आणि बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये निळू फुलेंना लोकांनी उभं राहून मानवंदना दिली..
भारतीय सिनेमा क्षेत्रात असे कलाकार होऊन गेले आहेत, जे कायम प्रसिध्दीच्या शिखरावर होते. ज्यांनी अमाप अशा लोकप्रियतेचा अनुभव घेतला. परंतु व्यक्तिगत जीवनात मात्र त्यांचं राहणीमान अगदी साधं होतं.
आपण मोठे कलाकार आहोत, असा कोणताही गर्व अथवा माज त्यांना नव्हता. अभिनयाची आवड म्हणून त्यांनी सिनेमा माध्यम जरी स्वीकारलं. या माध्यमात हे कलाकार प्रचंड यशस्वी झाले असले, तरीही यशाची हवा त्यांच्या डोक्यात कधीच गेली नाही.
त्यांचे पाय कायम जमिनीवरच राहिले,
अशाच काही कलाकारांपैकी एक म्हणजे निळू फुले.
निळू फुले यांनी अभिनेता म्हणून नाटक आणि सिनेमांमध्ये खलनायकी भूमिका अनेक केल्या. मराठी सिनेसृष्टीत खलनायक म्हटलं की चटकन निळूभाऊंचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. नाना पाटेकर एका मुलाखतीत म्हणाले होते की,
“उत्कृष्ट खलनायक तोच असतो, जो शांत राहून सगळ्यांना संपवण्याचे डाव आखतो. जो नसती उठाठेव करत नाही. किंवा कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा करत नाही. अगदी थंड डोक्याने तो खुनशी प्लॅन आखतो.”
निळूभाऊंनी रंगवलेला खलनायक सुद्धा असाच काहीसा.
समोरच्याला केवळ नजरेने गारद करण्याची ताकद निळू फुले यांच्या अभिनयात होती. निळूभाऊंनी सिनेमात रंगवलेले अनेक खलनायक गाजले.
यातला सर्वात वेगळा खलनायक म्हणजे ‘सामना’ मधला हिंदुराव पाटील.
समोर डॉ. श्रीराम लागू यांच्या सारखा अभ्यासू कलाकार. जो सिनेमात अखंड बडबड करत हिंदुरावाला डिवचण्याचं काम करतो. त्याच्यासमोर निळूभाऊंचा हिंदुराव कधी अबोल होतो, कधी रागावतो, कधी त्रागा करतो. क्वचित प्रसंगी सामना मध्ये एकही संवाद नसताना सुद्धा निळू भाऊंची डोळ्यातील जरब खूप काही बोलून जाते.
सामना मध्ये एक प्रसंग आहे, जेव्हा डॉ. लागू स्वतःच्या कानाखाली मारून घेतात. तेव्हा निळू फुले शांतपणे त्यांना म्हणतात,
“मास्तर राहू द्या, माणसाला स्वतःचा हात कधी लागत नाही.”
‘सामना’ खूप गाजला. थेट २५ व्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचला.
बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमा दाखवला गेल्यानंतर सामना मधले सर्व कलाकार स्टेजवर आले. या कलाकारांमध्ये निळू फुले सुद्धा होते. तुम्ही निळू भाऊंच्या मुलाखती आजही बघाल तेव्हा अगदी साध्या पोशाखात ते असतात.
खलनायकी भूमिका गाजवलेले निळूभाऊ अगदी शांतपणे प्रश्नांची उत्तरं देत असतात. त्यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वात असलेला साधेपणा अशावेळेस अनुभवता येतो.
बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सुद्धा जेव्हा निळूभाऊ स्टेजवर गेले तेव्हा त्यांचा अगदी साधा पोशाख होता. सिनेमात असलेला हिंदुराव पाटील आपल्या समोर उभा आहे याची कोणालाच कल्पना नव्हती.
जेव्हा निळू भाऊ सर्वांना नमस्कार करण्यासाठी विनम्र झाले तेव्हा प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या काही मुलांनी त्यांना ओळखलं. हिंदुराव पाटील आपल्या समोर उभा आहे हे कळताच त्या सभागृहात असलेले सर्व प्रेक्षक उठून उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट करून त्यांनी निळू फुले यांच्या अभिनयाला दाद दिली.
खूप वेळ हा टाळ्यांचा कडकडाट थांबला नव्हता.
निळू फुले यांच्यासारख्या मराठी कलाकाराच्या अभिनयाची बर्लिन फेस्टिवल सारख्या जागतिक कीर्तीच्या महोत्सवात दखल घेतली गेली. निळूभाऊं साठी नक्कीच हा भारावून टाकणारा क्षण असावा.
२४ तास स्वतःभोवती असलेलं प्रसिद्धीचं वलय बाजूला ठेवून खऱ्या आयुष्यात छानछौकी न करता कमालीचा साधेपणा स्वीकारणारी निळू फुलें सारखी कलाकार माणसं आत्ता सापडणं दुर्मिळच.
हे ही वाच भिडू
- आपण कुठे चुकतोय याची जाणीव नसीरुद्दीन शाह यांना निळू फुलेंचा अभिनय पाहून झाली
- चुकून रोल मिळाला आणि गावागावात झेले अण्णांचा जयजयकार होऊ लागला
- दाभोलकरांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले आणि अंनिसची चळवळ खेडोपाडी पसरली.