पटनाच्या डबल डेकर ट्रेनची एवढी चर्चा होतेय पण ही काय पहिलीचं ट्रेन नाही
बस आणि रेल्वेचा प्रवास म्हंटल कि, आम्ही लहानपणी २ दिवस आधीच बॅगा भरून तयार असायचो, शेवटी प्रवास म्हंटल कि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न ओ… पण त्यातल्या त्यात डबल डेकर म्हंटल ना कि वेगळंच कुतूहल वाटायचं. म्हणजे आपलं सांगायचं झालं ना भिडू तर लहानपणी पिक्चरमध्ये त्या डबर डेकर बस पहिल्या कि लय आनंद व्हायचा. कधी आपण पण त्या डबर डेकरमधून फिरतो असं व्हायचं, त्या बसबद्दल प्रश्न सुद्धा भन्नाट पडायचे.
असो… पण आता पुन्हा एकदा डबल डेकरचा विषय चर्चेत आलाय, पण बसचा नाही तर रेल्वेचा. कारण कधी नव्हे तर बिहार सारख्या मागासलेल्या राज्यामध्ये डबल डेकर रेल्वे धावणार आहे. आता तुम्ही म्हणाला त्यात एवढं इंटरेस्टिंग काय आहे.
तर सध्या जगभरात वेगाने विकास करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचं नाव आघाडीवर घेतलं जातं. मग हा विकास अंतर्गत स्तरावर असो किंवा आंतराष्ट्रीय. देशात मेट्रो शहरांची संख्या सुद्धा वाढायला लागलीये. पण एक कटू सत्य सांगायचं झालं तर हा विकास जास्त करून पश्चिम आणि उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. दक्षिण भारतात सुद्धा असचं काहीस चित्र आहे.
पण या सगळ्यांपेक्षा पूर्व भारतातल्या राज्यांच्या विकास मंदावलेल्या अवस्थेत आहे. महत्वाचं म्हणजे त्यांची ही स्थिती आधी पासूनच आहे. त्यामुळे बऱ्याचदा असंही ऐकायला मिळतं कि, दिल्लीतली मंडळी या राज्यांकडे दुर्लक्ष करत आलीत.
पण आता मोदी सरकार या राज्यांमधल्या सुविधांवर भर देत आहे. आता अंदरकी बात सगळ्यांनाच माहितेय. पण तरी विकास होतोय हे महत्वाचं… तर या राज्यांच्या विकासाचं पाहिलं पाऊल म्हणजे तिथली वाहतूक सुविधा. याच प्रयत्नातून बिहारमधील गया, राजेंद्र नगर टर्मिनल, मुझफ्फरपूर, बेगुसराय, सीतामढी, दरभंगा आणि बरौनी रेल्वे स्थानकांना जागतिक दर्जाची बनवण्याची कसरत सुरू झालीये. पण यासोबतच येत्या वर्षभरात पटनामधून डबल डेकर ट्रेन सुद्धा सुरु केली जाणार असल्याचं समजतंय.
केंद्र सरकारच्या या योजनेवर वेगाने काम सुरू आहे. सध्या ही ट्रेन लखनऊ ते नवी दिल्ली आणि नवी दिल्ली ते जयपूर दरम्यान चालवली जातेय. पण, लवकरच ही डबल डेकर दिल्ली ते पटणा, दिल्ली ते हावडा मार्गे बिहार आणि आणखी बऱ्याच रेल्वे विभागांवर चालवली जाणार आहे.
आता वेळेच्या दृष्टीने पाहिलं तर लखनऊ ते आनंद विहार टर्मिनलपर्यंत डबल डेकर ट्रेनला ८ तास लागतात, तर तेजस आणि शताब्दी एक्स्प्रेस लखनऊहून दिल्लीला ६.३० तासांत पोहोचतात. पण जर भाड्याच्या दृष्टीने पाहिलं तर ही डबलडेकर ट्रेन जास्त किफायतशीर ठरणार आहे. तर या डबल डेकर ट्रेनच भाडं शताब्दी आणि तेजस एक्स्प्रेसपेक्षा कमीच असणार आहे.
आता सध्या जरी या डबल डेकर ट्रेनची जास्तचं चर्चा होत असली तरी सुद्धा या डबल डेकर ट्रेनला सुरुवात झालीये २०११ साली. रेल्वे प्रवासाला आणखी प्रोत्साहन मिळावं या हेतूने हावडा-धनबाद दरम्यान देशातील पहिली डबल डेकर ट्रेन धावली.
रेल्वे विभागाच्या या नव्या कन्सेप्टला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यात बाकीच्या हाय-फाय रेल्वे पेक्षा या ट्रेनच भाडं कमी होत म्हणून प्रवाशांनी याला पहिली पसंती दाखवली. पण महत्वाचं म्हणजे यामुळे रेल्वे विभागला डबल फायदा झाला. म्हणजे तेवढ्याच डब्यात डबल प्रवासी त्यामुळे भाड्यात फायदा झाला.
म्हणून पुढे जाऊन रेल्वे विभागाने आणखी डबल डेकर रेल्वे आणल्या. यात हमदाबाद-मुंबई, चेन्नई-बेंगळुरू, दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-लखनऊ या शहरांदरम्यान अशा अनेक गाड्या सुरु झाल्या. आणि या डबल डेकरने रेल्वे विभागाला डबल फायदा मिळवून दिला.
हे ही वाच भिडू :
- दोन वर्षांपूर्वी जाहिरात काढली पण परीक्षा घ्यायला रेल्वे विभाग तयारचं होत नाहीये
- असंही एक गाव जिथं सैनिक वर्गणी गोळा करून रेल्वे स्टेशन चालवतात…
- आमदारांना ढेकूण चावला म्हणून रेल्वेचा अख्खा डब्बाचं काढून टाकला