दर तर वाढलेतच पण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी आणखी अडचणीत आलीय.

ऐन दिवाळीत सगळंच महाग होतयं राव. आता दर वाढलेत म्हणजे कशाकशाचे तर पेट्रोल डिझेल पासून तेलामिठापर्यंत सगळ्यांचेच दर वाढलेत. त्यात आणि पेट्रोल डिझेलच्या दरात झालेली भरमसाट दरवाढ, टायरसह सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटीच्या तिजोरीवर पडलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी महामंडळाने अखेर कालपासून भाडेवाढ लागू केली आहे.

म्हणजे यावर्षी दिवाळीत मामाच्या गावाला जायचा प्रवास महागलायं.

महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला.या भाडेवाढीमुळे एसटीचा प्रवास किमान पाच रुपयांनी वाढला आहे. परिणामी राज्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे.

चला आता दिवाळी आहे म्हंटल्यावर जनता हा भार पण सोसेल. पण आता तर वेगळाच प्रश्न पेटलाय. एसटी आगारातून एश्टया सुटल्याच नाहीत तर….??? कारण एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूय. 

अचानक संप का ?

आर्थिक समस्या व अन्य कारणांमुळे करोनाकाळात एसटीच्या २५ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पगार वेळेवर मिळावा यासाठी कामगार संघटना औद्योगिक न्यायालयात गेल्यानंतर दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेला नियमित वेतन देण्याचे आदेश असताही ते होत नाही. वेतन वेळेवर मिळावे याशिवाय २८ टक्के महागाई भत्ता देणे यासह अन्य मागण्या नुकत्याच एसटीतील सर्व कामगार संघटनांच्या कृती समितीने एसटी महामंडळाला दिल्या होत्या.

एसटी महामंडळाने महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ करण्याची घोषणा केली. त्यामुळे १२ टक्के वरुन हा भत्ता १७ टक्के पोहोचेल, अस महामंडळाने स्पष्ट केल. तर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पगार  ७ नोव्हेंबरऐवजी १ नोव्हेंबरला आणि कर्मचाऱ्यांना अडीच हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला.

परंतु महागाई भत्तात पाच टक्के वाढ केल्याने फक्त ५०० ते ६०० रुपयांचीच तुटपुंजी वाढ होत असल्याचे मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे मत आहे. शिवाय अन्य भत्तेही दिले नसून काही महत्त्वाच्या मागण्यांवर विचारही झालेला नाही. यामुळेच तीव्र नाराजी व्यक्त करत एसटीच्या सर्व कामगार संघटनांनी बुधवार, २७ ऑक्टोबरपासून राज्यात बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय.

मागण्या काय आहेत कर्मचाऱ्यांच्या ?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा, वाढीव घरभाडे मिळावे, पंधरा हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा.

आता संप आहे त्यावर एसटी महामंडळाच काय मत आहे ?

संपात मोठय़ा संख्येने कामगार वर्ग सामिल होणार असल्याने एसटीची सेवा कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संपात भाग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तवणुकीचा ठपका ठेवून शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असं परिपत्रकच एसटी महामंडळाने काढलयं. पण कर्मचारी पण बेमुदत संपावर ठाम आहेत.

आता इतक्या वर्षात काडेपेटीनेच तेवढाच काय तो दिलासा दिला होता. आता त्याचे पण दर वाढलेत.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.