मुरारबाजींनी दिलेरखानाची जहागीर लाथाडली , “मी शिवरायांचा सच्चा शिपाई आहे”

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं मराठा साम्राज्य पार दिल्लीच्या तख्तापर्यंत जाऊन पोहोचलेलं. महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा सांगताना आजही अंगावर शहारे आल्याशीवावय राहत नाही. पण हे मराठा साम्राज्य तयार होताना अनेक वीर सरदारांचं रक्त सुद्धा सांडावं लागलं.

यातलेच एक वीर सरदार म्हणजे  म्हणजे मुरारबाजी देशपांडे. 

शिवाजी महाराजांनी जावळीचा मुलूख काबीज केला तेव्हा मुरारबाजी मोऱ्यांच्या बाजूने मोठ्या शौर्याने लढले. महाराजांना मुरारबाजींच्या युद्धकौशल्याचे विलक्षण कौतुक वाटले. पुढे मोऱ्यांचा पराभव झाल्यावर महाराजांनी त्यांना आपल्या पदरी ठेवून घेऊन त्यांना सरदारकी दिली.

 मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान जेव्हा प्रचंड फौजफाट्यासह दक्षिणेत मोहिमेस आले तेव्हा मुरारबाजी देशपांडे पुरंदर किल्ल्यावर नामजाद होते. दिलेरखानाने पुरंदरास वेढा घालून तो जिंकण्याचे सगळे प्रयत्न केले. अनेकवेळा राक्षसी हल्ले केले. पण मुरारबाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते सर्व हल्ले उधळून लावले. 

या दरम्यान दिलेरखानाने पुरंदरचा सफेद बुरुज सुरुंग लावून उडवून दिला. त्यात शेकडो मराठ्यांच्या चिंध्या झाल्या. पण तरीसुद्धा मराठे किंवा मुघल कोणीच मागे हटायला तयार नव्हते.

दिलेर जेवढ्या राक्षसी ताकदीने तुफानी हल्ले किल्ल्यावर चढवित होता, तेवढ्याच वीरश्रीने मराठे ते हल्ले अहोरात्र परतवून लावत होते. 

पण या हल्ल्यांचा सामना करता करता आणि दिलेरखानारा उत्तर देता देता किल्ल्यावरचा दारूगोळा आणि मनुष्यबळ झपाट्याने कमी होत होतं.  दिलेरखानाने वेढा घातल्यानं बाहेरून कुठून मदती मिळत नव्हती. पण दिलेरची ताकद मात्र वाढतच होती, कारण त्याच्यामागे मिर्झाराजे जयसिंग सगळं साहित्य घेऊन सज्ज होता. 

सफेद बुरुजावर मराठ्यांचे प्रचंड नुकसान झाले, तरीही मराठे काळ्या बुरुजाच्या रक्षणासाठी सिद्ध होते. ते प्रत्येक हल्लाला तितक्याच चोखपणे उत्तर देत होते. हा सगळं प्रकार पाहून दिलेर बुचकळ्यात पडला. लांब पल्ल्याच्या तीन महाभयंकर तोफा दिलेरने मोर्च्यात आणून पुरंदरच्या माचीवर भडीमार सुरू केला. त्यापुढे मराठ्यांचा टिकाव न लागून मराठे माची सोडून बालेकिल्ल्यात जाऊन मुघलांशी लढत राहिले. 

पुरंदरचा बराचसा भाग आता दिलेरच्या ताब्यात आल्याने त्याची छाती आणखीनच फुगली होती. त्याने पुरंदरच्या मुख्य दरवाजावरचं  हल्ला करायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं निवडक पाच हजाराची फौज सोडली. 

आणि त्याचवेळी मुरारबाजींनी सुद्धा दिलेरला पुरंदरच्या माचीवरून हुसकावून लावण्यासाठी एक धाडसी बेत आखला. अत्यंत निधड्या छातीचे कडवे ७०० लोक निवडून मुरारबाजीनी मुख्य दरवाजा उघडून मुघली फौजेची लांडगेतोड सुरू केली. मराठ्यांचा तो भयंकर आवेश पाहून मुघल मागे हटले, पण मुरारबाजी आणि मराठे संतापाने बेभान झाले होते. त्यांनी पठाणांना पुरंदरच्या माचीपर्यंत मागे रेटत नेले. 

मुरारबाजींचा आवेश पराक्रम पाहून दिलेरखानाने अक्षरश: तोंडात बोटचं घातली. लढाई थांबवून त्याने मुरारबाजींची स्तुती केली. ‘तू दिल्लीला चल, तुला मोठी जहागिरी मिळवून देतो’, म्हणून लालूचही दाखविली पण मुरारबाजीच्या तोंडाऐवजी तलवारीलाच पाणी सुटले.

 ‘मी शिवाजीराजाचा शिपाई आहे. तुझा कौल घेतो की काय’

असे म्हणून मुरारबाजी दिलेरच्या दिशेने दोन्ही हातातील तलवारी उगारून धावत सुटले. तेव्हा दिलेर हत्तीवर बसून तिरंदाजी करीत होता. त्याने मुरारबाजींच्या कंठाचा वेध घेऊन बाण सोडला आणि महाराजांचा प्यारा सरदार जमिनीवर कोसळला. 

मुरारबाजीच्या हौतात्म्याचे महाराजांना खूप दुःख झाले. मुरार पडला तरी मराठे पडले नव्हते. पुरंदर अद्यापी अजिंक्यच होता. गडावरील महार, रामोशी, कोळी लोकांनी उरलेल्या लोकांसह प्रतिकार चिवटपणे चालूच ठेवला. अखेर सन १६६५ मध्ये पुरंदरचा तह होऊन मराठ्यांना किल्ल्याचा ताबा सोडावा लागला. मुरारबाजीचा पराक्रम कथा, कादंबऱ्यातून, पोवाड्यातून अजरामर झाल्या.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.