बघतुयस काय रागानं, कोरोना काळात १३,२३३ कोटींचा नफा काढलाय वाघानं !!! 

कोरोनाकाळात भल्या भल्यांचे धंदे बंद झालेत. मी मी म्हणणारे गप्पगार झालेत. गेला बाजार फक्त मास्क आणि सॅनिटायझरच्याच धंद्यात पैसे कमवता आले असतील. अशा अंदाजात आम्ही होतो.

पण झालं अस की, एक बातमी वाचण्यात आली आणि फ्यूजा उडाल्या. 

म्हणजे भारतात काही ठरावीक माणसं अशी आहेत ज्यांना कधीही तोटा होत नाही. त्यातलाच एक माणूस म्हणजे अंबानी. छोटे नाही वो मोठे. छोटे अंबानी करोना काळाच्या अगोदरच घर जाळून कोळशाचा व्यापार करून बसलेत.

आपण बोलतोय ते मोठ्या अंबानीं काकांबद्दल. 

तर रिलायंस इंडस्ट्रीची गेल्या तिमाहीची आकडेवारी बाहेर आली. कोरोना काळ, त्यात आंतराराष्ट्रीय स्तरावर क्रुड ऑईलचा कोसळलेला भाव, रिफाइनिंग मार्जिन मध्ये झालेली कमतरता या सगळ्या पार्श्वभूमीवर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीने नफ्यामध्ये ३१ % ची भरघोस वाढ केलेली आहे.

आत्ता मुकेश शेठ यांनी कशात नेमकं मार्केट मारलं हे पाहुया. 

मुकेश शेठ यांना सर्वाधिक फायदा देणारी कंपनी ठरली रिलायन्स जिओ. गेल्या तिमाहीत रिलायन्स जिओच्या नफ्यात तब्बल १८२ टक्यांनी वाढ झाली आहे. २५२० कोटी रुपये इतका नफा या काळात झाला.

मागच्या वर्षीची आकडेवारी सांगायची झाली तर मागच्या वर्षीच्या तिमाहीत रिलायंन्स जिओचा नफा ८९१ कोटी इतका झालेला. जिओ ऑपरेशंसचे उत्पादन ३३ टक्यांनी वाढून ते १६,५५७ कोटी झालं आहे. एबिटा मध्ये ५५.४० टक्के चढ पहायला मिळाली आहे. 

आत्ता जिओ सोडून दूसऱ्या कंपन्या देखील फायद्यात राहिल्याच आहेत पण इथं पण अंबानीच्या दृष्टीकोनातून रडण्यासारखी गोष्ट झाली आहे. 

म्हणजे काय जो अंदाज होता किंवा जे टार्गेट होतं ते कंपनीला गाठता आलं नाही. 

म्हणजे मागच्या वेळी झालेल्या एकूण नफ्यात यावेळी ४४ टक्क्यांची कमतरता आली आहे. मागच्या वेळी याच तिमाहीत काकांनी ८८,२५३ कोटी रुपये मिळवले होते. यावेळीचा अंदाज होता की कंपनी एकूण १.०३ लाख कोटी रुपये कमावू शकेल पण इथे काकांच टार्गेट पूर्ण झालं नाही. 

दूसरी गोष्ट कंपनीचं ऑपरेटिंग प्रॉफिट २१ टक्यांवरून १६,८७५ कोटींवर आलं आहे. 

आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही ऑईल कंपनीसाठी महत्वाचं असतं ते म्हणजे ऑईल रिफायनिंग मार्जिन ते सुद्धा ढासळून ३.६ डॉलर प्रती बॅरल इतकं कमी आलं आहे. 

तुलनात्मकदृष्ट्या बघता काकांना तोटाच झाला आहे. काका लय कमवणार होते पण काकांनी कोरोनाकाळात फक्त १३, २३३ कोटींचाच फायदा काढला. 

आत्ता आम्हाला कळणा सगळं बंद पडत असताना या माणसाने १३ हजार कोटींचा फायदा मिळवला म्हणून अभिनंदन करायचं की ठरलेलं टार्गेट मिळवता आलं नाही म्हणून दुखा:त बसायचं. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.