राहुल गांधींच्या आजोळी मोदी काय करायला गेलेत?

घरच्या कालनिर्णयवर पेपरचं टाईमटेबल लिहिलेलं असायचं, किल्ला करायला पोती, दगड कुठून चोरायचे हे विचार कंटीन्यू डोक्यात. सगळी दिवाळी फटाके, किल्ला आणि उंडगण्यात घालवायची आणि भाऊबीज झाली की कानात गाणं वाजायचं, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया!

आता हे सगळं सांगायचं कारण लई सोपं आहे, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मामाच्या गावाला गेलेत, फक्त मामाचं गाव राहुल गांधींचं आहे.

आता मोदी इटलीला गेलेत म्हणल्यावर चर्चा तर होणारच भिडू!

आपण मामाच्या गावाला गेल्यावर निवांत झोपायचो, चिंचा बिंचा तोडायचो, आजीच्या हातचं लाडू-बिडू खायचो. मोदी काय पाहुणचाराला राहुल गांधींच्या मामांकडे जायचे नाहीत, नायतर कसं फराळाला पिझ्झा, पास्ता केला असता. मोदी तिकडं मिटिंग करणार, तिकडच्या शेठ लोकांना भेटणार. आपण कसं मामाकडं गेलो की चुलत मामाकडं जा, मावशीकडं जा अशी एखाद दोन घरं एक्स्ट्रा मारायचो, तसंच मोदीपण इटलीसोबतच इतर देशातल्या नेत्यांशी बैठक घेणार आहेत.

आता त्यांचा दौरा जरा डिटेलमध्ये सांगतो-

मोदींचा हा दौरा पाच दिवसांचा असेल. त्यात ते G20 शिखर परिषद आणि COP26 शिखर परिषद या दोन महत्त्वाच्या बैठकांमध्ये सहभागी होतील. मोदी म्हणतात त्यांना लय वेळ काम करायची सवय आहे, त्यामुळं ते मधल्या वेळात इतर मोठ्या कार्यकर्त्यांशी पण भेटीगाठी करणार आहेत.

रोममध्ये पोहोचल्यावर मोदी युरोपियन कमिशन आणि युरोपियन कौन्सिलच्या अध्यक्षांना भेटले. त्यानंतर, त्यांनी बापूंचं दर्शन घेत गांधीगिरी केली. मग तिथल्या भारतीय नागरिकांची, ‘काय कसं काय मंडळी’ वगैरे चौकशी केली. संध्याकाळी मोदी इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत समाविष्ट झाले.

शनिवारी मोदींनी ख्रिस्ती धर्माचे मुख्य धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. त्यानंतर, मोदी G20 शिखर परिषदेत सहभागी होतील. फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रोन, इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विदोदो आणि सिंगापूरचे पंतप्रधान हुसेन लूंग यांचीही मोदी भेट घेतील.

रविवारच्या दिवशी आपण दिवाळीनिमित्त घरं बिरं आवरायला काढू आणि मोदी तिकडे स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ, जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मॉर्केल यांना भेटतील. त्यानंतर, ‘हवामान बदल आणि पर्यावरण आणि शाश्वत विकास’ या विषयावर चर्चा करण्यासाठी G20 शिखर परिषदेत सहभाग घेतील.

सोमवारी ऑफिसला जायचा आपल्याला कंटाळा येईल, पण मोदीजींना नाही. ते सोमवारी ग्लासगोला COP26 हवामान परिषदेसाठी जातील आणि इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांना भेटतील.

मंगळवारी ते COP26 हवामान परिषदेत सहभागी होतील आणि मग भारतात यायला निघतील.

थोडक्यात मोदींची दिवाळी भारतात साजरी होईल हे नक्की. आता तिकडं एवढ्या देशाच्या पंतप्रधानांना भेटणार म्हणजे लय मोठे निर्णय, करार, योजना नक्की होणार. आता ते आम्हाला कळलं की, आम्ही तुम्हाला फिक्समध्ये सांगणार.

आणि हा आणखी एक आम्ही लय शोधलं पण राहुल गांधींच्या आजोळी जाऊन मोदी राहुल गांधींच्या मामांना भेटणार का हे काय आम्हाला कळलं नाही.

हे ही वाच भिडू:

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.