फक्त महाराष्ट्रातचं नाही तर, राजस्थानमध्ये पण सरकार धोक्यात आहे?

ट्विटरवर आज सकाळपासून ‘#पायलट_आ_रहा_है’ हा हॅशटॅग ट्रेंडिंगला आहे. यातून आता पुन्हा एकदा सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसवर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. सोबतचं सचिन पायलट यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवावं, २०२४ ला त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावं अशी देखील मागणी सुरु केली आहे.

राजस्थानमधील राजकीय वातावरणावर काँग्रेसकडून कालपासून ‘कांग्रेस आ रही’ असा हॅशटॅग ट्रेंडला आणला होता. त्याचं ट्रेंडला उत्तर म्हणून सचिन पायलट समर्थकांनी या ट्रेंडला सुरुवात केल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र असं असलं तरी राजकीय तज्ञांच्या मते, हा पायलट यांच्या दबावतंत्राचा आणि ‘प्लॅन बी’ चा एक भाग असू शकतो.

पण काय आहे त्यांचा प्लॅन बी?

मागच्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचं कारण म्हणजे काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी पक्षावर वाढवलेला दबाव. पायलट यांनी त्यांच्या समर्थक ७ ते ८ आमदारांना मंत्रिपद देण्यात यावी अशी मागणी पक्षाकडे केली आहे. त्यासाठी त्यांनी अक्षरशः आकाशपाताळ एक केलं आहे.

यातूनचं जर हा दबाव यशस्वी झाला तर गेहलोत यांच्या साम्राज्याला देखील धक्का पोहोचून त्यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते असे अंदाज वर्तवले जातं आहेत. 

त्यामुळे सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षानं प्रियांका गांधी यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. त्यासाठी ६ दिवस पायलट दिल्लीत मुक्कामी होते, त्यानंतर ते पुन्हा एकदा राजस्थानला परतले. मात्र यात त्यांची आणि प्रियांका गांधी यांची भेट झाली कि नाही आणि हेचं अदयाप गुलदस्त्यात आहे. 

१० महिन्यापूर्वी देखील पायलट यांनी अशाच प्रकारचं बंड केलं होतं. मात्र त्याला यश आलं नव्हतं. आता देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे.

यातूनच त्यांनी प्लॅन बी आखला आहे.

सचिन पायलट यांनी आतापर्यंत समर्थक आमदारांच्या बळावर पक्षावर दबाव वाढवला होता. पण आता त्यांनी आपल्या प्रत्यक्ष जमिनीवरील ताकदीचा उपयोग करण्याचं ठरवलं आहे. याचाच एक भाग म्हणून राजस्थानमध्ये ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे त्या कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी पायलट यांनी राज्यव्यापी दौरा आखला आहे.

रविवारी या दौऱ्याची सुरुवात झाली. यात पहिल्या टप्प्यात ते काँग्रेस पक्षाच्या अशा आमदारांच्या घरी भेट देणार आहेत ज्यांच्या कुटुंबात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या टप्प्याला प्राधान्य देताना देखील पायलट यांच्याकडून गुर्जर मीणा बहुल या पूर्व राजस्थानमधील भागाला देण्यात आलं आहे. इथून या दौऱ्याची सुरुवात केली आहे.

पायलट यांनी रविवारी कठूमरचे आमदार बाबूलाल बैरवा आणि राजगढ- लक्ष्मणगढचे आमदार जौहरीलाल मीणा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. जौहरीलाल मीणा यांच्या पत्नीचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.

आता तसं बघितलं तर हे दोन्ही आमदार गेहलोत गटाचे आहेत. पण सध्या हे दोघेही गेहलोत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेचं त्यांच्या नाराजीचा उपयोग करून घेऊन आपल्या समर्थक आमदारांची संख्या वाढवणं हा पायलट यांच्या या दौऱ्यामागील हेतू असू शकतो.

यानंतर पायलट यांनी बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले आमदार दीपचंद खैरिया यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती. बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेल्या सर्वच्या सर्व ६ आमदारांनी गेहलोत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. सोबतच अपक्ष १३ आमदारांनी देखील गेहलोत यांनाच आपला पाठिंबा दिला आहे.

