मुंबई पोलिसांना दिवाळी भेट रूपये ७५०, त्यातही अटी व शर्ती लागू!

ट्रॅफिक झालंय, सेलिब्रेटीच्या पोरानं कांड केलंय, उत्सव असेल किंवा लॉकडाऊनमधला बंदोबस्त प्रत्येकवेळी सगळ्यात आधी आठवणारी व्यक्ती कोण असेल, तर पोलिस. पण प्रत्येक सणात, प्रत्येक ऋतूत रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभ्या असणाऱ्या पोलिसांनाही घर आहे, कुटुंब आहे आणि त्यांनाही सण आहेत.

दिवाळी म्हणल्यावर सुट्टी आणि भेट या दोन गोष्टींची अपेक्षा प्रत्येकाला असते. सुट्टी हा विषय पोलिसांसाठी उंबराचं फुल दिसावं तितका दुर्मिळ आहे. पण भेट तर मिळायला पाहिजे की!

मुंबई पोलिसांना यावर्षी दिवाळीची भेट मिळालीये ७५० रूपयांची.

बरं हे ७५० रुपये रोख मिळत असते, तर गोष्ट वेगळी. घरी फटाके घेऊन जाता आलं असतं, कपडे नेले असते, गेलाबाजार बायका-पोरांना हॉटेलात तरी नेलं असतं.

पण भिडू विषय तसा नाहीये.

पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या सहीसह निघालेल्या पत्रात असं नमूद केलंय की, मुंबई पोलिसांना दिवाळी भेटीच्या निमित्ताने सबसिडी कँटिनमधून त्याच्या नावे असलेल्या डेबिट व क्रेडिट कार्डवर ७५० रूपये (प्रति कर्मचारी) इतक्या रकमेची खरेदी विनामूल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांसाठी असलेल्या पोलीस कल्याण निधीतून दिली जाणार आहे.

पोलिसांच्या दिवाळी भेटीबाबतचे पत्र
पोलिसांच्या दिवाळी भेटीबाबतचे पत्र

समजा ही खरेदी ७५० रूपयांच्या वर गेली, तर तो खर्च पोलिसांना आपल्या खिशातून द्यावा लागणार आहे. त्यामुळं ही ७५० रूपयांची भेट पोलिसांना कितीशी पुरणार हे सरकारलाच माहीत.

आणखी एक महत्त्वाची माहिती सांगतो भिडू-

कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये मुंबई पोलिसांमधल्या शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावलेत.

एका बाजूला बेस्ट कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांचा बोनस मिळालाय. एसटी कर्मचाऱ्यांचा उपजिविकेच्या प्रश्नावर २५०० रूपयांची फुंकर घातली गेलिये. दुसऱ्या बाजूला आधीच तुटपुंजा पगार असणाऱ्या पोलिसांना ७५० रुपयांच्या भेटीवर समाधान मानावं लागणार आहे.

दिवाळीचा फराळ, फटाके, अभ्यंगस्नान यातल्या कितीशा गोष्टी पोलिसांना अनुभवायला मिळत असतील? माहीत नाही. पण निदान सणाच्या वेळी घरी आणि खिशात पुरेसे पैसे असले की मनाला मिळणाऱ्या समाधानापासूनही मुंबई पोलिस यावेळी दूरच राहतील.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.