मुंबईत देशातली पहिली AC डबलडेकर बस सुरू : असा आहे डबलडेकरचा गौरवशाली इतिहास

मुंबईच्या बेस्टच्या ताफ्यात आज २ इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल झाल्या. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी, ‘५० बसेस पैकी २ बस दाखल झाल्या आणि लवकरच आणखी बस मुंबईत येतील’ असं ट्विटही केलं. प्रवास सोपा होईल, प्रदूषण होणार नाही यासोबतच या डबलडेकर बसेसचं आणखी एक महत्त्व म्हणजे, त्यांचा गौरवशाली इतिहास.

मुंबईतील डबल डेकर बस ब्रिटिश कालखंडाचं प्रतिबिंब होती. पण पहिली डबल डेकर बस हा ब्रिटिशांचा शोध नव्हता. 

१८२८ मध्ये पॅरिसमधील एका फ्रेंच माणसाने त्याची रचना केली होती आणि ती घोड्याच्या सहाय्याने चालवली जायची. लंडनवासीयांनी लवकरच त्याचा पाठपुरावा करत १८२९ मध्ये ती लंडनमध्ये आणली. सार्वजनिक मालकीच्या आणि घोड्याच्या साहाय्याने धावणाऱ्या या बसमध्ये २२ प्रवासी बसू शकत होते.

यानंतर मोटारच्या साहाय्याने चालणारी डबल डेकर बस आली ती पहिल्या महायुद्धानंतर, १९२३ मध्ये.

या बस चालवणाऱ्या अनेक कंपन्या होत्या. त्या लहान आणि अरुंद डबल-डेकर बसेस वापरायच्या कारण त्यात एकाचवेळी जास्त लोकांना घेऊन जाता येत होतं आणि वळणाच्या, अरुंद रस्त्यावरही त्या खूप सोयीस्कर ठरायचा. पण या सगळ्या खाजगी कंपन्यांमध्ये ‘लंडन जनरल ऑम्निबस कंपनी’ ही एकमेव कंपनी होती जिने सर्वप्रथम त्यांच्या बसेसला लाल रंग दिला. याचा उद्देश म्हणजे त्यांच्या बसेसला स्पर्धेत वेगळं स्थान मिळवता आलं.

भारतात डबल डेकर बस सर्वप्रथम कुठे दाखल झाली?

या मुद्यावरून तिरुवनंतपुरम आणि मुंबईमध्ये जरा वाद आहे.  तिरुवनंतपुरम म्हणते की त्यांच्याकडे सर्वप्रथम १९३८ मध्ये ही बस आली. तर मुंबईचा दावा आहे की, त्यांच्याकडे १९३७ मध्येच बस आली होती.

तिरुवनंतपुरममध्ये तत्कालीन शासक, राजा चिथिरा थिरुनल बलराम वर्मा यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार १९३७ मध्ये या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून ‘ईजी साल्टर’ यांना नियुक्त केलं गेलं.  २० फेब्रुवारी १९३८ रोजी तिरुवनंतपुरममध्ये पहिल्या डबल डेकर बसचं उद्घाटन झालं. साल्टर यांनी स्वतः राजा आणि त्यांच्या कुटुंबासमवेत बस चालवली.

मात्र मुंबईत शहराची मोठी लोकसंख्या असल्याने डबल डेकर बसची लोकप्रियता झपाट्याने वाढत गेली. त्यातही सर्वात जास्त लोकप्रिय मॉडेल म्हणजे ‘फ्रंट-इंजिन्ड रूटमास्टर’. हे मॉडेल १९५४ मध्ये विकसित करण्यात आलं होतं. या बसचा दुसरा मजला खुला असल्याने अनेकांना यात बसण्यात वेगळीच मज्जा यायची. या मॉडेलनंतरचं अजून एक अविस्मरणीय मॉडेल म्हणजे ‘बेन्डी बस’.

मग हळूहळू भारतातील इतर शहरांमध्ये डबल-डेकर बसेस सुरू करण्यात आल्या. यामध्ये  तिरुवनंतपुरम, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू अशा शहरांचा समावेश होता. पण फक्त मुंबईतील बस लाल रंगाच्या आहेत.

नंतरच्या काळात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगचा परिवहन विभाग बर्‍याच काळापासून तोट्यात चालत होता आणि विशेषतः डबल डेकर बस चालवणं फायदेशीर ठरत नव्हतं. ऑपरेशनल आणि देखभाल खर्च आवाक्याबाहेर जात असल्यामुळे या डबल डेकर बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हळूहळू या बस मुंबईच्या रस्त्यावरून नाहीशा होत गेल्या.

मात्र आता या नवीन निर्णयाने पुन्हा एकदा मुंबईच्या इतिहासातील हे चंदेरी दिवस परतणार आहेत. सरकारच्या योजनेनुसार एकूण ९०० इलेक्ट्रिक डबलडेकर बस बेस्टच्या ताफ्यात जमा होणार आहेत.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.