उपपंतप्रधानाची गाडी अडवली आणि शिवसेना नावाच्या वादळाची ओळख संपूर्ण देशाला झाली…

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबमध्ये रोखण्यात आला. ज्यांनंतर देशभरात एकच खळबळ उडाली. पंजाबमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेला संबोधित करण्यासाठी आणि शाहिद स्मारकाच्या विकास कामांच्या उद्घटनासाठी पंतप्रधान फिरोझपूरच्या दिशेने चालले होते.

मात्र या दरम्यान काही आंदोलक शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या मार्गावर आंदोलन सुरु केलं. ज्यामुळे त्यांना आपला दौऱ्या मागे फिरवावा लागला. पण या घटनेनंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये चांगलाचं वाद पेटलाय. भाजपची मंडळी म्हणतायेत पंजाब सरकारने हे मुद्दाम केलंय तर काँग्रेसची मंडळाची म्हणतायेत आपली नामुष्की टाळण्यासाठी केंद्र सरकारने सुरक्षेचं कारण दिलंय. 

आता हे वाद विवाद होतंच राहतील पण या घटनेवरून दादरमध्ये घडलेली घटना पुन्हा चर्चेत झालीये.

शिवसेनेच्या वाटचालीतल्या पहिलीवहिली रक्तरंजित दंगल.  जी दादरमध्ये सुरू झाली होती आणि त्याचं मूळ होत, महाराष्ट्र कर्नाटक म्हणजे तेव्हाच्या म्हैसूर राज्याच्या  सीमा प्रश्नावर सेनेनं आंदोलन उभारण्यासंबंधात दिलेला इशारा. पण प्रत्यक्षात आंदोलन सुरू होण्यापूर्वीच हिंसाचार सुरू झाला होता आणि दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील रहिवाशांना चार दिवस रस्त्यावर येणं कठीण होऊन बसलं होतं. 

शिवसेनेच्या इतिहासातल्या या पहिल्याच दंगलीत किमान ५९ माणसं मृत्युमुखी पडली होती. संघटनेच्या ४६ वर्षांच्या वाटचालीत ठाकरे यांना फक्त एकदाच गजाआड जावं लागलं, तेही याच वेळी, ठाकरेंना  अटक झाल्यावर संतप्त शिवसैनिकांनी दादरसह अवधी मध्य मुंबई पेटवून देण्याचं ठरवलं आणि आगडोंब उसळला. हिंसाचारानं थैमान गाठलं. त्याचा फटका सामान्य मुंबईकरांनाही अर्थात बसलाच.

दादरचा तो दंगा सुरू झाला, त्या दिवशी वार होता शुक्रवार आणि तारीख होती ७ फेब्रुवारी १९६९.

शुक्रवार ७ फेब्रुवारी १९६९ चा दिवस, दादरकरांच्या दृष्टीन वर्षातल्या अन्य ३६४ दिवसासारखाच उजाडला होता. सकाळी कामावर गेलेले नोकरदार संध्याकाळी रोजच्या वेळेला घरी परतले होते. शाळा-कॉलेज आटोपल्यावर संध्याकाळी नाक्या नाक्यावर जमणारे तरुण, पार्कवर नित्यनेमाने एकत्र येणारे पेन्शनर आणि प्रेमी युगुल नेहमीप्रमाणे ‘टाईमपास’ करून मार्गी लागली होती. मध्यमवर्गीय गृहिणी आणि बायाबापड्या उद्याची भाजी घेऊन आल्या होत्या…

आणि अशा वेळी सांताक्रूझ विमानतळावरून, तत्कालीन उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांना घेऊन येणारी एक व्ही. आय.पी. कार, आगे-मागे पोलिसांच्या गाड्यांचा ताफा घेऊन माहीमच्या नाक्यावरून सुसाट वेगाने दादरच्या दिशेने निघाली होती. बड्या राजकारणी मंडळींना रोजच्या रोज मलबार हिलच्या दिशेने घेऊन जाणारा तो रस्ता त्या सायंकाळी जरा अस्वस्थच होता. कारण माहीमच्या नाक्यावर मोरारजींच्या गाडीपुढे सत्याग्रह करण्यात येईल आणि तिथं उपपंतप्रधानांची गाडी अडवून त्यांना शिवसेनेच्या नेत्यांतर्फे एक निवेदन सादर करण्यात येईल, असं आधीच जाहीर झालं होतं.

खरं तर त्याआधी नोव्हेंबर १९६८ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी बेळगावची वारी केली. तिथं त्यांचं चांगलं स्वागतही झालं होतं. दुसऱ्याच दिवशी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेत बोलताना ठाकरे यांनी, सीमाप्रश्न ठराविक मुदतीत न सुटल्यास पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, म्हैसूरचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष यांना मुंबईत ‘प्रवेशबंदी’ जाहीर केली. 

२९ डिसेंबर १९६८ रोजी कामगार मैदानावर झालेल्या एका सभेत बोलताना त्यांनी, ही ‘बंदी’ आपण २६ जानेवारी १९६९ पासून लागू करणार असल्याचंही स्पष्टपणे सांगून टाकलं. परिणामांची भीती न बाळगता शिवसेना आपली धमकी पुरी करेल, अशी ठाकरे यांची भाषा होती. बाळासाहेबांनी सीमाप्रश्न सोडवण्यासाठी घालून दिलेली प्रजासत्ताक दिनाची मुदत संपली. त्यामुळे ३० जानेवारी १९६९ रोजीच, मुंबई पोलिसांच्या मदतीला राज्याच पोलिस दल तैनात करण्याचा निर्णय वसंतराव नाईकांच्या काँग्रेस सरकारने तातडीन घेतला.

उपपंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या ७ फेब्रुवारी १९६९ रोजी मुंबईत होऊ घातले. आगमनासाठी ही  पार्श्वभूमी तर अगदी शिवसेनेला हवी अशीच झालेली होती. शिवाय, मोरारजीभाई हे संयुक्त आंदोलनाच्या काळातील मराठी भाषकांचे अगदी ‘लाडके’ असेच नेते होते. योग मोठा जुळून आला होता आणि मोरारजींच्या मुंबईतल्या आगमनाच्या दिवशी सकाळी ठाकरे यांनी पोलिस आयुक्त इमॅन्युएल मोडक यांची भेट घेऊन ‘आमचं आंदोलन शांततापूर्ण असेल, अशी ग्वाही दिली होती.

दादरच्या सगळ्या रहिवाशांच्या दृष्टीनं शिवसेनेने सुरू केलेल्या आंदोलनाचा तो एक भाग होता; पण पोलिस आयुक्त मोडक मात्र, प्रत्यक्षात नेमकं काय होईल या काळजीने चिंतातूर होते. विमानतळावरून मोरारजीभाईंना घेऊन गाडी निघाली, तेव्हा त्या गाडीत स्वत:ही बसण्याचा निर्णय मोडक यांनी घेतला होता, तो त्यामुळेच. उपपंतप्रधानांच्या मोटारींचा ताफा माहीम नाक्याजवळ आला आणि घडू नये ते घडलं.

अचानक तुफानी दगडफेक सुरू झाली. पोलिस आयुक्तांची स्वतःची वेगळी गाडी या ताफ्यात होतीच. तिची पुढची काच फुटली.

बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणावर उभे असलेले पोलिस हे अर्थातच या दगडफेकीचं लक्ष्य होतं. त्यांच्यापैकी काही जण या दगडफेकीत जखमीही झाले. अशा वेळी आधी ठरल्याप्रमाणे शिवसेनेचं निवेदन स्वीकारण्यासाठी गाडी थांबवणं अशक्य होतं. उलट गाडीचा वेग वाढवून, मोरारजींना शक्य लवकर सुरक्षित स्थळी नेण्याचा निर्णय त्या क्षणी मोटारचालकाने घेतला. त्याने गाडी जरा बाजूने पुढे काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या वेळच्या गदारोळात किमान चार शिवसैनिक जखमी झाले.

ठिणगी पडली होती… आणि ‘दादरचा दंगा’ सुरू झाला होता.

लेडी जमशेटजी रोडवर शिवसैनिक फार मोठ्या प्रमाणावर जमा झाले आहेत, असं मोटारीतल्या वायरलेसवरून कळल्याने मार्ग बदलण्यात आला आणि प्रभादेवीच्या दिशेने गाडी निघाली. तिथं तर या गाडीवर दगड-विटा आणि अॅसिड बल्ब यांचा मारा झाला. प्रभादेवीहून मोरारजींना कसंबसं पुढे काढण्यात आलं; पण इकडे दादरमध्ये दंगल रीतसर सुरू झाली होती. 

लुटालूट, दगडफेक आणि जाळपोळ यांना ऊत आला होता. लोक बेभान बनले होते. दगडफेकीत रस्त्यावरचे अनेक दिवेही फुटले. दादरमध्ये अंधाराचं साम्राज्य पसरलं. उजेड होता तो फक्त दोन बसगाड्यांना आणि एका ‘मिल्कबूथ’ला लावलेल्या आगीचा. कॅडेल रोड, लेडी जमशेटजी रोड आणि रानडे रोड येथील पोलिस चौक्याही पेटवून देण्यात आल्या होत्या.

वातावरण पेटलं होतं. पोलिसांनी जिवाच्या आकांताने लाठीहल्ला सुरू केला. रस्त्यारस्त्यावर एकच पळापळ. जमाव दादर स्टेशनात घुसतो. तिथलं घड्याळ आणि चहा-कॉफीचे स्टॉल यांचीही मोडतोड. पोलिसांच्या लाठीमाराचा जोर जरा कमी झाल्यावर, जमाव मोठ्या संख्येने सेनापती बापटांच्या पुतळ्याजवळील ‘मार्मिक’ कचेरीपाशी गोळा होतो. 

दुसऱ्या दिवशीच्या एका वृत्तसंस्थेचा हवाला देऊन सांगायचं झालं तर, तिथं किमान दहा हजार लोक जमलेले होते. पोलिस आयुक्तांनी मोरारजींची गाडी थांबविण्याचं सकाळीच मान्य केलं होतं; पण ऐन वेळी त्यांनी शब्द फिरवला आणि निवेदन स्वीकारलही नाही. उलट शिवसैनिकांचं रक्त सांडलं आहे. त्याचा रक्तानेच घेतला जाईल’, असा स्पष्ट आणि रोखठोक इशारा त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांनी दिला. 

बाळासाहेब ठाकरे या नावाचं वजन त्या निमित्ताने संपूर्ण देशाला अनुभवयाला मिळालं. उपपंतप्रधान असलेल्या मोरारजींची गाडी रोखली आणि त्यानंतर अख्खी मुंबई त्यांनी हादरवून सोडली. शिवसेना नावाच्या वादळाची हि सुरवात होती.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.