नेहरू घराणंसुद्धा लेकीच्या लव्ह मॅरेजच्या विरोधात होतं

‘आजकाल लव्ह मॅरेजचा जमाना आहे’ असं आपण सहजपणे बोलतो. पण ते करताना सुद्धा हिम्मत लागते भिडू. एकतर ती व्यक्ती मिळवण्यासाठी आटापिटा करा आणि नंतर त्याच व्यक्तीशी लग्न करण्यासाठी घरच्यांची मनधरणी करा. शहरानं जरा ही पद्धत स्वीकारलीये, पण गाव पातळीवर  आजही लव्ह मॅरेज म्हंटलं की, कडव्या विरोधाला सामोरं जावं लागतं. यात मोठमोठी घराणं आणि राजकारणी मंडळी सुद्धा मोडतात.

याच कडव्या विरोधातून विजयालक्ष्मी पंडित यांना सुद्धा जावं लागलं होतं. आता विजयालक्ष्मी पंडित ह्या फार कमी लोकांना माहिती असतील. 

तर विजयालक्ष्मी पंडित म्हणजे मोतीलाल नेहरू यांची कन्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची बहीण. ज्यांचं एका मुस्लिम धर्मीय मुलावर प्रेम केलं, पण नेहरू परिवारानं या प्रेमाला विरोध करत लग्नाला नकार दिला.

अलाहाबादमधील मोतीलाल नेहरू यांचं घराणं आधुनिक विचार आणि जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होतं. पण जेव्हा मुलगी विजयालक्ष्मी पंडितने कुटुंबासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली, तेव्हा मात्र एकच गोंधळ उडाला. भडकलेल्या मोतीलाल यांनी हे लग्न होणार नसल्याचा निर्णय दिला.

आता मुलगा काय कोणी एैरा- गैरा नव्हता. एका उच्चभ्रू, समृद्ध आणि सुशिक्षित मुस्लिम कुटुंबातील होता. नंतर तो भारताचा राजदूतही झाला आणि महत्वाचं म्हणजे नेहरूंच्या चांगलाच ओळखीचा होता. तो मुलगा म्हणजे सय्यद हुसैन.

सय्यद हुसैन यांना मोतीलाल नेहरूंनीचं आपल्या ‘इंडिपेंडेंट’ या वृत्तपत्राचे संपादक बनवून अलाहाबादला बोलावले होते. गांधीजींच्याही ते जवळचे. जवाहरलाल नेहरूंशीही त्यांचे संबंध नंतरपर्यंत राहिले.

ते एक अतिशय हुशार आणि सुशिक्षित व्यक्ती होते. हुसेन यांनी अमेरिकेत भारताच्या स्वातंत्र्याच्या बाजूने मोठी मोहीम सुरू केली. ज्यामुळे नेहरूंनी त्यांना इजिप्तचा राजदूत बनवले. सय्यद बंगालच्या अत्यंत प्रतिष्ठित आणि समृद्ध कुटुंबातील, उच्चशिक्षित होते.

दरम्यान, मोतीलाल नेहरूंना अलाहाबाद येथून ‘इंडिपेंडंट’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करायचे होते. यासाठी त्यांना एका हुशार आणि बुद्धिमान संपादकाची गरज होती आणि हुसेन या सगळ्या कॅटेगरीत फिट बसत होते.

सय्यद हुसेन अलाहाबादला मोतीलाल नेहरूंच्या “इंडिपेंडंट” या वृत्तपत्राचे संपादक म्हणून आले. त्यांनी अत्यंत कमी वेळात वृत्तपत्राच्या दृष्टिकोनात प्रचंड बदल केला.

सय्यद यांचा जन्म कलकत्याचा. त्यांचे वडील सय्यद मुहम्मद बंगालचे रजिस्ट्रार जनरल होते. हुसैन संपादक झाल्यावर “इंडिपेंडंट” हे खूप लोकप्रिय वृत्तपत्र बनले. त्यांचे हेडिंग्स लक्ष वेधून घेणारी आणि संपादकीय लेख धारदार होते.

तेव्हा विजयालक्ष्मी १९ वर्षांच्या होत्या. त्या रोज वर्तमानपत्राच्या कार्यालयात यायच्या. वर्तमानपत्र संपादित करण्याचे काम त्या शिकण्याचा प्रयत्न करत होत्या. हुसेन त्यावेळी ३१ वर्षांचे होते. या दरम्यान, दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले. सुरुवातीला हुसैन नेहरूंचा धाक म्ह्णून म्हणा कि आणखी काही हे संबंध टाळायचे, पण ते फार काळ स्वतः अडवू शकले नाही. 

