गुजरात दंगलीत मोदींना क्लिनचिट देणारे आता अंबानी प्रकरणाचा तपास करणार

सध्या अंबानीच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांचा विषय ऐरणीवर आलाय. ही स्फोटके ज्याच्या गाडीत सापडली ते मनसुख हिरेन अचानक गायब झाले. त्यांचा काही दिवसांनी संशयास्पद मृतदेह सापडला. महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं. इतकंच नाही तर पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांना आदल्या दिवशी फोन केलेले असा आरोप विरोधी पक्ष नेत्यांकडून झाला.

या सगळ्या प्रकरणाने राजकीय वळण घेतले. राज्य सरकारने एटीएस कडे संपूर्ण प्रकरणाचा तपास सोपवण्याचा निर्णय घेतला. पण विरोधकांनी राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी म्हणजेच एनआयए कडे ही केस वर्ग करा अशी मागणी केंद्राकडे केली.

या मागणी नुसार नुकताच एनआयए कडे हा तपास सोपवण्यात आला आहे.

मात्र एनआयए बद्दल गेले काही महिने एक वाद सुरु आहे. काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांच्यापासून ते राहुल गांधी यांच्या पर्यंत अनेक नेते एनआयएच्या तपासावर आक्षेप घेत आहेत. फक्त अंबानी प्रकरणात नाही तर यापूर्वी देखील कित्येकवेळा काँग्रेसने एनआयएवर जोरदार टीका केली आहे. पण त्यांचा सगळ्यात मोठा  विरोध एनआयएचे प्रमुख योगेश चंद्र मोदी यांच्याबद्दल आहे.

कोण आहेत योगेश चंद्र मोदी? काय आहे हा नेमका वाद

योगेशचन्द्र मोदी १९८४ सालच्या फेमस आयपीएस बॅचचे अधिकारी. त्यांना आयोगाकडून मिळालेलं आसाम व मेघालय हे होतं. तिथे सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर पदापासून सुरवात केली. तिथून मग त्यांची कारकीर्द डिस्ट्रिक्ट एसपी, डीआयजी मग ऍडिशनल डीजीपी अशा चढत्या कमानीवर राहिली.

१९९१ साली दिल्लीच्या सेक्रेटरीयट ऑफिसमध्ये आले. तिथे देखील महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या. एकदा तर भारताबाहेर देखील त्यांना पाठवण्यात आलं. त्यांच्या कामगिरीमुळे  एकदा पोलीस मेडल देखील मिळालं होतं. योगेशचंद्र मोदींचा अँटी करप्शन केसेस, आर्थिक गुन्हे व गुप्तचर खात्यातील कामकाजाचा अनुभव पाहून २००२ साली त्यांची नियुक्ती सीबीआय मध्ये करण्यात आली.

याच वर्षी त्यांच्याकडे सर्वात महत्वाची केस आली ते २००२ च्या गुजरात दंगलीची चौकशी.

गोध्रा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या अहमदाबाद येथे हिंदू मुस्लिम मोठी दंगल पेटवण्यात आली. अनेकांचा मृत्यू झाला. गावाच्या मधोमध असणाऱ्या गुलबर्ग या उच्चभ्रू हौसिंग सोसायटीमध्ये आग लावण्यात आली व माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह ६९ जणांना जिवंत जाळण्यात आले. असं म्हटलं गेलं की जाफरी यांनी अनेकदा पोलीस स्टेशनला फोन फिरवूनही कोणीही प्रतिसाद दिला नाही.

असेच मोठे हत्याकांड नरोडा पटिया येथे देखील झाले.

काँग्रेसने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कायदा व सुव्यवस्था न राखल्याबद्दल आरोप केले. या दंगलीमागे त्यांचा व त्यांच्या मंत्र्यांचा हात आहे असं बोललं गेलं. केंद्रातून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देखील मोठा दबाव टाकला.

प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. तिथल्या सरन्यायाधीशांनी एक एसआयटी बसवली आणि या संपूर्ण गुजरात प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे दिली. वाय.सी.मोदी या टीमचा प्रमुख भाग होते.

जवळपास दहा वर्षे मोदी यांनी हि चौकशी केली. गुजरात दंगल झाल्यावर एकाच वर्षात माजी मंत्री हरेन पांड्या यांची देखील हत्या झाली. हरेन पांड्या हे भाजपचे मोठे नेते व नरेंद्र मोदी यांचे विरोधक समजले जायचे.

गुजरात दंगलीचे षडयंत्र हे रचलेले आहे व नरेंद्र  मोदी त्याचे सूत्रधार आहेत असा हरेन पांड्या यांचा आरोप होता पण दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी देखील वाय.सी.मोदी यांच्या कडे दिली.

वाय सी मोदी व त्यांच्या एसआयटी टीमच्या अधिकाऱ्यांच्यावर गुजरात कोर्टाने मात्र ताशेरे ओढले.

त्यांचा तपास हा ढिला असून यात सर्वसामान्यांना न्याय मिळत नाही आहे. या संपूर्ण प्रकरणात होत असलेल्या दिरंगाईबद्दल त्यातील अधिकाऱ्यांना दोषी धरले पाहिजे असा सूर कोर्टाचा होता.

यावरून वाय सी मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका झाली.

तरी २०१२ साली त्यांनी आपला संपूर्ण तपास सर्वोच्च न्यायालयात सादर केला त्यात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे निर्दोष असल्याचं सांगितलं. हरेन पांड्या केस मध्ये देखील शहा व मोदींचा हात नसल्याचा निर्वाळा त्यांच्या एसआयटी टीमने दिला. यावरून विरोधी पक्षांनी बराच गदारोळ केला.

मोदींना क्लीन चिट मिळाल्यामुळे त्यांच्यावरचे सर्व डाग धुतले गेले व पुढच्या निवडणुकीसाठी त्यांना फायदा झाला असं म्हटलं गेलं.

पुढे २०१४ साली केंद्रात काँग्रेस सरकारचा पराभव झाला आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान बनले. चार वर्षांपूर्वी मनमोहनसिंग यांनी वाय.सी.मोदी यांना सीबीआयमधून हटवलं होतं पण नव्या पंतप्रधानांनी त्यांना सीबीआयचा ऍडिशनल डायरेक्टर बनवलं.

इतकंच नाही तर दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय तपास संस्था तथा ‘राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण’ (एनआयए)च्या प्रमुखपदी नेमणूक केली.

तेव्हा पासून आज पर्यंत कोणतीही राजकीय दृष्ट्या संवेदनशील केस एनआयए कडे आली कि वाय.सी.मोदींचा इतिहास उगाळला जातो, त्यांचे अन नरेंद्र मोदींचे संबंध याचा दाखला दिला जातो. काही दिवसांपूर्वी दविंदर सिंगच्या केस मध्ये तसंच झालं आणि आता अंबानींच्या केस मध्ये देखील असेच आरोप काँग्रेस कडून केले जात आहेत.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.