पंढरपुर मंगळवेढ्याची शीट नेमकी कशी गेली..?

निवडणूकीचे निकाल हाती येत होते. साधारण ११ फेऱ्या पुर्ण झालेल्या. भाजपचे समाधान आवताडे तेव्हा दिड हजार मतांनी पुढे होते.

अशातच टिव्हीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आले. शेवटच्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे उमेदवार १५ ते २० हजार मतांनी विजयी होतील. महाविकास आघाडीचा आणि खासकरून राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हा कॉन्फीडन्स पराभव समोर दिसत असताना देखील कायम होता याला एकदा दाद देवून विषयाला हात घातला पाहीजे.

भारतनाना भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपुर मंगळवेढ्याची निवडणूक जाहीर झाली. भारतनाना भालके म्हणजे थेट विजयसिंह मोहिते पाटलांचा विजयरथ रोखलेला पैलवान. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलाला उमेदवारी देण्यात येणार हा समज अगदी त्यांच्या निधनाच्या बातमी दिवशीच फिक्स झाला होता.

पण राष्ट्रवादीने अखेर पर्यन्त उमेदवारी बद्दल संभ्रम कायम ठेवला. मध्येच पार्थ पवारांच नाव चर्चेत येवून गेलं. नाही हो म्हणतच भगिरथ भालकेंना उमेदवारी देण्यात आली. खुद्द अजित पवारांनी, जयंत पाटलांनी इथे एकामागोमाग सभा घेतल्या, वातावरण तापवलं

तरिही पराभव पत्करावा लागला. भारतनाना भालकेंचा दरारा पहाता, त्यांच्या निधनानंतर सहानभुतीची लाट पहाता भगिरथ भालके हे पाच-पन्नास हजार मतांच्या फरकांनी निवडणून येतील असा अंदाज लोक व्यक्त करत होते. कदाचित हाच अंदाज राष्ट्रवादीला नडला आणि पंढरपुर-मंगळवेढ्यात कमळ फुललं…

महाविकास आघाडीचं विशेषत: राष्ट्रवादी पक्षाचं कुठं चुकलं याचा घेतलेला हा आढावा.

१) सक्रिय राजकारणात नसणे

सक्रिय राजकारणात नसल्याचा फटका भगिरथ भालके यांना बसल्याचं लोक सांगतात. सक्रिय राजकारणात एखादा उमेदवार कितपत मुरलेला आहे हे पाहताना थेट तुलना केली जाते. म्हणजे भारतनाना इतके फिरायचे, इतक्या लोकांना ओळखायचे आणि तुमचं काय? असा प्रश्न लोकांकडून येणं साहजिक असतं.

इथे भगिरथ भालके पाठीमागे होते. याची जाणीव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पूर्वीपासूनच असल्याने हा मुद्दा चर्चेत येवूच नये म्हणून त्यांच्या भगिरथ भालके यांच्या मातोश्रींना उमेदवारी देण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. त्यावरून वेगवेगळे गट पडल्याचं सांगण्यात आलं. पण अखेर भगिरथ भालके यांच्या गळ्यातच उमेदवारीची माळ पडली.

भगिरथ यांच्या उमेदवारीवरूनच पक्षाच्या वेगवेगळ्या गटात वेगवेगळी भावना होती. अशा नाराज गटांची मनधरणी करण्याचं काम जयंत पाटील व अजित पवारांनी केल्याचं सांगण्यात येत होतं पण ते कितपण यशस्वी झालं याचं चित्र आपल्यासमोरच आहे.

२) परिचारक ठाम राहिल्याने कार्यक्रम गंडत गेला. 

अस सांगितलं जात होतं की भालके पंढरपुरातून लिड घेणार प्रश्न फक्त मंगळवेढ्याचा राहिल. त्यातही संजय मामा शिंदे यांनी वाखरी येथील आपल्या भाषणात, “माझं आणि प्रशांत मालकांच ठरलय” अस विधान करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

पण परिचारक गटाने पंढरपुरात टाईट फिल्डिंग लावल्याचं निवडणूकीच्या लिडवरून स्पष्ट झालं. परिचारक गटाने डबल गेम न करता समाधान आवताडेंना निवडणून आणायचच अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे निवडणूकीच्या बाहेर राहून देखील ते “किंगमेकर” ठरू शकले. समाधान आवताडे यांच्या विजयामागे ज्या मतांधिक्यांच पाठबळ राहिलं त्यामागे परिचारक गटाचा महत्वाचा रोल राहिल्याचं दिसून येतं.

दूसरीकडे Act OF God ची वाट बघत आवताडे आणि परिचारक गटात बिनसेल यांची वाट बघतच भालके गटाने दिवस काढले.

३) देवेंद्र फडणवीस, मोहिते पाटील गट, नाईक निंबाळकर व गोपीचंद पडळकर यांच्या भूमिका. 

