुढे तत्कालीन मुंबई प्रांतात उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत गांधीजींच्या प्रेरणेने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला.  

 सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी झाले. त्याबद्दल पुढे तीन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. ते गुजरात काँग्रेस कमिटीचे चिटणीस झाले. मुंबई प्रांताचे गृह व महसूल मंत्री म्हणून काम केलं.  पुढे स्वातंत्र्यानंतर ते मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री झाले. या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी मराठी जनतेवर अत्याचार केले असले तरी राज्यात प्रथमच जमीनमहसुलाबाबत काही सुधारणा केल्या व मुंबई प्रांताची प्रशासनव्यवस्था अत्यंत कार्यक्षम केली.

मुंबई प्रांताचा कारभार तेव्हा जुन्या सचिवालयातून चालायचा.

मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या ऑफिस बाहेर एक पट्टेवाला असायचा. नुकताच तो नोकरीला लागला होता. मोरारजी देसाई कितीही हट्टी व हेकेखोर असले तरी आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात आस्था असायची. कितीही छोटा कर्मचारी असला तरी त्याची विचारपूस करणे हे मोरारजी देसाई हे आपले आद्य कर्तव्य मानायचे. गरीब कुटूंबातून आलेल्या, शांत स्वभावाच्या त्या पट्टेवाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना विशेष सहानुभूती होती.

पुढे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तीव्र झाली आणि मराठी जनतेचा असंतोष शांत करण्यासाठी पंतप्रधान नेहरूंनी मोरारजी देसाईंना मुख्यमंत्रीपदावरून हटवले आणि केंद्रात अर्थमंत्री बनवले. मोरारजींच्या जागी यशवंतराव चव्हाण आले.

कालांतराने यशवंतराव चव्हाण व करोडो मराठी जणांच्या प्रयत्नामुळे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. स्वतः नेहरूंनी वेगळ्या राज्याचा मंगल कलश मुख्यमंत्र्यांच्या स्वाधीन केला. पुढे १९६२ च्या चीन युद्धानंतर यशवंतराव चव्हाण यांना नेहरूंनी देशाच्या संरक्षण पदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी दिल्लीला बोलावून घेतलं.

पुढे जेव्हा नेहरूंचा मृत्यू झाला तेव्हापासूनच मोरारजी देसाई यांचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत गाजू लागलं. लालबहादूर शास्त्री व इंदिरा गांधी यांच्यामुळे त्यांची प्रधानमंत्री बनण्याची संधी दोन वेळा हुकली. पण इंदिरा गांधींनी त्यांना उपपंतप्रधान बनवलं होतं. मोरारजी देसाई यांची भांडवलशाहीला धार्जिणी विचारसरणी आणि इंदिरा गांधींचा समाजवादी दृष्टिकोन यामुळे त्याकन्हायत संघर्ष होऊ लागला.

अखेर मोरारजी देसाई सरकार मधून बाहेर पडले. त्यांनी काँग्रेसचा देखील राजीनामा दिला.

आपल्या सबंध आयुष्यात मोरारजीभाई पहिल्यांदाच सत्तेपासून दूर गेले होते. इतकी वर्षे देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश केला जायचा. मात्र एकदमच राजकारणाच्या अडगळीत ते जाऊन पोहचले. इंदिरा गांधींच्या विरोधातल्या ऑर्गनायझेशन काँग्रेसच नेतृत्व ते करायचे पण निवडणुकीत जनतेनं त्यांना साफ नाकारलं होतं.

साधारण १९७० चा हा काळ असेल. अचानक एकदिवस मोरारजींना एक साधं पोस्टकार्डावर लिहिलेलं पत्र  आलं. हे पत्र महाराष्ट्रातून आलं होतं. मोरारजींच्या स्वीय सचिवाने ते वाचले व ते विशेष महत्वाचे नाही असे समजून त्यांच्या टेबलवर ठेवून दिल. जेव्हा मोरारजींना इतर कागदपत्रे पाहताना ते मराठीत लिहिलेलं पोस्टकार्ड नजरेस पडलं. मोरारजींनी ते वाचलं.

हे पत्र ते जेव्हा मुंबईत मुख्यमंत्री असताना सचिवालयात त्यांचा पट्टेवाला होता त्या व्यक्तीने लिहिलं होतं. मी आता निवृत्त झालो असून गावी परतत असल्याबद्दल आणि आपल्या सोबत काम करायची संधी मिळाली या बद्दल कृतज्ञ आहे अशा आशयाचं ते पत्र होतं.

हे पत्र वाचून कठोर हृदयाचे मोरारजीभाई काही क्षणांसाठी भावनिक झाले. त्यांनी लगेच तिथून मुंबईत वर्षा बंगल्यावर फोन लावला. त्यावेळी वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते.

मोरारजींनी त्यांना फोनवरूनच त्या पट्टेवाल्या बद्दल माहिती दिली आणि शक्य ती मदत त्याला पोहचवण्याची विनंती केली.

खरं तर मोरारजी देसाई हे काँग्रेस मधून बाहेर पडले होते. महाराष्ट्राचे विरोधक म्हणून ओळखले जाणारे मोरारजी आता सत्तेत देखील नव्हते. त्यांनी सांगितलेलं काम करणं वसंतराव नाईक यांना अनिवार्य नव्हतं. तरी त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्या पट्टेवाल्याचा जिल्हा कोणता याची माहिती घेऊन त्याला मदत पाठ्वण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.

अनेक प्रयत्नांतून त्या पट्टेवाल्याला शोधून काढण्यात आले. निवृत्तीनंतर हलाखीचं आयुष्य जगणाऱ्या या कर्मचाऱ्याला शासनातर्फे त्या गावात जागा घेऊन देण्यात आली इतकंच नव्हे तर त्याला एक छोटस घर देखील बांधून देण्यात आलं.

हे त्याकाळच राजकारण होतं. सत्ता गेल्यावरही आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांची आठवण ठेवणारे मोरारजी देसाई आणि विरोधक असूनही त्यांचा शब्द न पडू देणारे वसंतराव नाईक. असे पुढारी आता शोधूनही सापडणार नाहीत.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.