खरचं नांदेडच्या गुरुद्वारानं कोरोनासाठी ५० वर्षाचं सोनं दान करण्याचा निर्णय घेतला आहे का?

सोशल मीडियावर एक जमात सातत्यानं १०० टक्के ऍक्टिव्ह असतेय. या जमातीचं नाव म्हणजे ढक्कलगाडी. दिवसभर यांचं एकचं काम. व्हॉट्सएप, फेसबुक, ट्विटर अशा ठिकाणी सतत काही तरी ढकलत राहायचं, आणि बेसिकली हाच त्यांचा आवडता धंदा असतोय.

मध्यंतरी या जमातीनं असाचं आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा एक व्हिडीओ ढकलला होता, यात मुख्यमंत्र्यांनी राज्यात सर्वांना कोरोनावरचे उपचार फ्री मिळतील असं सांगितलं होतं. पण सत्यात बघितल्यावर असं काहीही नसल्याची गोष्ट समोर आली होती.

आता अजून एक व्हिडीओ या ढक्कलगाडीनं सोशल मीडियावर ढकलला आहे. या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की,

नांदेडच्या सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारानं आपल्याकडे मागच्या ५० वर्षापासूनचे सोनं नांदेड शहरातील आरोग्य व्यवस्था उभी करण्यासाठी दान केलं आहे.

गुरुद्वाराचे संत बाबा कुलवंतसिंग जी यांच्या नावानं हा व्हिडीओ होता. यात ते पुढे सांगतं होते की, हे जे काही सोनं आहे ते आपल्याला जमा करून ठेवायचं नाही, ते सेवेसाठी लावायचं आहे. रुग्णांना उपचाराच्या सुविधा मिळत नाही म्हणून त्यांना हैदराबादला जावं लागतं, मुंबईला जावं लागतं. पण आता त्यांच्यावर ही वेळ येणार नाही.

सहाजिकच ही बातमी ऐकून आणि हा व्हिडीओ बघून आमच्यापण पायाखालची जमीन सरकली. कारण निर्णय मोठा होता. ५० वर्षापासूनच सोनं दान करणं म्हणजे चेष्टा नाय भिडू. भल्या-भल्या संस्थांना अजून जमलेलं नाही. 

त्यामुळे हा निर्णय खरा आहे कि खोटा आहे हे तपासावं म्हंटलं. कारण खरी असली तर चांगल्या निर्णयाचं कौतुक करायला हवं. म्हणून जरा बातम्या बघितल्या. तर या बाबतीमधील बातम्या देखील होत्या.

काही बातम्या बघू आपण

१.  न्युज18 पंजाबी यांनी दिलेली. दिनांक, २२-०५-२०२१. 

नांदेडमधील गुरुद्वारात मागच्या ५० वर्षात दान म्हणून मिळालेलं सोनं रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये तयार करण्यासाठी वापरली जाणार. 

२. दुसरी बातमी होती नवभारत टाइम्स या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेली. दिनांक २२-०५-२०२१

गुरुद्वारा तख्त श्री हजूर साहिबची घोषणा, आरोग्य सुविधा तयार करण्यासाठी सगळं दान करणार सोनं.

३. तिसरी बातमी होती, ehealth.eletsonline.com यांनी दिलेली. दिनांक २२-०५-२०२१.

नांदेडमधील गुरुद्वारा आपलं सगळं सोनं हॉस्पिटल आणि आरोग्य सुविधा उभारण्यासाठी देणार.

४. चौथी बातमी होती sikh-news.com यांनी दिलेली. दिनांक १९-०५-२०२१.

नांदेड गुरुद्वारा आपलं सगळं सोनं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजेस बांधण्यासाठी देणार.

पण तरी देखील खरचं असा कोणता निर्णय घेतला आहे का?

या सगळ्या बातम्या बघितल्यानंतर साहजिकचं कोणाची ही खात्री पटणार. त्यामुळे तुम्ही म्हणालं भिडू, निर्णय घेतला आहे का हे काही हि काय विचारतो. एवढ्या सगळ्यांनी बातमी दिली म्हणजे खरी असणारा ना गोष्ट. पण थांबा.

हा निर्णय खरचं घेतला आहे का? हे तपासण्यासाठी आम्ही सचिन कवडे या स्थानिक पत्रकारांना संपर्क केला. ते ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले, 

गुरुद्वारानं असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. ते कोरोना रुग्णांची सेवा करतं आहेत, पण सोनं दान करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.

यानंतर ‘बोल भिडू’ने थेट सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराच्या ऑफिसला फोन करून अशा काही निर्णयाबद्दल विचारलं. तर तिथून आम्हाला सांगण्यात आलं, 

गुरुद्वाराकडून सोनं दान कारण्याबाबतीमधील कोणताही निर्णय घेतलेला नाही. तो व्हिडीओ आणि बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत.

यानंतर आम्ही गुरुद्वारा ऑफिसचे सुप्रिटेंडन्ट हरजीत सिंग यांना संपर्क केला. ते ‘बोल भिडू’शी बोलताना म्हणाले, 

सोनं दान करण्याचा निर्णयाबद्दल मलाचं काही माहित नाही. असा काही निर्णय झाल्यास नक्की सांगण्यात येईल.

गुरूद्वारानं सोनं दान करण्याचा निर्णय घेतला नसला तरी त्यांच्याकडून आरोग्य सेवा मात्र सुरु आहे

गतवर्षी जूनमध्ये गुरुद्वारा लंगरसाहिब, हजूरसाहिब यांनी जवळपास १५० बेडचे लेव्हल १ चे मोफत कोव्हिड केअर सेंटर सुरु केलं होतं. इथं जेवणापासून सगळ्या गोष्टींची सुविधा करण्यात आली होती. सोबतच संशयित रुग्णांना NRI यात्री निवास खुलं करून देण्यात आलं होतं.

सोबतच मागच्या महिन्यात गुरुद्वाराकडून विशेष कोविड सेवा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत, कोरोना टेस्ट, सिटी स्कॅन, कोरोना उपचार औषधी, बेडची उपलब्धता इत्यादी विषयी मार्गदर्शन व मदत उपलब्ध असेल असं सांगण्यात आलं होतं.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.