देवेंद्र फडणवीस यांनी समाधान आवताडेंना उमेदवारी दिली. या उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवरून गटातटाचं राजकारण दूर करुन टाकलं. पक्षाने निरिक्षक म्हणून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे जबाबदारी दिली. दूसरीकडे मोहिते पाटील गट सक्रियपणे समाधान आवताडेंच्या मागे उतरला.

प्रत्येक व्यक्तींला आपल्या पराभवाचा वचपा काढायचा होता. साहजिक प्रत्येक गट त्वेषाने काम करत होता. दूसरीकडे मतदारसंघातील धनगर मतांच गणित मांडून गोपीचंद पडळकर यांना मैदानात उतरवण्यात आलं. जातीच्या गणितापासून ते प्रादेशिक गणितापर्यन्तची फिल्डिंग भाजपने लावली. उदाहरण सांगायचं झालं तर धनगर समाजातील तरूणांचा सत्ताधारी विशेषत: राष्ट्रवादीवर असणाऱ्या असंतोषाचा फायदा घेण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी अगदी शेलक्या शब्दाच अजित पवारांवर तोफ डागली होती.

४) महाविकास आघाडीचा फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त 

राज्यात सध्या वीजबिलावरून शेतकऱ्यांच्या असंतोष आहे. वीजबीलावरून शेतातील वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात रोष निर्माण झाला. याचा अचूक फायदा भाजपने घेतला. मात्र एकत्रित घेतलेल्या या निर्णयाचा मोठ्ठा फटका राष्ट्रवादीला सहन करावा लागला.

आत्ता तुमच्या शेतीचं वीज कनेक्शन तोडायला माणसं येणारं अस वातावरण निर्माण करण्यात भाजपला यश आलं.

४)  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची थकीत रक्कम

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक विठ्ठल सहकारी साखर कारखान्या भोवती कशी राहील याची विशेष काळजी विरोधकांकडून घेण्यात आली होती.

मार्च महिन्यात आर्थिक अडचणीमुळे कारखाना संचालक मंडळाला बंद ठेवावा लागला होता. दुसरीकडे कारखान्याने शेतकऱ्यांची सुमारे ५ कोटी ६९ लाख रुपयांची एफआरपी रक्कम दिलेली नाही.

यातील काही शेतकऱ्यांनी निवडणुकीदरम्यान कारखान्यासमोर आंदोलन केले होते. विरोधकांकडून या आंदोलनाचा वापर प्रचारावेळी करण्यात आला. तसेच कारखान्यातील कामगारांना गेल्या १ वर्षापासून वेतन देण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

५) ३५ गावाचा पाणी प्रश्न

पश्चिम महाराष्ट्रातील १३ अतिदुष्काळ तालुक्यामध्ये मंगळवेढाचा समावेश आहे. यातील ३५ गावात पिण्याच्या पाण्याची सोय सुद्धा नाही.

२००९ मध्ये पहिल्यांदा भारत भालके निवडून आल्यानंतर ३५ गावातील पाणी प्रश्नाबाबत आवाज उठवला होता. ५३० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता मिळाली होती. मात्र, आघाडीचे सरकार गेल्यानंतर युती सरकार मध्ये या प्रकल्पाला पुढे गती आली नाही. तसेच हा प्रश्न पुढे उच्च न्यायालयात गेला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रातून निधी आणून प्रकल्प पूर्ण करणार असे आश्वसन दिले आहे. समाधान आवताडे भूमिपूत्र असल्याने त्यांच्या बाजूने हे वातावरण राहिले त्याचा देखील फायदा समाधान आवताडेंना झाला.

६) शेवटचा मुद्दा 

शेवटचा मुद्दा सांगण्यासाठी एक उदाहरण सांगता येईल. आर.आर.पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी एक निवडणूक रंगली होती. निवडणूक अगदी कट टू कट होती. दूसरीकडे आर.आर.आबा राज्याच्या राजकारणात फेमस असल्याने स्वत:च्या मतदारसंघासोबत महाराष्ट्राचा दौरा देखील त्यांनी आखला होता.

निवडणूकीच्या अगोदरचे काही दिवस ते सक्रीयपणे मतदारसंघात थांबू लागले. प्रचाराच्या अगदी शेवटच्या दिवशी शरद पवारांची सभा ठेवण्यात आली. पवारांची सभा झाली आणि गाड्यांचा ताफा सांगलीच्या दिशेने जावू लागला. तेव्हा शरद पवारांनी आबांना एक निरोप पाठवला. तूझी शीट धोक्यात आहे, फिल्डिंग लाव.

निवडणूकीच्या शेवटच्या दोन दिवसात चक्र फिरली आणि आबा ३-४ हजारांच्या मताधिक्यांनी निवडणून आले.

थोडक्यात काय शेवटचा मुद्दा आणि शेवटचे दिवस महत्वाचे असतात. मतदानाच्या दोन दिवस अगोदर आवताडे आणि परिचारक गटाकडून जोरदार फिल्डिंग लागली. गट टू गट पॅक करण्यात आले पण बरोबर एक दोन दिवसच भालके गट ढिल्ला पडला आणि घात झाला.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.