पूर्व राजस्थानमध्ये गेहलोत यांच्यापेक्षा पायलट यांचं महत्व जास्त

सचिन पायलट यांना २ गोष्टी पक्क्या ठाऊक आहेत. यातील एक म्हणजे पूर्व राजस्थानमधील आमदार सध्या जरी गेहलोत यांच्या सोबत असले तरी गुर्जर-मीणा बहुल भागात निवडणूक जिंकण्यासाठी या आमदारांना गेहलोत यांच्यापेक्षा पायलट यांची गरज जास्त आहे.

पायलट समर्थक एका आमदारच मत होतं कि,

अडीच वर्षानंतर निवडणुका आहेत. आता पूर्व राजस्थानमधील आमदार पक्के जाणून आहेत की, पायलट यांची नाराजी त्यांच्यावर कशा प्रकारे परिणाम टाकू शकते. जर उदाहरण सांगायचं झालं तर काही दिवसापूर्वी गेहलोत गटाच्या आमदार इंदिरा मीणा यांनी पायलट यांना दिलेलं वचन पक्षानं पूर्ण करावं अशी  मागणी केली होती कि. इंदिरा मीणा यांच्या विधानसभा क्षेत्रात गुर्जर मतदारांची भूमिका निर्णायक आहे.

आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समर्थक आमदारांच्या बळावर गेहलोत यांच्यावर जेवढा दबाव आपण टाकू शकत नाही, तेवढा दबाव प्रत्यक्ष जमिनीवरील आपली लोकप्रियता आणि ताकदीने टाकता येऊ शकतो, हे गुपित पायलट यांना उमगलं आहे. १० महिन्यांपूर्वी देखील त्यांनी जेव्हा बंडखोरी केली होती तेव्हा त्यांनी याच हत्याराचा उपयोग केला होता.

त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा आधार घेतला होता. पूर्व राजस्थानमधूनच अनेक मोठ्या मोठ्या सभा आणि रॅली काढून क्राउड पुलर लीडर म्हणजे जनतेच्या मनातील नेता अशी आपली इमेज उभी केली होती.

गेहलोत यांचा जी १९ ग्रुप

तर दुसऱ्या बाजूला आपलं साम्राज्य शाबूत ठेवण्यासाठी गेहलोत यांनी बहुजन समाजवादी पक्षातून आलेले ६ आणि अपक्ष १३ अशा १९ आमदारांची मोट बांधली आहे. याच गटाला गेहलोत यांनी ताकद द्यायला सुरुवात केली आहे.

या १९ आमदारांची हायकमांडसोबत २३ जून रोजी एक बैठक ठेवण्यात आली आहे. यात हे आमदार पक्षश्रेष्ठींवर मंत्रिपदासाठी दबाव बनवू शकतात. कारण या १९ आमदारांच्या मते पायलट यांच्यामुळे धोक्यात आलेलं सरकार आम्ही वाचवलं आहे. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद मिळावीत.

यातून सचिन पायलट यांचं महत्व आणि मागणी कमी होतं असल्यानं गेहलोत यांनी देखील याच १९ आमदारांना पाठिंबा दिला असल्याचं सांगण्यात येतं आहे. कारण याच १९ आमदारांच्या पाठींब्यावर सध्या गेहलोत यांची खुर्ची आहे. राजस्थानमध्ये २०० पैकी १०१ जागा घेत अगदी काठावरचं बहुमत गेहलोत यांच्याकडे आहे. त्यांना याच १९ आमदारांनी आपला पाठिंबा दिला आहे.

पायलट यांनी हीच सगळी गेम ओळखून त्यावर दौऱ्यांचा उपाय शोधला आहे.

अशोक गेहलोत यांची हि चाल ओळखून सचिन पायलट यांनी आता प्रत्यक्ष जमिनीवर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

Image

पायलट सध्या फक्त आमदारांच्या बळावर राहू इच्छित नाहीत, तर ते सरळ सरळ जनमत आणि आमदारांचं मत वळून आपल्या लोकप्रियतेची देखील जोड देणार आहेत. त्यातुनच येणाऱ्या काही दिवसात पायलट यांचे हे दौरे आणखी वेग घेताना दिसतील हे नक्की. मात्र यामुळे महाराष्ट्रासोबतच सध्या काँग्रेसला राजस्थानमधील सरकारच्या डोक्यावर असलेली टांगती तलवार दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.