दोघेही या नात्याबद्दल इतके गंभीर होते की, दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. विजयालक्ष्मी यांनी आपल्या घरच्यांसमोर हुसैन आणि आपल्या नात्याची कबुली दिली. आपल्या घरच्यांना पटवून देण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला. पण वडील मोतीलाल नेहरू आपल्या मताचे पक्के मानून त्यांनी या लग्नाला  स्पष्टपणे नकार दिला.

तो काळही तसाच होता म्हणा, लव्ह मॅरेज तेही दुसऱ्या धर्मांमध्ये या गोष्टीचा विचार करणही अवघड होतं. त्यामुळे नेहरू कुटुंब या नात्याच्या बाजूने नव्हते. जेव्हा विजयालक्ष्मी या गोष्टीवर अडून राहिल्या, तेव्हा मोतीलाल या निष्कर्षावर आले की, हुसैनचे अलाहाबादमध्ये राहणे परिस्थिती परिस्थिती बिघडवू  शकते. त्यामुळे त्यांनी हुसैनला संपादकीय पद आणि अलाहाबाद दोन्ही सोडून जायला सांगितलं.

त्या दिवसांत विजयालक्ष्मी आणि हुसैन यांच्या अफेअरची चर्चा मीडियामध्येही पसरली. अखेर हुसेन यांनी १९२० मध्ये अलाहाबाद सोडले. खिलाफत चळवळीचा एक भाग म्हणून हुसैन इंग्लंडला गेले. तिथे भारतीयांच्या स्वातंत्र्याच्या आवाजावर जोर द्यायला सुरुवात केली. लंडनमध्ये ते काँग्रेसच्या अधिकृत प्रकाशनाचे संपादक झाले. ब्रिटनहून पुन्हा अमेरिकेत गेले. 

हुसैन विदेशात जाताच नेहरू कुटुंबाने लगेच विजयालक्ष्मीसाठी योग्य वराचा शोध सुरू केला. ज्यानंतर १९२१ मध्ये महाराष्ट्रातील ब्राह्मण बॅरिस्टर रणजीत सीताराम पंडितशी त्यांचं लग्न झालं. सीताराम केवळ बॅरिस्टर नव्हते तर एक विद्वान देखील होते.

मैत्री मात्र कायम राहिली
नेहरूंचे पर्सनल सचिव एमओ मथाई यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले कि, १९४५ मध्ये हुसैन आणि विजयालक्ष्मी अमेरिकेत एकत्र दिसले. जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा नेहरूंनीच हुसैन यांना इजिप्तमध्ये पहिले भारतीय राजदूत बनवले.

विजयालक्ष्मी यांचं लग्न झालं पण हुसैन आयुष्याभर एकटेच राहिले. त्यांनी कधीचं लग्न केले नाही. १९४९ मध्ये त्यांना अमेरिकेचे राजदूत म्हणून घोषित करण्यात आले. दरम्यान, इजिप्शियन हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. तेथे त्यांना राजकीय सन्मानाने निरोप देण्यात आला. कैरोमधील एका रस्त्याचे नावही त्यांच्या नावावरून ठेवले गेलेय.

तर विजयालक्ष्मी पंडित सोव्हिएत युनियनमध्ये भारताच्या पहिल्या राजदूत बनल्या. मग त्यांना अमेरिकेत राजदूत बनवण्यात आले. त्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या पहिल्या राजदूत बनल्या. स्वातंत्र्य संग्रामाच्या आधी आणि नंतर सुद्धा सार्वजनिक सेवेत त्यांचे मोठे योगदान आहे.

विजय लक्ष्मी पंडित कॅबिनेट मंत्री बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.

गांधीजींनी प्रभावित होऊन त्यांनी अनेक स्वातंत्र्याच्या चळवळीतही भाग घ्यायला सुरुवात केली. यासाठी अनेक वेळा तुरुंगात देखील जावं लागलं. १९५३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्ष बनणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला होत्या. गावांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी पंचायत राज प्रणाली कायदाही पास केला.

देशात पंचायत राज व्यवस्था सुरु करण्याचं श्रेय त्यांनाच जात.

त्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षाही होत्या. त्यांनी आपली भाची आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीला विरोध करत काँग्रेसमधून राजीनामा दिला आणि जनता पक्षात प्रवेश केला. विजयलक्ष्मी नंतर डेहरादूनला निघून गेल्या तिथेच १ डिसेंबर १९९० साली त्यांचं निधन झालं. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.